दीनदयाळ आरोग्य योजनेखाली इस्पितळांना ४३ कोटींचे वितरण

0
89

आरोग्य खात्याच्या दीनदयाळ आरोग्य सेवा योजनेखाली या वर्षी खासगी इस्पितळांना रुग्णांच्या उपचारार्थ आत्तापर्यंत ४३ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. सरकारच्यावतीने दीनदयाळ आरोग्य सेवा योजना चालविण्यात येत असल्याने सुमारे २० ते २५ कोटी रुपयांची बचत झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी काल दिली.

गत तीन वर्षांपासून दीनदयाळ आरोग्य सेवा योजना राबविण्यात येत आहे. दोन वर्षे ही योजना विमा योजनेच्या माध्यमातून चालविण्यात आली. गतवर्षी या योजनेखाली खासगी हॉस्पितळांना ७० ते ७५ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले होते. कार्डधारकांना सरकारी आणि खासगी हॉस्पितळांमध्ये मोफत उपचार दिले जातात. सध्या सरकारकडून ही योजना राबविण्यात येत आहे. चालू वर्षभरात खासगी इस्पितळातील २१ हजार रुग्णांवरील उपचारांसाठी ४३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. एकूण ५२ खासगी इस्पितळांना रुग्णांवरील उपचारासाठी खर्च देण्यात आला आहे. या योजनेखाली कर्करोग, मूत्रपिंड, हृदयरोग व इतर प्रकारच्या आजारांसाठी खर्च देण्यात आला आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

या योजनेखाली २ लाख ३५ हजार जणांनी आरोग्य कार्डे तयार केली आहेत. ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत नूतनीकरणासाठी मुदत देण्यात आलेली आहे. आरोग्य कार्डांच्या नूतनीकरणासाठी चाळीस मतदारसंघात केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. आत्तापर्यंत १ लाख ६० हजार कार्डधारकांनी आपल्या आरोग्य कार्डांचे नूतनीकरण केले आहे. अजून ७० हजार कार्डधारकांनी कार्डांचे नूतनीकरण केलेले नाही. आरोग्य कार्डांच्या नूतनीकरणासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही.