सांतइनेज, पणजी येथे धक्काबुक्कीचा प्रकार

0
136

>> भाजप – कॉंग्रेसच्या परस्परविरोधी तक्रारी

सांतइनेज येथील मतदान केंद्र क्रमांक २४ जवळ काल भाजप व कॉंग्रेस कार्यकर्ते यांच्यात वाद झाल्यानंतर त्याचे पर्यवसान धक्काबुक्कीत झाले. याप्रकरणी भाजप व कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी परस्परांविरुद्ध पणजी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.
पणजी महापालिका प्रभाग क्रमांक ५ च्या नगरसेविका शीतल नाईक सांतइनेज कामत इस्टेटजवळ मतदारयादी घेऊन बसल्या होत्या. त्यावेळी भाजप समर्थक काही मतदार काही माहिती जाणून घेण्यासाठी त्यांच्याजवळ गेल्या होत्या. त्यावेळी तेथे कॉंग्रेसच्या नेत्या प्रतिमा कुतिन्हो आल्या व त्यांनी शीतल यांच्याजवळील मतदारयादी व अन्य कागकपत्रे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे. यावेळी पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर त्या बाजूने जात होते. त्यांनी हा प्रकार पाहिला व मदतीला धावून आले असे शीतल नाईक यांनी सांगितले. आपण याप्रकरणी प्रतिमा कुतिन्हो, सुनिता वेरेंकर, विशाल बांदेकर, रिया डिसोझा व डायना ब्रागांझा यांच्याविरुद्ध पणजी पोलिसात तक्रार नोंदवली असल्याचे नाईक यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, कॉंग्रेसने केलेल्या तक्रारीतून पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर व नगरसेविका शीतल नाईक यांनी डायना ब्रागांझा व अन्य कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचे म्हटले आहे.