कुयणामळ, सांगे येथे मुख्य रस्त्याजवळ असलेल्या काजू बागायतीत शांताराम गणू शिरोडकर (कुयणामळ, सांगे) या सुमारे ७० वर्षीय वृद्धाचे ९० टक्के जळालेल्या अवस्थेत प्रेत सापडल्याने ग्रामस्थांत खळबळ माजली आहे. शरीराचा एक पाय तुटलेल्या अवस्थेत सापडला असल्याने हा प्रकार खुनाचाच असल्याचा संशय नागरीकांनी व्यक्त केला आहे. मालमत्तेच्या वादातून खून झाला असल्याची चर्चा परिसरात असून सांगे पोलिस त्या दृष्टीकोनातून तपास करीत आहेत.
कुयणामळ, सांगे येथील शांताराम गाणू शिरोडकर (वय ७० वर्षे) हे कुयणामळ येथील आपल्या काजू बागायतीत साफसफाई करण्यासाठी गेले होते तर पत्नी नातलगाचा घरी पणजी येथे गेली होती. मात्र, काजू बागायतीत स्वच्छता करण्यासाठी गेलेले शांताराम घरी न परतल्याने पुतण्या बाबलो शिरोडकर यांनी काजू बागायतीत शोध घेतला असता आगीच्या खुणा आढळल्या. आग लागलेल्या ठिकाणी कोयता, टोपी व चप्पल आढळून आले. जरा पुढे गेल्यानंतर काजू बागायतीतच खंदकात पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत प्रेत आढळून आले. कुत्रे त्या ठिकाणी फीरकत असल्यामुळे प्रेत दृष्टीस पडले. पण आश्चर्याची बाब म्हणजे शरीराचा एकपाय तुटलेला होता. यामुळे खुनाचा संशय बळावला आहे. मात्र, ओळख पटली नसल्याने शातारामांचे कुटुंबीय प्रेत त्यांचे म्हण्यास तयार नाही. त्यामुळे डीएनए तपासणी केल्यानंतरच खरा प्रकार उघडकीस येणार आहे. पुतण्या बाबलो शिरोडकर म्हणाले की, शिरोडकर कुटुंबियात गेली कित्येक वर्षे जमिनीवरून वाद सुरू आहे.
या कारणावरून घात होण्याची शक्यता असून पोलिसांनी सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. घटनेच्या ठिकाणी सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. या प्रकरणी सखोल चौकशीची गरज त्यांनी व्यक्त केली. सांगे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर या प्रकरणी चौकशी करीत असून पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले आहे.