चाळीसही मतदारसंघांत मगो विस्ताराचा निर्णय

0
156

>> आमसभेत ठराव मंजूर

>> केंद्रीय समितीला दोन वर्षांची मुदतवाढ

मगो पक्षाच्या काल पर्वरी येथे झालेल्या आमसभेत चाळीसही मतदारसंघांमध्ये पक्षाचे संघटनात्मक काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. फेब्रुवारी महिन्यापासून २७ मतदारसंघांत समित्यांची छाननी करून राहिलेल्या मतदारसंघांमध्ये समित्या स्थापन करण्याचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी विद्यमान केंद्रीय समितीला दोन वर्षांची मुदतवाढ देणारा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

मगो पक्षाचे विलीनीकरण केले जाणार नाही असे यावेळी मंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले. पक्षाची संघटना मजबूत करणे हेच आमचे ध्येय आहे. संघटना बांधताना काही प्रमाणात दुफळी असते. परंतु एकजुटीने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आपली शक्ती वाढविण्याची गरज आहे. पक्ष मजबूत असेल तरच तो पुढील वाटचाल यशस्वीपणे करू शकतो. भाऊसाहेब बांदोडकरांनी दीन-दुबळ्यांना आधार मिळावा म्हणून मगो पक्ष स्थापन केला. सुरुवातीपासून पक्षासमोर अनेक गंभीर विषय आहेत. ख्रिस्ती आणि मुस्लीम समाजाला बरोबर घेऊन पक्षाची बांधणी करण्याची आवश्यकता आहे. या समाजांना दुरावता काम नये असे ढवळीकर यांनी सांगितले. सरकारातील युतीबद्दल अनेकांनी शंका निर्माण केल्या. परंतु २०१२ च्या निवडणुकीत पक्षाच्या अस्तित्वासाठीच युती करून निवडणूक लढवावी लागली. त्यावेळी मतांची टक्केवारी जरा घटली. २०१७ मध्ये निवडणुकीत आमचे काही आमदार हरले असले तरी मतांची टक्केवारी (१३%) वाढली. मगो पक्ष गोरगरिबांचा आहे आणि त्याचे अस्तित्व टिकविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करू असे पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर म्हणाले.

म्हादई पाणी तंटा प्रकरण लवादासमोर असून जोपर्यंत लवादाचा निर्णय होत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय मगो पक्ष घेणार नसल्याचे साबांखामंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. सध्या आमच्यासमोर पक्ष बळकट करण्याचे काम आहे असे ते म्हणाले.

आमदार दीपक पावसकर यांनी खाण व्यवसायाची समस्या मांडली. पक्षाच्या कार्यकारिणीने याची दखल घेऊन सरकारला विनंतीवजा पत्र पाठवावे अशी सूचना त्यांनी केली. बैठकीला व्यासपीठावर बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर, पक्षाचे
अध्यक्ष दीपक ढवळीकर, आमदार दीपक पावस्कर, माजी
आमदार लावू मामलेदार, ऍड. नारायण सावंत, रत्नकांत म्हार्दोळकर, आपा तेली, परशुराम कोटकर, नरेश गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.