सांगेत महिलेचा खून झाल्याचा संशय

0
18

>> घरात सापडला मृतदेह, घातपाताचा संशय

वरकटो सांगे येथे श्रीमती भारती राजेंद्र सामंत (५८) या महिलेचा मृतदेह तिच्याच घरात सापडला असून कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. भारती ह्यांच्या पतीचे सोळा वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांचे किराणा मालाचे दुकान असून भारती ह्या एकट्याच ते दुकान चालवीत होत्या व तिथेच त्यांचे घर असून तिथेच त्या रहात होत्या.

रविवारी दुकान बंद करून झोपलेल्या भारती ह्यांनी सोमवारी दुकान उघडले नाही. मंगळवारीही दुकान बंदच असल्याने शेजार्‍यांनी मोबाईलवर रिंग दिली असता आत मोबाईल वाजत होता. परंतु तो उचलला गेला नसल्याचे कळले. त्यामुळे शेजार्‍यांनी सांगे पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोेलिसांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आता प्रवेश केला असता भारती ह्या घरात पडलेल्या स्थितीत आढळून आल्या. त्यांच्या नाकातून रक्त आल्याचे दिसून आले. शिवाय त्यांच्या दोन्ही हातांवर रक्ताचे डाग आढळून आले.

दरम्यान, भारती यांनी आपल्या दुकानात दोनदा चोरीचा प्रयत्न झाला असल्याची माहिती शेजार्‍यांना दिली होती असे शेजार्‍यांनी सांगितले. त्यामुळे याहीवेळी चोरीच्याच प्रयत्नातून ही घटना घडली असावी असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे.

घराचे दरवाजे आतून बंद होते पण गच्चीवरील दरवाजा उघडा होता. यावरून चोरट्याने तिकडूनच प्रवेश केला असावा. तसेच ही घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली असावी. कारण भारती ह्या झोपण्याआधीच चोरटा घरात घुसला असावा व त्यांच्यात झटापट झाली असावी. दरम्यान, यात नेमके किती दागिने आणि रोख रक्कम लंपास केली असावी याचा अंदाज अजून आलेला नाही.

सांगे पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठवून दिला आहे.