मिशन सत्तरीसाठी केजरीवाल गोव्यात

0
15

दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचे काल दुपारी गोव्यात आगमन झाले. आपल्या ह्या गोवा भेटीत ते मिशन सत्तरी फत्ते करणार आहेत, अशी माहिती काल आम आदमी पक्षाच्या सूत्रांनी दै. नवप्रभाशी बोलताना दिली.

केजरीवाल हे आज बुधवारी तपोभूमीवर जाऊन ब्रह्मानंद स्वामीच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. यावेळी ते ब्रह्मेशानंद स्वामींची भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते आपला मोर्चा सत्तरीकडे वळवणार असून तेथे त्यांची सभा होणार आहे.

भाजपचे नेते विश्‍वजित कृष्णराव राणे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन आपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्‍वभूमीवर केजरीवाल यांचा हा सत्तरी दौरा होत आहे.
या दौर्‍यात ते वाळपई आणि पर्ये मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. संध्याकाळी विश्‍वजित कृष्णराव राणे हे केजरीवाल यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे आपमध्ये प्रवेश करणार आहेत.

टॅक्सी व्यावसायिकांशी आज होणार बैठक

आज बुधवार दि. १७ राज्यातील सर्व पर्यटक टॅक्सी व्यावसायिकांबरोबर गोवा दौर्‍यावर आलेले आपचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची बैठक होणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे काल मंगळवारी दुपारी दाबोळी विमानतळावर आगमन होताच त्यांचे गोवा आम आदमी पक्षाचे मुख्य निमंत्रक राहुल म्हांबरे, माजी आमदार महादेव नाईक, कळंगुटचे पंच सुदेश मयेकर, सुनील लॉरेन, परशुराम सोनुर्लेकर व कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यावेळी महादेव नाईक यांनी, राज्य सरकारने सरकारी नोकरीचे आमिष दाखवून एका प्रकारे राज्यातील युवकांना फसवण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका केली.

निमंत्रक राहुल म्हाबरे यांनी, दिल्लीप्रमाणे गोव्यातही आप आश्‍वासने पूर्ण करणार असल्यामुळे गोव्यात आप यश संपादन करणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला.