‘सहारा’ ने मोदींना लाच दिल्याचा राहुल यांचा जाहीर सभेत आरोप

0
103

>> भाजपाने आरोप फेटाळले

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक भ्रष्टाचाराचा आरोप करणारे कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काल गुजरातमधील मेहसाना येथील सभेत त्यासंदर्भात काही तपशील जाहीर केला. मात्र, भाजपाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
हार्दिक पटेल याच्या पटिदार अनामत आंदोलन समितीच्या उग्र आंदोलनामुळे काही काळापूर्वी चर्चेत आलेल्या मेहसानामध्ये राहुल यांनी जाहीर सभेत मोदींवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. सहारा कॉर्पोरेशन या कंपनीच्या अधिकार्‍यांच्या डायरीत श्री. मोदी यांना ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना सहा महिन्यांच्या काळात लाच दिल्याचा दावा राहुल यांनी केला. आयकर खात्याने २२ नोव्हेंबर २०१४ रोजी टाकलेल्या छाप्यात ही बाब स्पष्ट झाली होती, परंतु सरकारने त्याबाबत काहीही कारवाई केली नाही, असेही गांधी यांनी सांगितले.
३० ऑक्टोबर २०१५ रोजी अडीच कोटी, १२ नोव्हेंबर २०१३ रोजी पाच कोटी, २७ नोव्हेंबर २०१३ रोजी अडीच कोटी, १३ नोव्हेंबर २०१३ रोजी पाच कोटी, ६ डिसेंबर २०१३ रोजी पाच कोटी, १९ डिसेंबर २०१३ रोजी पाच कोटी, १३ जानेवारी २०१४ रोजी पाच कोटी आणि २२ फेब्रुवारी २०१४ रोजी पाच कोटी अशी रक्कम मोदी यांना देण्यात आल्याचा दावा राहुल यांनी केला. आपले पैसे बँकेत जमा व्हावेत व त्याद्वारे धनदांडग्यांची थकित कर्जे माफ करता यावीत असा मोदींचा प्रयत्न असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चारही राहुल यांनी या सभेत केला. एखादा शेतकरी जेव्हा कर्ज घेतो किंवा एखादा मध्यमवर्गीय कर्ज घेतो तेव्हा त्याने ते फेडले नाही तर त्याला तुरुंगात पाठवले जाते, मग ह्या बड्या व्यक्तींवर कारवाई का होत नाही असा सवाल राहुल यांनी केला. शेतकरी बी बियाणे कार्डाने घेत नसतो. त्याला रोख रक्कम लागते. तीच त्यांच्याकडून हिरावून घेतली असल्याची टीका राहुल यांनी केली. राहुल गांधी यांच्या या आरोपांना फेटाळून लावताना भाजप नेते रवीशंकर प्रसाद यांनी ऑगस्टा वेस्टलँड भ्रष्टाचार प्रकरणापासून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठीच हे आरोप केले जात असल्याचा प्रत्यारोप केला.