लोकप्रतिनिधींना कचरा संबोधणे चुकीचे

0
100

>> विनय तेंडुलकरांची फालेरोंवर टीका

 

प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी आपल्या पक्षात आणखी किती कचरा आहे ते सांगावे, अशी मागणी करत भाजपचे प्रदेश अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी लोकप्रतिनिधींची कचरा अशी संभावना करणे चुकीचे असल्याची टीका काल केली. फालेरो यांनी परवा माविन गुदिन्हो हे भाजपात गेल्याने पक्षातील कचरा दूर झाला आहे, असे जे विधान केले होते त्या पार्श्‍वभूमीवर तेंडुलकर बोलत होते. लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींची अशा प्रकारे थट्टा व अपमान करणे हे योग्य नसल्याचे ते म्हणाले.
माविन हे कॉंग्रेसमध्ये असताना त्यांनी त्यांना कधीही कचरा म्हटले नव्हते असे सांगून माविन गुदिन्हो यांना फालेरो यांनी केलेले घोटाळे माहीत आहेत आणि म्हणूनच लुईझिन एवढी वर्षे गप्प होते व गुदिन्हो यांच्याविषयी काही बोलत नव्हते, असे तेंडुलकर म्हणाले.
कामतना बोलण्याचा हक्क नाही
लुईस बर्जर व खाण घोटाळा केलेले कॉंग्रेसचे आमदार दिगंबर कामत यांना भाजपवर टीका करण्याचा अधिकार नाही. कुठल्या बांधकाम व्यावसायिकाचे ते पार्टनर आहेत तेही आम्हाला माहीत आहे, असे तेंडुलकर म्हणाले. लुईझिन यांना तर २००६ साली गोमंतकीय जनतेने तडीपार केले होते. त्यानंतर ते ईशान्येकडील राज्यात जाऊन राहिले होते. आता त्यांना गोव्याचे मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पडू लागलेली आहेत. जे आपल्या पक्षातील आमदारांना सांभाळू शकत नाहीत ते गोवा काय सांभाळणार, असा सवालही तेंडुलकर यांनी यावेळी दिला.