सहस्रकाची हाक

0
26
  • प्रा. रमेश सप्रे

अशा वेळी स्वामी विवेकानंदांचे शक्तिदायी, सकारात्मक विचार खूप प्रभावी ठरणारे आहेत. त्यांच्या ओजस्वी वाणीतून जी सिंहगर्जनेसारखी व्याख्यानं प्रकटली, त्यातूनच मारली गेली ‘सहस्रकाची हाक!’ सारं काही बदललं तरीही कायम राहिला स्वामी विवेकानंदांचा संदेश जो आजही कालसंगत आहे.

अवघड वाटतंय हे लेखाचं शीर्षक? अन् काहीसं जुनंही? हो! तसं ते आहेही. हे एका इंग्रजी पुस्तकाचं नाव आहे- ‘कॉल ऑफ दि मिलेनियम्’; जे प्रकाशित केलंय मराठीत भावानुवाद करून ‘विवेकानंद केंद्र, पुणे’ या संस्थेने. ‘विवेकानंद केंद्र’ ही एक संस्था नाही किंवा केवळ संघटना नाही; ती आहे एक वैचारिक चळवळ, एक क्रांतिकारी व्यासपीठ नव्या युगधर्माच्या प्रसाराचं. विचार अर्थातच स्वामी विवेकानंदांचे!

एकविसावं शतक सुरू झालं तेव्हा तिसरं सहस्रकही सुरू झालं. १९०२ साली घेतलेल्या स्वामी विवेकानंदांच्या महासमाधीची शताब्दी ज्या वर्षी (२००२) सार्‍या जगात साजरी केली जात होती त्याच वर्षी हे पुस्तक प्रकाशित केलं गेलं, एका सामाजिक विचारमंथनासाठी. अशा मंथनातून निघालेलं सारभूत नवनीत ‘सहस्रकाची हाक’ या स्वरूपात सादर केलंय. सध्याच्या वाचन-मनन-चिंतनाच्या पडत्या काळातही स्वामीजींच्या प्रभावी विचारसूत्रांचं ओझरतं दर्शन घ्यायला काय हरकत आहे?
सर्वप्रथम एक गोष्ट ध्यानात ठेवायला हवी की इथून पुढच्या काळासाठी संपूर्ण जगाला- मानवजातीला- सुयोग्य मार्गदर्शन करणारे विधायक विचार स्वामी विवेकानंदांचे आहेत.
या पुस्तकाचं मुखपृष्ठ अतिशय बोलकं नि प्रेरक आहे. पृथ्वीच्या पाठीवर पुरुषार्थाचे प्रतीक असलेले उभे स्वामी विवेकानंद आपल्या नेहमीच्या शैलीत उजवं पाऊल पुढं टाकलेले- चरैवेति… चरैवेति म्हणजे ‘पुढे चला… चालत रहा’ असा अमर संदेश देणारे याच्या पार्श्‍वभूमीला आहे. सूर्यमंदिराचं रथचक्र- कालचक्राचं प्रतीक.
तुम्हाला वाटेल सहस्रक आता जुनं झालं. काळाच्या पोटात गेला तो नववर्ष- नवशतक- नवसहस्रक यांच्या आरंभी (१ जानेवारी २०००) जगभर साजरा झालेला काहीसा उन्मादी उत्सव. खरंतर तमाशा. कालचक्र इतक्या गतीनं फिरतंय की एक पंचमांश एकविसावं शतक संपलंसुद्धा. संपूर्ण जगात, सर्व देशांत घटनाचक्रही तितक्याच गतीनं फिरतंय. यामुळे सर्व क्षेत्रांत नवे नवे प्रश्‍न, नव्या समस्या, नवी आव्हानं निर्माण होताहेत.

अशा वेळी स्वामी विवेकानंदांचे शक्तिदायी, सकारात्मक विचार खूप प्रभावी ठरणारे आहेत. त्यांच्या ओजस्वी वाणीतून जी सिंहगर्जनेसारखी व्याख्यानं प्रकटली, त्यातूनच मारली गेली ‘सहस्रकाची हाक’- जशी कविराज केशवसुतांनी नव्या युगाची फुंकलेली तुतारी!
बदलत्या काळात नीतिमूल्यांची पडझड सुरू झाली. सारं सारं खूपच बदललं तरीही कायम राहिला स्वामी विवेकानंदांचा संदेश जो आजही कालसंगत आहे, उपयुक्त आहे.
एक विचित्र योग पहा…

  • ११ सप्टेंबर १८९३ ः विवेकानंद अमेरिकेतील शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेत सांगत होते- ‘मानवता’ हा एकच धर्म आहे सार्‍या मानवजातीसाठी. आपल्या-आपल्या धर्माचा संकुचित अभिमान सर्वविद्ध्वंसक आहे.
  • ११ सप्टेंबर २००१ ः त्याच अमेरिकेत स्वतःच्या धर्माच्या अतिरेकी अभिमानातून न्यूयॉर्कमधले उंच जुळे मनोरे जे अमेरिकेच्या अभिमानाचं प्रतीक होतं- जमीनदोस्त केले गेले. यावरून असं वाटेल की, स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा हा पूर्ण पराभव होता. पण ते विचार पराभूत न होता अधिकच तेजानं तळपू लागले.
    त्या विचारांचा मागोवा घेऊन स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असलेली जीवनशैली स्वीकारूया. निदान स्वतःच्या व्यक्तिगत जीवनात तरी विवेकानंदांच्या मार्गदर्शनाचा प्रयोग करूया.
  • मानवाची जडणघडण (माणुसकीची) ः हा सार्‍या शिक्षणाचा प्राण आहे. राष्ट्राचा विकासही अशा शिक्षणातूनच होतो. आधी चांगला माणूस, मग समर्थ नेता, कुशल डॉक्टर, कार्यक्षम कर्मचारी इ. हे सूत्र आजही आवश्यक नाही का?
  • धर्म म्हणजे केवळ तत्त्वं नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभव ः यासाठी स्वामीजींचा एक अर्थपूर्ण शब्दप्रयोग होता- व्यावराहिक वेदांत. याच्या अभावामुळेच आपल्या समाजात अस्पृश्यतेसारख्या कुप्रथा, अंधश्रद्धा अस्तित्वात आल्या.
  • शिवभावे जीवसेवा ः हा खास सद्गुरू रामकृष्ण परमहंसांनी दिलाला जीवनमंत्र होता. अगदी मुकी जनावरं, वृक्षवल्ली यांचीही त्यांच्यात शिवतत्त्व आहे या भावनेनं सेवा करायची. मानवाच्या बाबतीत तर दरिद्रीनारायणाची सेवा, ‘मानवसेवा हीच माधवसेवा’ हे सूत्र महत्त्वाचं आहे. स्वामीजींच्या सर्व शिकवणीचा नि कार्याचा मूलाधार ‘सेवा’ हाच आहे.
    दान ः यासंदर्भात स्वामीजींचेच शब्द पाहूया ः कलियुगात एकच कर्म शिल्लक आहे. यज्ञ, कठोर तपस्या आज उपयोगाची नाही. आज दान हेच एकमात्र कर्म उरलं आहे. या दानामध्ये धर्माचे (सत्यधर्माचे) दान (धर्मतत्त्वाचं व्यवहारासह शिक्षण, आध्यात्मिक ज्ञानाचे प्रत्यक्ष अनुभवासह) सर्वोच्च आहे. यानंतर जीवदान (जीवनदान, समयदान), तसेच अन्नदानही मोलाचं आहे.
  • राष्ट्रभक्ती ः स्वामीजींनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितलं ः पाश्‍चात्त्य देशात जाण्यापूर्वी मी भारतमातेचा आदर करत होतो. पण विदेशातील निरीक्षण नि स्वानुभवानंतर भारतदेवतेविषयी माझ्या मनात पूज्यभावना निर्माण झाली. खर्‍या देशभक्तीसाठी तीन गोष्टी आवश्यक आहेत- प्रथमतः हृदयाची तळमळ. देशातील परिस्थिती, बहुसंख्य जनतेची दुःस्थिती पाहून हृदय पिळवटून गेलं पाहिजे. केवळ सहानुभूती नको. दुःखीजनांच्या अनुभवाची समानुभूती हवी. दुसरी गोष्ट म्हणजे केवळ पोकळ बडबड न करता प्रत्यक्ष कार्य करण्याची तयारी. निदान जनतेच्या अडचणीत त्यांना समुपदेशन नि त्यांचं सांत्वन करण्याची क्षमता असली पाहिजे. तिसरी पायरी म्हणजे बहुजन समाजाला त्याच्या सध्याच्या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी निश्‍चित अशी योजना, कार्यप्रणाली तयार केली पाहिजे नि त्यानुसार कार्यवाही झाली पाहिजे.

स्वामी विवेकानंदांना सिंहासारख्या छातीचे (पराक्रमी) आणि पोलादी स्नायूंचे (सामर्थ्यवान) फक्त शंभर युवक हवे होते- त्यांच्या स्वप्नातला भारत साकारण्यासाठी! उमलत्या या युवकांत होते प्रल्हाद नि ध्रुव, नाचिकेता नि मैत्रेयी, एकलव्य नि अभिमन्यू… असे ‘भगीरथ’ त्यांना मिळाले काय?