सहकारी आमदारांवर मुख्यमंत्र्यांची सेन्सॉरशीप

0
109

>> अमली पदार्थ वक्तव्य प्रकरणी कॉंग्रेसची टीका

अमली पदार्थ प्रकरणी पोलिसांवर टीका करू नका, असा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांना जो आदेश दिलेला आहे तो आदेश म्हणजे एक प्रकारची सेन्सॉरशीपच आहे, अशा शब्दांत काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या वरील फतव्यामुळे आपणाला आश्‍चर्याचा धक्काच बसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आपल्या फाईलवर तसा शेरा मारून पर्रीकर यांनी सही केली आहे, अशी आपणाला माहिती मिळाली असल्याचे नाईक यांनी पुढे म्हटले आहे. अमली पदार्थ व्यवहारातील माफियांवर छापे मारण्यासाठी पोलिसांना प्रोत्साहित करायला हवे, ह्या मताचा आपणही असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले आहे. गोवा पोलिसांविषयी आपणाला आदर आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या कृतीमुळे पोलिसांचेही एकाप्रकारे खच्चीकरणच होणार असल्याचे नाईक म्हणाले.
विरोधी पक्ष नेतेपदी असताना पर्रीकर हे अमली पदार्थ प्रकरणी तत्कालिन गृहमंत्री रवी नाईक यांच्यावर जहाल टीका करीत होते. मात्र, आता त्यांना त्याचा विसर पडला असावा, असे नाईक यांनी म्हटले आहे.