सलग दुसर्‍या दिवशी ६ कोरोना बळी

0
8

राज्यात चोवीस तासांत नवीन २५२२ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तसेच आणखी ६ कोरोना बळींची नोंद झाली आहे. राज्यात बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ४५.७८ टक्के एवढे आहे.

गेल्या चोवीस तासांत नवीन ५५०८ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील २५२२ नमुने बाधित आढळून आले. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या २१ हजार ९९७ एवढी झाली आहे. दक्षिण गोवा इस्पितळात एका कोरोना बाधिताचा इस्पितळात दाखल केल्यानंतर तासाभरात मृत्यू झाला.

गोमेकॉमध्ये एका कोरोना बाधिताचा इस्पितळात दाखल केल्यानंतर २४ तासांत मृत्यू झाला. गेल्या चोवीस तासांत ४४ जणांना इस्पितळांत दाखल करून घेण्यात आले असून बरे झालेल्या २८ जणांना इस्पितळातून घरी पाठविण्यात आले आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी २४७६ जण कोरोनामुक्त झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.१२ टक्के एवढे आहे.

बळींपैकी दोघेजण लसीकरणाविना
कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत कोरोना बळींच्या संख्येत वाढ होत आहे. बांबोळी येथील गोमेकॉमध्ये गेल्या २४ तासांत ५ कोरोनाबाधितांचा बळी गेला, तर दक्षिण गोवा इस्पितळात एका बाधिताचा बळी गेला. कोरोनाने बळी घेतलेल्या दोघांनी कोविड लसीचा डोस घेतला नव्हता. तिघांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेतले होते, तर, एकाने कोविड लसीचा एक डोस घेतला होता. मृतांमध्ये मांद्रे येथील ७९ वर्षीय पुरुष, कांदोळी येथील ८४ वर्षीय पुरुष, फोंडा येथील ५८ वर्षीय पुरुष, वास्को येथील ६५ वर्षीय पुरुष, दवर्ली येथील ४८ वर्षीय महिला आणि ओर्ली येथील ६४ वर्षीय महिलेचा समावेश आहे.