सर्वोच्च न्यायालयाकडून स्वेच्छा दखल

0
31

>> लखीमपूर खीरी हिंसाचारप्रकरण

>> आज होणार सुनावणी

>> अद्याप कोणालाही अटक नाही

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरीमधील हिंसाचार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वेच्छा दखल घेतली आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांचे खंडपीठ आज गुरूवारी या प्रकरणी सुनावणी करणार आहे. या खटल्याला ‘व्हायलन्स इन लखीमपूर खीरी लीडिंग टू लॉस ऑफ लाइफ’ असे नाव दिले गेले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली हे या खंडपीठाचे सदस्य आहेत.

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी जिल्ह्यातील तिकोनिया भागात रविवारी झालेल्या हिंसाचारात चार शेतकर्‍यांसह एकूण ८ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषसह १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. अजय मिश्रा यांच्या मूळ गावात कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. यावेळी मंत्र्यांच्या विरोधात शेतकर्‍यांनीही आंदोलन सुरू केले. शेतकरी तिकोनिया परिसरात आंदोलन करत होते, तेव्हा अजय मिश्रा यांच्या मुलाच्या कारने शेतकर्‍यांना चिरडले. यामुळे हिंसाचार भडकला, असा आरोप आंदोलक शेतकर्‍यांनी केला आहे. तर केंद्रीय मंत्री मिश्रा यांनी घटनास्थळी आपला मुलगा त्यावेळी व दिवसभर तिथे उपस्थित नसल्याचा दावा करत आंदोलकांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

लखीमपूरला खीरी येथे
राहुल, प्रियांका पोहोचले

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे सीतापूरहून लखीमपूर खीरी येथे पोहोचले. त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे असून हे नेते लखीमपूर हिंसाचारात मृत्यू झालेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना भेटणार आहेत. राहुल गांधी यापूर्वी प्रियांका गांधींना भेटण्यासाठी सीतापूरला पोहोचले. प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश प्रशासनाने सीतापूरमधील पीएसी गेस्ट हाऊसमध्ये अटक करून नजरकैदेत ठेवले होते. तेथून त्यांची काल सुटका करण्यात आली.
राहुल गांधी सर्वप्रथम हिंसाचारात मृत्यू झालेल्या पत्रकार रमण कश्यप यांच्या घरी जातील. यानंतर हिंसाचारात मृत्यू झालेल्या शेतकरी लव्हप्रीत सिंग आणि नछत्तर सिंह यांच्या कुटुंबीयांची भेट घेतील.

उत्तरप्रदेशातल्या लखीमपूर खीऱी भागात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह अन्य तीन नेत्यांना घटनास्थळी जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. लखनौकडे रवाना झालेले राहुल गांधी, सीतापूर इथे बंदिस्त असलेल्या प्रियांका गांधी तसेच इतर तीन कॉंग्रेस नेत्यांना लखीमपूर खीरीला भेट देण्यास परवानगी दिल्याची माहिती उत्तरप्रदेश सरकारच्या गृहमंत्रालयाने दिली.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी जिल्ह्यातील हिंसाचाराच्या ठिकाणी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी या पाहणी करण्यास जात होत्या. त्यावेळी तेथील पोलिसानी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांना लखनऊमधल्या सीतापूर इथल्या विश्रामगृहात बंदिस्त करण्यात आले होते.

काल सकाळी कॉंग्रेसतर्फे एक रितसर पत्र हे उत्तर प्रदेश सरकारला लिहिण्यात आले होते. अखेर उत्तर प्रदेश सरकारने प्रियंका गांधी, राहुल गांधी आणि कॉंग्रेसच्या इतर तीन नेत्यांना लखीमपूर खेरी भागात जाण्याची परवानगी दिली. त्यानुसार राहुल गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल हे लखीमपूर येथे पोहोचले.

सचिन पायलट यांना नाकारली परवानगी
लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी राजस्थान कॉंग्रेसचे नेते सचिन पायलट हे भेट देण्यास जात असताना त्यांना तेथे जाण्यास परवानगी देण्यात आली नाही. त्यांच्यासोबत असलेले आचार्य प्रमोद कृष्णन यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

ती कार आमची, मंत्र्यांची कबुली
पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणतोय की शेतकर्‍यांना चिरडणारी ती थार कार आमची आहे. ती आमच्या नावाने नोंदणीकृत आहे. ही कार काही कार्यकर्त्यांना घेऊन कोणाला तरी आणण्यासाठी जात होती. मात्र घटनास्थळी आमचा मुलगा नव्हता असे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणी आशिष मिश्राविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आशिष मिश्राच्या अटकेची शेतकरी नेत्यांनी मागणी केली होती. दरम्यान, आशिष मिश्रासह शेतकर्‍यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

११ ऑक्टोबर रोजी
महाराष्ट्र बंदची हाक

उत्तर प्रदेशमधील लखीमपूरमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. अत्यावश्यक सेवा सोडून हा बंद असणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वतीने नेते एकनाथ शिंदे, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.