सराफाच्या खूनप्रकरणी तिघे जेरबंद

0
358

>> अजून दोन फरारी, गुन्हा अन्वेषण विभागाकडून १२ तासांत कारवाई

मडगाव येथील कृष्णी ज्वेलर्स या सराफी दुकानाचे मालक स्वप्निल वाळके यांच्या खूनप्रकरणी पणजीच्या गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तगुरू सावंत यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने पणजी येथे गुरूवारी पहाटे फिल्मी स्टाईलने ओंकार पाटील व एडिसन गोन्साल्विस या दोन संशयितांना पकडले. तर दुपारी मुख्य आरोपी मुस्तफा शेख हा शरण आला. ताब्यात घेतलेले तिघेही कुप्रसिद्ध गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत. दरम्यान, या प्रकरणातील आणखी दोघे संशयित फरारी आहेत. या प्रकरणी हल्लेखोरांनी वाळके यांच्या दुकानासमोर उभी करून ठेवलेली बॉलेरो जीप मडगाव पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. गुन्हा अन्वेषण विभागाने बारा तासांच्या आत संशयितांना कारवाई करत ताब्यात घेतले. दक्षिण गोव्याच्या पोलिसांनी तपास सुरू करताना रात्री दक्षिण गोव्याच्या सीमा सील केल्या होत्या.

सांताक्रूझमधून संशयित ताब्यात
बुधवारी स्वप्निल यांच्यावर हल्ला केल्यानंतर तेथून उघड्या अंगाने पळालेला मुस्ताफा शेख होता हे काल उघड झाले होते. गुन्हे अन्वेषण विभागाने याप्रकरणी मुस्ताफा याचा मित्र ओंकार पाटील याच्यावर लक्ष ठेवले होते. ओंकार याला सांताक्रुझ पणजी येथील दुकानाजवळून ताब्यात घेतले. उशिरा रात्रीपर्यंत त्याची चौकशी चालू ठेवून मुस्तफा आणि इतर घटनांबाबत माहिती जाणून घेतली. शेवटी ओंकार याने स्वत: बॉलेरो जीपची चोरी केल्याचे सांगितले. जीप खून केलेल्या जागी असल्याचे सांगताच त्याला घेऊनच पोलीस मडगावात आले व जीप ताब्यात घेतली. त्याच्याच माहितीवरून पोलिसांनी एडविन यालाही ताब्यात घेतले.

मडगाव-पणजी मुस्ताफाचा पाठलाग
दरम्यान, हल्ल्यानंतर मुस्ताफा हा मडगाव येथून कदंब बसने पणजीला निघाला होता. पण त्याला पोलीस आपल्या पाठोपाठ येत असल्याचे समजताच कदंबमधून उतरून भाड्याच्या मोटरसायकलने तो पणजीत आला. ही माहिती या पथकाला मिळेपर्यंत मुस्ताफा पुन्हा कदंब बसने मडगावला जायला निघाला होता. गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने त्याचा पुन्हा पाठलाग सुरू केला. अधीक्षक शोभीत सक्सेना यांनी नावेली येथील मुस्तफाच्या घरच्यांवर दबाव टाकला त्यामुळे शेवटी मुस्तफा हा पोलिसांना शरण आला. या खुनाची सर्व माहिती पथकाने ओंकार पाटील याच्याकडून वदवून घेतली. ओंकार याने या खूनप्रकरणी स्वत: सामील असल्याचे सांगितले. पोलीस पकडतील या भीतीनेच ओंकार तातडीने पणजीला येऊन पोहोचला होता.

१२ तासांत हल्लेखोर ताब्यात
या खूनप्रकरणातील संशयितांना पकडण्यात गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तगुरू सावंत, हवालदार दिनेश पिकुळकर, पोलीस शिपाई विनय श्रीवास्तव, नवीन पालयेकर, कल्पेश शिरोडकर आणि श्री. परब यांनी यश मिळविले. उपअधीक्षक सुनिता सावंत या घटनाक्रमावर सातत्याने लक्ष ठेवून होत्या. अधीक्षक शोभित सक्सेना यांच्या अचूक मार्गदर्शनाखाली केवळ १२ तासांच्या आत हल्लेखोर ताब्यात आले.

स्वप्निल वाळकेंवर अंत्यसंस्कार
दरम्यान, दुपारी मृत स्वप्नील वाळके याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कुंटुंबीयांवर फार मोठी शोककळा पसरली असून मित्रमंडळीमध्ये दु:खाचे सावट पसरले आहे. या घटनेमुळे सराफी दुकान मालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले दिसले.
मडगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक रूपेश महात्मे यांनी पोलिसांनी बारा तासाच्या आत खुन्यांना गजाआड केल्याबद्दल पोलिसांचे व गृहमंत्र्यांचे अभिनंदन केले.

निःपक्षपाती चौकशीची
मडगाव पालिकेतील कॉंग्रेसचे सहा नगरसेवक डोरीस टेक्सेरा, अविनाश शिरोडकर, श्रीमती शरद प्रभुदेसाई, दीपा शिरोडकर, मनोज मसुरकर, दामोदर नाईक व माजी नगरसेवक दामोदर शिरोडकर यांनी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांना एक पत्र दिले असून निःपक्षपातीपणे या प्रकरणाची चौकशी करण्याची व स्वप्निलच्या खुन्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

पत्रकारांना बंदी
गुरूवारी दुपारपासून सायंकाळी उशीरापर्यंत प्रिंट मीडिया व इलेट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी मडगाव पोलीस स्थानकाबाहेर चार तास पोलीस माहिती देतील म्हणून वाट पाहात उभे होते. पत्रकारांना पोलीस स्थानकावर जाण्यास पोलीस अधीक्षक पंकज कुमार यांनी बंदी घातली होती. शेवटी ७ वा. माहिती देण्यास त्यांनी असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे पत्रकारांनी संताप व्यक्त केला.

खूनप्रकरणी संशयितांची गय नाही ः मुख्यमंत्री
मडगाव येथील सोन्याचे व्यापारी स्वप्निल वाळके यांच्या खून प्रकरणी चोवीस तासांत पाचपैकी तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. या खून प्रकरणात गुंतलेल्याची गय केली जाणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे काल दिली. मुख्यमंत्र्यांनी स्वप्निल वाळके यांच्या दिवसाढवळ्या झालेल्या खुनाबाबत दुःख व्यक्त केले. या खून प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून गुन्हा अन्वेषण विभागाने चोवीस तासात तिघांना पकडण्यात यश मिळवल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हटले आहे.

कायदा, सुव्यवस्था सुधारण्यास
प्राधान्य द्यावे ः चोडणकर
राज्यातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी प्राधान्य देण्याची मागणी पोलीस महासंचालक मुकेशकुमार मिना यांच्याकडे करण्यात आली आहे, अशी माहिती गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. गोवा प्रदेश कॉंग्रेसच्या एका शिष्टमंडळाने मडगाव येथील सराफाच्या खून प्रकरणी पोलीस महासंचालक मुकेशकुमार मिना यांची भेट घेतली असून मडगाव येथील मोती डोंगरावर गुन्हेगार राहत असल्यास त्यांना पोलिसांनी शोधून काढावे, असेही चोडणकर यांनी सांगितले.

तपासकार्यात गुन्हा अन्वेषण
विभागाची महत्त्वाची भूमिका
गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने मडगाव येथील सराफ स्वप्निल वाळके यांच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक शोभित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली मडगावातील सराफाच्या खून प्रकरणी तपासासाठी खास पथक नियुक्त करण्यात आले होते.
पोलीस महासंचालकांकडून स्वप्निल वाळके यांच्या खुनाच्या तपासात महत्त्वाची भूमिका निभावलेल्या पोलीस निरीक्षक दत्तगुरू सावंत, पोलीस निरीक्षक जिवबा दळवी आणि पोलीस निरीक्षक फिलोमेना कोस्ता आणि टीमचा गौरव केला जाणार आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांकडून मिळाली.