लष्करप्रमुख नरवणे लडाखमध्ये

0
299

>> पँगॉंग सरोवरादरम्यान भारत-चीनमध्ये तणाव

पूर्व लडाखमधील पँगॉंग टीएसओ सरोवर परिसरात भारत-चीनचे सैन्य समोरासमोर असून तेथे प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे हेकाल गुरूवारी सकाळी लडाखमध्ये दाखल झाले.

पँगॉंग सरोवरच्या दक्षिण किनार्‍यावर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने २९-३० ऑगस्टच्या रात्री अचानक घुसखोरी करत एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय जवानांनी त्यांचा डाव उधळत त्यांना माघार घेण्यास भाग पाडले. त्याचवेळी भारताच्या स्पेशल फ्रंटियर फोर्सने दक्षिण किनार्‍याजवळच्या महत्त्वाच्या टेकडया ताब्यात घेतल्या. त्यामुळे रणनितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांवर भारताचे नियंत्रण आहे. दरम्यान, यानंतरही चीनने घुसखोरीचे प्रयत्न केले पण भारतीय जवानांनी ते फोल ठरवले आहेत.

दरम्यान, मागच्या तीन दिवसांपासून दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकार्‍यांध्ये सुरू असलेली चर्चा निष्फळ ठरली आहे. चीन पँगॉंग परिसरातून मागे हटायला तयार नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. एप्रिलमध्ये फिंगर ८ पर्यंत असलेले सैन्य फिंगर ४ पर्यंत आले असून त्यांनी फिंगर ८ पर्यंत मागे हटावे ही भारताची मागणी आहे.

भारताला घेरण्यासाठी
चीनचे लष्करी तळ
दरम्यान, अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय पँटागॉनने चीनसंदर्भात भारताला इशारा देताना भारताच्या तीन शेजारी देशांबरोबरच चीन भारताच्या आजूबाजूच्या एक डझन देशांमध्ये आपले लष्करी तळ स्थापन करण्याच्या प्रयत्नात असल्याचे म्हटले आहे. भारताला घेरता यावे म्हणून हेे लष्करी तळ निर्माण करत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.