कौतुकास्पद!

0
323

मडगाव येथे स्वप्नील वाळके या तरुण सराफाच्या दिवसाढवळ्या झालेल्या निर्घृण हत्येने गोवा हादरला आहे. पोलिसांनी रातोरात कारवाई करून तिघा हल्लेखोरांपैकी दोघांच्या मुसक्या आवळल्या आणि आता आपली डाळ शिजणार नाही याची पूर्ण कल्पना आलेला तिसरा आरोपी निमूटपणे पोलिसांना शरण गेला. गोव्याला हादरवून सोडणार्‍या या खून प्रकरणाचा एवढ्या तत्परतेने तपास करून तिन्ही गुन्हेगारांना जेरबंद करण्याची पोलिसांची ही कामगिरी निःसंशय प्रशंसनीय आणि कौतुकास्पद आहे. परंतु अशा प्रकारे भर दिवसा भरवस्तीत, अगदी वर्दळीच्या परिसरात आणि पोलीस स्थानकापासून जवळ अशा प्रकारची घटना घडू शकते याचाच दुसरा अर्थ कायदा आणि सुव्यवस्थेचा राज्यात धाक उरलेला नाही असाही होतो आणि तीही निश्‍चित चिंतेची बाब आहे.
हत्या झालेला सराफ सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ महिला नेत्याचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे ही घटना घडताच भाजपचे सारे प्रमुख नेते तातडीने घटनास्थळी धावले. त्यामुळे पोलिसांवरही तत्पर कारवाईचा दबाव होता, त्यामुळे पोलिसांनी या हत्या प्रकरणाच्या तपासाला परमोच्च प्राधान्य देत वेगाने कारवाई करीत आरोपींना काही तासांत पकडले. परंतु केवळ आरोपी पकडले गेल्याने या घटनेवर पडदा पडत नाही.
ह्या हल्ल्यामागचा उद्देश काय, तो निव्वळ चोरीच्या उद्देशानेच झाला होता की सदर सराफावर काही व्यावसायिक दुष्मनीतून मारेकरी घातले गेले होते, या प्रश्नाचे उत्तरही शोधावे लागणार आहे. ज्या प्रकारे भरदिवसा भरवस्तीत त्या दुकानातील आणि परिसरातील सीसीटीव्हींचीही फिकिर न बाळगता हे आरोपी अत्यंत पूर्वनियोजनपूर्वक या दुकानात घुसून हल्ला चढवतात, ते पाहता ते एखाद्या सराईत गुन्हेगारी टोळीचे सदस्य आहेत का याचाही तपास आता व्हावा लागेल. या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू आलेले श्री. वाळके यांच्या धाडसाला दाद द्यावीच लागेल. स्वतःवर गोळी झाडलेली असताना आणि मानेवर सुर्‍याने सपासप वार झालेले असतानाही दुकानाबाहेर येत त्यांनी हल्लेखोरांचा मोठ्या धैर्याने पाठलाग केला आणि शेवटपर्यंत त्यांना पकडण्याची धडपड केली. आजूबाजूला जमलेल्या आणि मोबाईलवर या सार्‍या प्रसंगाचे चित्रण करीत बसलेल्या बघ्यांनी थोडे पुढे होऊन मदतीचा हात दिला असता तर हल्लेखोर जागीच पकडले गेले असते, परंतु ‘मला काय त्याचे’ ही सार्वत्रिक वृत्ती आहे आणि मडगाव शहरही त्याला अपवाद कसे असेल? हल्लेखोरांचा पाठलागदेखील झाला नाही, त्यामुळे त्यांना सर्वांच्या डोळ्यांदेखत दिवसाउजेडी पळून जाता आले. बघ्यांनाही दोष देणे कसा द्यावा, कारण शेवटी प्रत्येकाला स्वतःचा जीव प्यारा असतो आणि ‘त्यांनी यंव करायला हवे होते, त्यंव करायला हवे होते’ म्हणणारे स्वतः त्या ठिकाणी असते तर त्यांनीही निव्वळ बघ्याची भूमिकाच निभावली असती.
पोलिसांनी आरोपींना पकडले आहेच. सत्ताधारी पक्षाची नजर या प्रकरणावर राहणार असल्याने या प्रकरणी तपासकाम कसोशीने होईल आणि न्यायालयात टिकणारे सबळ साक्षीपुरावे होऊन आरोपींना त्यांच्या निर्घृण गुन्ह्याची शिक्षा होईल अशी आशा आहे. परंतु अशा घटना पुन्हा होऊ नयेत, गुन्हेगारांनी अशा प्रकारे डोके वर काढू नये यासाठी पोलिसांनी आपली यंत्रणा अधिक सक्षम आणि सक्रिय करणेही गरजेचे आहे. या आरोपींकडे गावठी पिस्तुल आणि काडतुसे कुठून आली? त्यांना कोणी पाठवले होते? हल्ला का झाला? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जनतेला हवी आहेत आणि त्याहून हवा आहे अशा घटना पुन्हा घडणार नाहीत हा दृढ विश्‍वास. सध्या सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अमली पदार्थ व्यवहाराचे धागेदोरे थेट गोव्यापर्यंत पोहोचलेले आहेत. पोलीस यंत्रणेच्या डोळ्यांदेखत हे व्यवहार होत आल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे. राज्यातील कोरोनाच्या थैमानात मोठा वाटा पोलिसांचा राहिला आहे हेही दिसून आले आहे. पोलीस दलाची प्रतिष्ठाच अशा घटनांमुळे पणाला लागत असते. त्यामुळे सर्वत्र गस्त वाढविणे असो, आपली गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम करणे असो, पोलिसांना कोरोनापासून संरक्षित करण्यासाठी साधने उपलब्ध करून देणे असो वा कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक राज्यात पुन्हा निर्माण करणे असो, या सर्व आघाड्यांवर अधिक व्यापक प्रयत्न झाले पाहिजेत हेच ही घटना अधोरेखित करते आहे!