सरणाऱ्या आर्थिक वर्षी हॉटेल उद्योग सावरला

0
10
  • शशांक मो. गुळगुळे

कोरोनाकाळात प्रचंड मंदीत गेलेला हॉटेल उद्योग 2022-23 या आर्थिक वर्षी बराच सावरला आहे. तरीही कोरोनापूर्वी 2019 साली या व्यवसायाचे जे आर्थिक व्यवहार होते व खोल्यांच्या बुकिंगचे प्रमाण होते ती पातळी मात्र या उद्योगाने अजून गाठलेली नाही.

भारतीय लोक सध्या वर्षअखेर साजरा करीत आहेत व गेल्या वर्षभरातही लोकांच्यात पर्यटनासाठी फार उत्सुकता होती. परिणामी कोरोनाकाळात प्रचंड मंदीत गेलेला हॉटेल उद्योग 2022-23 या आर्थिक वर्षी बराच सावरला आहे. तरीही कोरोनापूर्वी 2019 साली या व्यवसायाचे जे आर्थिक व्यवहार होते व खोल्यांच्या बुकिंगचे प्रमाण होते ती पातळी मात्र या उद्योगाने अजून गाठलेली नाही.
संघटित क्षेत्रातील हॉटेल उद्योगात साधारणपणे भारतभर 2 लाख ‘ब्रॅण्डेड’ खोल्या आहेत. यांपैकी सरासरी 63-65 टक्के खोल्यांचे बुकिंग या आर्थिक वर्षी झाले. 2022 च्या तुलनेत यात 5 टक्के वाढ झाली तरी 2019 च्या तुलनेत 1 ते 2 टक्के घट आहे. 2019 व 2022 च्या तुलनेत हॉटेल उद्योगाने दर वाढविले आहेत. चांगल्या ब्रॅण्डच्या हॉटेलमध्ये चालू वर्षी खोलीचा दर दिवसाला 7 हजार 200 ते 7 हजार 400 रुपये इतका होता. 2019 च्या तुलनेत यात 22 टक्के वाढ आहे, तर 2022 च्या तुलनेत 20 टक्के वाढ झालेली आहे. हॉटेल व्यवसायात 2019 च्या कॅलेंडर वर्षी म्हणजे जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत 5 हजार 850 कोटी रुपयांचे व्यवहार झाले, तर जानेवारी ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत 2 हजार 50 कोटी रुपयांचे व्यवहार झाले. डिसेंबरमध्ये व्यवहारात फार मोठी वाढ झाली. तारांकित हॉटेलच्या हॉटेल बुकिंगचे प्रमाण 2019 च्या तुलनेत यंदाचे प्रमाण 2.9 टक्क्यांनी कमी असून 2022 च्या तुलनेत जानेवारी ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत 3.4 टक्के वाढ आहे.

विदेशी पाहुणे फार मोठ्या प्रमाणावर आपल्या देशात आले पाहिजेत व भारतीयांनी परदेश पर्यटन करण्यापूर्वी पूर्ण भारत बघून घ्यायला पाहिजे ही आपल्या अर्थव्यवस्थेची गरज आहे. 2022 मध्ये संघटित हॉटेल उद्योगात नऊ हजार नऊशे नव्या खोल्यांची भर पडली होती, तर जानेवारी ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत 12 हजार 400 नव्या खोल्यांची भर पडली. यांपैकी 60 टक्के खोल्या टिअर-3 विभागात सुरू झाल्या, तर टिअर-2 विभागात 34 टक्के नव्या खोल्या कार्यरत झाल्या. टिअर-1 विभागात नव्या खोल्यांची तितकीशी गरज नाही, कारण येथे बरीच हॉटेलं आहेत व त्यांच्यात फार मोठी स्पर्धा आहे. या वर्षीच्या 11 महिन्यांत जास्तीत जास्त बुकिंग दिल्ली शहरात झाले. त्यानंतर क्रमाने हैद्राबाद, बेंगळुरू, मुंबई व नंतर चेन्नई असा क्रमांक लागला. या मोठ्या शहरांच्या हॉटेलांत कंपन्यांच्या पत्रकार परिषदा, त्यांच्या बैठका, उद्योगांच्या परिषदा, प्रदर्शने इत्यादी इत्यादी उपक्रम होत असतात. परिणामी महानगरांतील हॉटेलांचा पैशाचा ओघ चालूच राहतो.

गोव्यातील हॉटेलच्या खोल्यांचे दर महाग असून गोव्यात या कॅलेण्डर वर्षात हॉटेल उद्योगात आतापर्यंत 1 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय झाला. गोव्यात सध्या 900 हॉटेल खोल्या आहेत. भारतात मध्यमवर्गीय व उच्चमध्यमवर्गीय लोकांच्या ‘जेस्टिनेशन मॅरेज’चे फार मोठे फॅड आले आहे आणि ही ‘डेस्टिनेशन मॅरेज’ जास्तीत जास्त गोव्यालाच होतात. त्यामुळे गोव्यात सर्वत्र ‘डेस्टिनेशन मॅरेज‘साठी रिसॉर्ट बांधकाम फार मोठ्या प्रमाणावर प्रत्येक तालुक्यात सुरू आहे. या वर्षीच्या 11 महिन्यांत हॉटेल उद्योगात फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली. कोणलाही उद्योगात गुंतवणूक वाढणे हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने चांगले असते. याने अर्थव्यवस्थेला चालना मिळते. रोजगार वाढतात. या उद्योगात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांत 2 हजार 50 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. 2022 च्या तुलनेत गुंतवणुकीत 250 टक्के वाढ झाली. 2022 या उद्योगातील गुंतवणुकीचे प्रमाण 580 कोटी रुपये इतके होते.
भारतात 2019 मध्ये हॉटेलच्या खोल्या बुकिंगचे प्रमाण सरासरी 65 ते 67 टक्के होते. खोलीचा सरासरी दर 5 हजार 900 ते 6 हजार 100 रुपये होता, तर प्रत्येक उपलब्ध खोलीमागे सरासरी उत्पन्न 3 हजार 750 रुपये ते 4 हजार रुपये इतके होते. 2022 मध्ये खोल्या बुकिंगचे सरासरी प्रमाण 59 ते 61 टक्के होते. खोलीचा सरासरी दर 6 हजार ते 6 हजार 200 रुपये होता, तर प्रत्येक खोलीमागे सरासरी उत्पन्न 3 हजार 500 ते 3 हजार 700 रुपये होता. जानेवारी-नोव्हेंबर 2023 मध्ये खोल्यांचे सरासरी बुकिंग 63 ते 65 टक्के होते. खोल्यांचा सरासरी दर 7 हजार 200 ते 7 हजार 400 रुपये होता, तर खोलीमागे उत्पन्नाचे सरासरी प्रमाण 4600 ते 4 हजार 800 रुपये होते.
प्रत्येक खोलीच्या उत्पन्नामध्ये 2023 मध्ये अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत झालेली विविध शहरांतील टक्केवारीतील वाढ ः दिल्ली- 57, हैदराबाद- 43, चेन्नई- 39, मुंबई- 37, बेंगळुरू- 33, पुणे- 24 व गोवा- 18. हॉटेल उद्योगात 2019 मध्ये 5 हजार 844 कोटी रुपयांची उलाढाल झाली होती, तर 2022 मध्ये हे प्रमाण घसरून 581 कोटी रुपयांची झाली होती. 2023 च्या पहिल्या अकरा महिन्यांत याचे प्रमाण 2050 कोटी रुपये इतके होते.

‘यूपीआय’मुळे भारतात अर्थक्रांती
भारतात ‘यूपीआय’ने व्यवहार करता येतात. या व्यवहारात प्रत्यक्ष कॅश द्यावी किंवा घ्यावी लागत नाही हे प्रत्येकालाच आतापर्यंत माहीत झालेले असणार. ‘यूनिफाइड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय) ही प्रणाली खूप सरळ व सोपी आहे. ही प्रणाली वापरण्यासाठी आपले बँकेतले खाते यूपीआय मोबाईल ॲप्लिकेशनशी जोडावे लागते. यातून ‘सीमलेस फंड राउटिंग’द्वारे पैसे पटकन पाठवता येतात. ‘यूपीएस’ हा निधी हस्तांतराचा पर्याय. यूपीएस कार्यान्वित होण्यापूर्वी आरटीजीएस, एनईएफटी तसेच आयएमपीएस या प्रणालींद्वारे निधी हस्तांतरण करता येत होते. 2016 मध्ये नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनच्या स्थापनेनंतर ‘यूपीआय’ पद्धत आली. ‘यूपीआय’द्वारे सध्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार होतात. गेल्या सप्टेंबर महिन्यात ‘यूपीआय’द्वारे 10.56 अब्ज व्यवहार झाले. या व्यवहारांचे मूल्य साधारणपणे 15.80 लाख कोटी रुपये इतके होते. यात व्यक्ती ते व्यापारी स्वरूपाचे व्यवहार करता येतात.
भारतात रोखीत व्यवहार कमी होत असून, डिजिटल व्यवहार वाढत आहेत. यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसू शकतो. ‘एनपीसीआय’च्या अहवालानुसार ऑगस्ट व सप्टेंबर 2023 मध्ये ‘फोन पे’ या ॲपद्वारे सुमारे 5 अब्ज (एकूण व्यवहाराच्या 47 टक्के), ‘गुगल पे’द्वारे 3.8 अब्ज, तर ‘पेटीएम’द्वारे 1.5 अब्ज व्यवहार झाले.

यूपीआय व्यवहार
महिना ‘यूपीआय’द्वारे व्यवहार संख्या व्यवहार मूल्य
व्यवहार करणाऱ्या (अब्ज) (लाख कोटी)
बँकांची संख्या
जानेवारी 2023 385 8.03 12.99
फेब्रुवारी 2023 390 7.53 12.36
मार्च 2023 399 8.68 14.10
एप्रिल 2023 414 8.90 14.07
मे 2023 445 9.41 14.89
जून 2023 458 9.34 14.75
जुलै 2023 473 9.96 15.34
ऑगस्ट 2023 484 10.59 15.76
सप्टेंबर 2023 492 10.56 15.80

यूपीआय व्यवहार किंवा पेमेंटसाठी वेगळे बँक खाते वापरावे. ‘यूपीआय’साठीच्या बचत खात्यात जास्त पैसे ठेवू नयेत. जेवढे आवश्यक असतील तेवढेच पैसे ठेवावेत. ‘यूपीआय’ म्हणजे खर्च. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे करावे. ‘पूपीआय’चा पिन क्रमांक थोड्या-थोड्या महिन्यांनी बदलत राहावा. परिणामी दुसरी कोणी व्यक्ती त्यातून व्यवहार करू शकणार नाही. मोबाईल फोनद्वारे ‘यूपीआय’ व्यवहार करीत असाल तर शक्यतो मोबाईल दुसऱ्याच्या हाती देऊ नका. ‘यूपीआय’द्वारे कोणते व्यवहार करायचे व कोणते करायचे नाहीत हे निश्चित ठरवा. एकापेक्षा अधिक बँका एकाच ‘यूपीआय’ क्रमांकाला संलग्न करू नका.
‘यूपीआय’ प्रणाली ही नक्कीच अर्थक्रांती आहे. या प्रणालीमुळे लोकांची जीवनशैलीच बदलून गेली आहे. पूर्वीच्या काळी लोक पाकिटात आवश्यक रक्कम ठेवूनच बाहेर पडत. आता फक्त मोबाईल घेऊन बाहेर पडतात. छोट्या-छोट्या दुकानदारांकडे, व्यापाऱ्यांकडे अगदी रेल्वे स्टेशनवर बूटपॉलिश करणाऱ्यांकडेही ‘क्यूआर’ कोड असतात. त्याने छोट्यात छोट्या रकमेची पेमेंटही करता येते. रिलायन्स कंपनीने ‘जीओ’ची जाहिरात करताना ‘दुनिया अपनी मुठ्ठी में’ हे ब्रिदवाक्य वापरले होते. हे ब्रिदवाक्य खरोखरच ‘डिजिटल’ युगात वास्तववादी ठरले आहे.