सरकारी भूखंडासाठी २५ वर्षांच्या निवासी दाखल्याची अट ः मॉविन

0
119

राज्यातील गृहनिर्माण वसाहतीत घरासाठी भूखंड खरेदी करण्यासाठी आतापर्यंत १५ वर्षांच्या निवासी दाखल्याची जी अट होती ती आता वाढवून २५ वर्षे एवढी करण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण खात्याचे मंत्री माविन गुदिन्हो यांनी काल विधानसभेत सांगितले.

कॉंग्रेस आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी काल विधानसभेत मांडलेल्या खासगी ठरावावर बोलताना गुदिन्हो यांनी वरील घोषणा केली. माविन गुदिन्हो म्हणाले, की बरेचसे गोमंतकीय गृहनिर्माण वसाहतीत भूखंड खरेदी करतात. मात्र, नंतर भरमसाठ पैसे घेऊन सदर भूखंड बिगर गोमंतकीयांना विकतात. हे प्रकार थांबावेत यासाठी राज्यातील गृहनिर्माण वसाहतीत घरासाठी भूखंड खरेदी करण्यासाठी १५ वर्षांच्या निवासी दाखल्याची जी अट आहे ती वाढवून २५ वर्षे एवढी करण्यात येणार असल्याचे गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.

पर्वरी येथील गृहनिर्माण वसाहतीत असाच एक भूखंड विक्रीसाठी काढला असता अत्यंत ‘प्राईम लोकेशन’वर असलेला हा भूखंड एका बिगर गोमंतकीय व्यक्तीने लिलावात तब्बल एक कोटीला खरेदी केल्याचे गुदिन्हो म्हणाले. अशा प्रकारे गृहनिर्माण वसाहतीतील हे भूखंड बिगर गोमंतकीयांच्या हातात जाऊ नयेत यासाठी यापुढे निवासी दाखल्याची अट १५ वर्षांवरून २५ वर्षे एवढी करण्यात येणार असल्याचे गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.