सरकारी नोकर्‍यांसाठी यापुढे वर्षातून एकदाच जाहिरात

0
116

>> मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

>> पार्सेकर काळातील ६०० पदे भरणार

सरकारच्या विविध खात्यातील नोकर भरतीसाठी वर्षातून एकदाच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. २०१८ या वर्षातील नोकरभरतीच्या विविध पदांसाठीच्या जाहिराती डिसेंबर २०१७ मध्ये प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मागील सरकारच्या काळातील प्रक्रिया पूर्ण झालेल्या सहाशे पदांसाठी उमेदवारांना नियुक्तिपत्रे देण्यात मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली.

नोकरी भरतीची प्रक्रिया निर्धारीत काळात पूर्ण केली जात नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे यापुढे सहा महिन्यात नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे. येत्या महिनाभरात सर्व खाते प्रमुखांना वर्षभरातील नोकरभरतीचा अहवाल तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे.
२०१८ मधील नोकर भरतीच्या जाहिराती डिसेंबर २०१७ मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तर २०१९ मधील नोकरभरतीच्या जाहिराती जानेवारी २०१९ मध्ये प्रसिद्ध केल्या जातील, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले.

नोकरभरती धोरण पुढील बैठकीत
सरकारी नोकर भरतीच्या नवीन धोरणाला मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. आगामी वर्षात पाच ते सहा हजार पदे भरण्यात येणार आहेत. सफाई कामगार व इतर तत्सम पदे न भरण्याचा निर्णय घेतला आहे. हे कामगार ‘आउट सोर्स’ केले जाणार आहेत, असेही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले.

सहाशे पदांसाठी नियुक्तिपत्रे
मागील सरकारच्या काळातील नोकरभरतीच्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या ६०० पदांसाठी नियुक्तिपत्रे देण्याची प्रक्रिया सुरू आहे. वीज, महिला व बाल कल्याण, पोलीस व इतर खात्यात नवीन नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. ज्या पदांची प्रक्रिया प्राथमिक स्तरावर होती त्या ठिकाणी नव्याने भरतीची प्रक्रिया हाती घेण्याची सूचना करण्यात आली आहे. अग्निशामक दलातील १२९ पदे रद्द करण्यात आली आहेत, असेही त्यांनी सांगितले.

सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे सरकारसमोर आर्थिक पेचप्रसंग निर्माण झाला होता. सरकारी कर्मचार्‍यांचे पगार व पेन्शनवर महिना साधारण २९० कोटी रुपये खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे २२ नोव्हेंबर २०१६ मध्ये नवीन नोकरभरतीवर बंदी घालण्यात आली होती. नंतरच्या काळात निवडणूक आचारसंहितेमुळे नोकरभरतीवरील बंदी उठविण्याकडे गांभिर्याने लक्ष देण्यात आले नाही, असेही पर्रीकर यांनी सांगितले.