सरकारवरील अविश्‍वास ठराव २५१४ मतांनी फेटाळला

0
107

विरोधी आमदारांनी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या सरकारच्या विरोधात आणलेला अविश्‍वास ठराव काल विधानसभेत २५ विरुध्द १४ मतांनी फेटाळण्यात आला. कॉंग्रेस आमदार माविन गुदिन्हो यांनी ठराव आणणार्‍या स्वपक्षाच्या आमदारांवर जोरदार टीका केली परंतु मतदानाच्या वेळी मात्र ते कॉंग्रेसच्याच बाजूने उभे राहिले.

विरोधी नेते प्रतापसिंह राणे यांनी हा ठराव आणला होता. त्यावर रोहन खंवटे, नरेश सावळ, विजय सरदेसाई, पांडुरंग मडकईकर, चंद्रकांत कवळेकर, बाबूश मोन्सेर्रात, दिगंबर कामत, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, जेनिफर मोन्सेर्रात, विश्वजीत राणे व मिकी पाशेको यांच्या बारा आमदारांच्या सह्या होत्या. मतदानाच्या वेळी गोवा विकास पार्टीचे कायतान सिल्वाही अविश्वासाच्या ठरावाच्या बाजूने उभे राहिले. कॉंग्रेसने व्हीपही जारी केला होता. व्हीप धुडकावला असता तर गुदिन्हो अपात्रतेच्या कचाट्यात सापडले असते.
मावीन बोलले सरकारच्या
बाजूने; मत मात्र विरोधात
कॉंग्रेस आमदारांनी सरकारवर आणलेला अविश्वासाचा ठराव हा जणू स्वत:वरच आणल्याचा आरोप करून खाण व्यवसाय कोणी बंद केला होता असा प्रश्‍न दाबोळीचे आमदार मावीन गुदिन्हो यांनी केला व मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या सरकारचे जोरदार समर्थन केले.
महागठबंधनाच्या नावांखाली जनतेचा घात करू पाहात आहेत. राजभाषा कायद्यात मराठीचा विषय उकरून जनतेमध्ये पुन्हा फुट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप गुदिन्हो यांनी केला. मात्र त्यांनी पक्षाचा व्हीप पाळत ठरावाच्या बाजूने मतदान केले.
विरोधकांपाशी
मुद्दे नाहीत : पार्सेकर
आपल्या सरकारवर अविश्वासाचा ठराव आणून कॉंग्रेसने जनतेचा विश्वास गमावल्याचे मुख्यमंत्री पार्सेकर यांनी ठरावास विरोध करताना सांगितले. अविश्वासाच्या ठरावासाठी विरोधकांकडे एकही मुद्दा नव्हता. कपात सुचनांच्यावेळी उपस्थित केलेले मुद्देच विरोधकांनी या ठरावासाठी वापरले, आपले सरकार समाजातील सर्व घटकांपर्यंत पोचले आहे. त्यामुळे या ठरावाने जनतेची करमणूक होईल, असे सांगून आपला विश्वास एकमेव विरोधी नेत्यांवर आहे, असेही त्यांनी सांगितले.
तेव्हा गोपनीयता पाळली : सुदिन
२००७ ते २०१२ या काळात आपण कॉग्रेसच्या सरकारात मंत्री होतो, त्यावेळी मंत्रिमंडळाचे निर्णय कसे होतात हे आपण पाहिले, परंतु मंत्रिमंडळातील माहिती बाहेर सांगणे शक्य होत नव्हते. त्याचे कारण गोपनियतेची शपथ घेतली होती. आपण वेगळ्या संस्कृतीतून आलो आहोत, त्यामुळेच त्या काळात तोंड उघडले नाही, असे सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. या सरकारने मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. अविश्वास ठरावाचे कारण हेच का, असा प्रश्‍न त्यांनी केला. कॉंग्रेस सरकरच्या काळातील बिलेही या सरकारलाच फेडावी लागली. जायका प्रकल्पाच्या कामालाही आपल्या सरकारने चालना दिली. पाणी पुरवठा योजनेसाठीचे सर्व प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील. अविश्‍वास ठराव आणणारे आमदार विरोधी नेत्यांनाही किंमत देत नाहीत, असे असतानाही आपण अविश्वास ठराव आणता, असा प्रश्‍न ढवळीकर यांनी केला व हा ठराव मागे घेण्याची मागणी केली.
जनतेचा विश्वास उडाला : राणे
हे सरकार गोमंतकीयांच्या विरोधी असून ते दिल्लीच्या आदेशावरून चालत आहे. त्यामुळे सरकारवरील जनतेचा विश्वास उडाल्याचे सांगून जाहिरनाम्यातील महत्वाची आश्‍वासने सरकारने पूर्ण केली नाहीत, असा आरोप विरोधी नेते प्रतापसिंह राणे यांनी केला.
बेकारी भत्ता देण्याच्या आश्‍वासनाचे काय झाले? जुवारी पुलाचे काम कुठे पोचले? सुमुल डेअरीला बहुराज्य दर्जा नसतानाही गोव्यात कसा प्रवेश दिला, असे अनेक प्रश्‍न राणे यांनी ठरावावर बोलताना केले.
सरकारवर अविश्‍वास : मिकी
२०१२मध्ये आपण या सरकारला पाठिंबा दिला होता. त्यावेळी सरकारने ३५ हजार कोटी रुपयांचा खनिज घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने केला होता. परंतु सत्तेवर आल्यानंतर गेल्या साडेचार वर्षांत ५ टक्केही कुणी चोरले हे शोधून काढणे सरकार कडून झाले नाही, त्यामुळे या सरकारवर आपण विश्वास ठेवू शकत नाही, असे गोवा विकास पार्टीचे आ. मिकी पाशेको यांनी सांगितले.
सरकारने विधिमंडळाचे पावित्र्य नष्ट केल्याचा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी केला. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या माद्यमातून सरकारने गोव्याची स्थिती बिकट केल्याचे त्यांनी सांगितले. या सरकारच्या काळात जनता असुरक्षीत बनल्याचे ते म्हणाले. अभयारण्यातील जनतेच्या जमिनी मुक्त करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याची पूर्तता झाली नाही. कॅग अहवालातही सरकारच्या कारभारावर ठपका ठेवला आहे, असे विश्‍वजीत राणे यांनी सांगितले.
कॉंग्रेसेचे माध्यम धोरण : दिगंबर
या सरकारने जनतेचा अपेक्षाभंग केल्याचा आरोप दिगंबर कामत यांनी केला. शिक्षण धोरण आपल्या सरकारने आणले, तेव्हा आपल्या विरोधात काळे टीशर्ट घालून आंदोलन केले गेले, परंतु सत्तेवर आल्यानंतर कॉंग्रेसचेच धोरण चालू ठेवले. असे कामत यांनी सांगितले.
प्रादेशिक आराखड्याच्या बाबतीतही तेच केले. गेल्या साडेचार वर्षात त्यात सुधारणा का केली नाही, असा प्रश्‍न कामत यांनी केला. दक्षिण गोव्याच्या लोकांनी या पक्षावर विश्वास ठेवला. त्यांचा घात झाला असे त्यांनी सांगितले.
कॅसिनोबाबत यू टर्न : रोहन
कॅसिनोला विरोध करणारेच त्यांचे दलाल बनल्याचा आरोप रोहन खंवटे यांनी केला. कॅसिनो हटविण्यासाठीच जनतेने तुम्हाला निवडून दिले होते, असेही त्यांनी सांगितले. या सरकारने गोवा नष्ट केल्याचा आरोप केला. मगोबरोबर युती झाली नसती तर तुम्ही सत्तेवर आला असता काय, असा प्रश्‍न खंवटे यांनी केला.
खाण घोटाळा खरोखरच होता की नाही हे आता सरकारने जनतेला सांगावे, असे आव्हान नरेश सावळ यांनी सरकारला दिले. या लोकांचा गुरु आता भाभासुमंच्या व्यासपीठावरून याच लोकांची लक्तरे काढीत आहेत, असे सावळ यांनी श्री. सुभाष वेलिंगकर यांचे नाव न घेता सांगितले.
कॉंग्रेसनेच विश्‍वास गमावला : सिध्दार्थ
कॉंग्रेसने जनतेचा विश्वास गमावला असून त्यांच्याकडे मुद्देच नाहीत असे पणजीचे आमदार सिध्दार्थ कुंकळकर यांनी सांगितले व सरकारवरील अविश्वासाच्या ठरावास जोरदार विरोध केला.
नरेश सावळ यांनी मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याचा ठराव मनापासून आणला नव्हता हे आज सिध्द झाले आहे. सुरुवातीस सावळ यांनी तो ठराव मनापासून आणला असे वाटल्याने आपणही त्यात सामील झालो, परंतु एक आमदार कोकणीचे समर्थन करताना सावळ बाके वाजवित होते, असा आरोप सुभाष फळदेसाई यांनी केला. अविश्वास ठराव आणणार्‍यांवर जनतेचा विश्वास नाही, असेही त्यांनी सांगितले. आपल्या गोमंतकीय जनतेचा आपल्या सरकारवर विश्वास आहे. त्यामुळे यांच्य विश्वासाची गरज नाही, असे फळदेसाई यांनी सांगितले. निवडणुकीत पराभव करुन दाखवा असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले.
विरोधकांनी कितीही गोंधळ माजविला तरी २०१७मध्ये आमचेच सरकार असेल, असे किरण कांदोळकर यांनी सांगितले. जायका प्रकरणात चर्चिल आलेमांव आत गेले व दुसरा बाहेर राहिला त्यामुळेच जनता नाराज असल्याचे कांदोळकर यांनी सांगितले. हे सरकार सामान्य जनतेचे असून जनता सरकारवर समाधानी आहेत. २७ वर्षांच्या काळात कॉंग्रेसने काहीही केले नाही, असे डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. जनतेची दिशाभूल करण्यासाठीच त्यांनी अविश्वासाचा ठराव आणल्याचा आरोप सावंत यांनी केला. विरोधकांच्या अमिषाला गोमंतकीय जनता बळी पडणार नाही, असे उपसभापती विष्णू सूर्या वाघ यांनी सांगितले. भाजप सरकारने गोमंतकीयांच्या ओठावर हास्य आणण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेसने ते कधिही केले नाही, असे वाघ यांनी सांगितले. विरोधी नेत्यांचीही प्रतिष्ठा राखणे कॉंग्रेस आमदारांना शक्य झाले नाही, असे त्यांनी सांगितले.