समुद्र, समुद्राची रूपे…

0
624
  • डॉ. सोमनाथ कोमरपंत

समुद्राची अथांगता आणि भव्यता पाहून त्याचे धीरगांभीर्य आणि धीरोदात्तता जाणवते. त्याच्या लाटांचे लास्य आणि तरंगांचे विभ्रम अनुभवताना त्याच्या अंतरंगातील धीरलालित्य प्रत्ययास येते. असा हा अभिजात समुद्र आणि त्याची अभिजात रूपं…

समुद्र मला आवडतो. बालपणापासून मी समुद्र पाहत आलेलो आहे. समुद्रानुभूती ही आगळी-वेगळी अनुभूती आहे. समुद्र पाहता पाहता समुद्ररूपात एकरूप होणे ही एक प्रक्रिया आहे. आपण सारे बिंदू आहोत. पण सिंधूचा एक घटक म्हणून आपण वावरलो तर सिंधू होऊन जाऊ. आमच्या घराच्या हाकेच्या अंतरावर समुद्र असल्याने नित्य निरंतर मी त्याच्याकडे धाव घेत असे. समुद्रकिनार्‍यावर मी बागडलो. समुद्राच्या साथसंगतीत वाढलो. समुद्राची गाज तन्मयतेने ऐकली. कर्णरंध्रांत भरून घेतली. त्याची सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र या सर्व प्रहरांतील विविध रूपे अनुभवली. त्याच्या लाटांची विविध विलसिते मनात साठवून घेतली. बालपणापासून आजच्या घडीच्या त्याच्या कित्येक आठवणी माझ्या मनात आहेत.

पहिल्यांदा मी समुद्रकिनार्‍यावर कधी गेलो? जीवनात नुकतीच समज येण्याचे ते वय असावे. ती आठवण माझ्या मनात कायमची रुजलेली आहे. माझी एक बालविधवा आत्या होती. तीन आत्यांपैकी थोरली. माझे वडील तिच्याहून लहान. आत्या भारी प्रेमळ. तिने माझ्यावर उदंड प्रेम केले. अनेक कला तिला अवगत होत्या. एकदा गणेशचतुर्थी येण्यापूर्वी दोन टोपल्या भरून रेती आणण्यासाठी समुद्रकिनार्‍यावर गेली. अतिपावसामुळे आमच्या अंगणात शेवाळ साचले होते. वाटेवर रेती टाकली म्हणजे चतुर्थीच्या दिवसांत येता-जाता घसरून पडण्याची शक्यता नव्हती. त्या काळात आमच्याकडे गणेशचतुर्थी साजरी केली जात असे. एक-दोन वर्षेच हा आनंद मी अनुभवला.
आत्याने टोपली आणि फावडे घेतले. मी तिच्याबरोबर समुद्रकिनार्‍यावर जायचा हट्ट धरला. तिने तो पुरा केला. वडील मात्र रागावले. म्हणाले, ‘‘कुठे चाललास? पाण्यातबिण्यात शिरशील!’’ पण मी कसला पाण्यात जाणार? मी तर मुलुखाचा भित्रा! आत्याने माझ्या वडिलांना मला पाण्यात न सोडण्याचे वचन दिले.

तिथं गेलो. पाहतो तो काय? सर्वत्र पाणीच पाणी. अथांग समुद्र. निळं पाणी. पाण्याचं एवढं भव्य रूप मी पूर्वी कधी बघितलं नव्हतं. मी बघतच राहिलो. आत्यानं तेवढ्यात एक टोपली भरून घेतली. घरी जायची तिला घाई. पण मी हलायलाच तयार नाही. मोठ्या मिनतवारीनं ती मला घरी घेऊन गेली. तिनं खणलेल्या जागी मला शंख-शिंपल्यांचा खच पडलेला दिसला. नाना आकारांचे, नाना रंगांचे शंख-शिंपले जेवढे भरून घेता येतील तेवढे मी खिशात भरले. शिंपल्यांचा आतला तांबूस रंग मला आमच्या घरातील वासरांच्या कानांच्या पाळ्यातील आतल्या तांबूस रंगासारखा भासला. मला ते शंख-शिंपले पाहून गंमतच वाटली.

मध्यंतरी माझी आई गेली. होत्याचं नव्हतं झालं. घरात दुःखाची छाया पसरली. गणेशचतुर्थी खंडित झाली. समुद्रकिनार्‍यावर विशेष येणं-जाणं झालं नाही. पुढे शाळेत जायला लागलो. गणपतिविसर्जनाच्या वेळी, सरस्वतिविसर्जनाच्या वेळी शाळेतील मित्रांबरोबर समुद्रकिनार्‍यावर जाऊ लागलो. सरस्वतिविसर्जनाच्या वेळी रात्री चांदण्यातील समुद्रकिनारा अनुभवला. मित्रांबरोबर कित्येकदा रापण बघायला गेलो. किनार्‍यावरील काळ्या होड्यांची रांग, शेजारच्या माडांची रांग… त्यांची झुलणारी झावळे… त्यांची किनार्‍यावर जणू आरासच. डोळ्यांचे पारणे फिटत असे. चंद्रकोरीसारखी पुळणी… निळा समुद्र… त्याच्या फेसाळणार्‍या लाटा… दूरवरच्या डोंगराची रांग… त्यातील पुराणपुरुषासारखे शोभून दिसणारे काळे-कभिन्न खडक… पश्‍चिम दिशेला मध्येच कासवाच्या आकाराचा घुसलेला डोंगर… ‘कणको’ या नावाने ओळखला जाणारा. कणक्याला लागून ‘रनचो मळो’… हिरव्यागार वनराईचा नितांत रमणीय परिसर. वाढत्या वयात हे सारं रूप नजरेत साठवून घ्यावंसं वाटे… बरोबर शाळेतील अन्य सोबती असायचे… जवळचे मित्र असायचे. घरी यावंसं वाटत नव्हतं. पण उशिरा घरात शिरलो तर वडिलांचे डोळे वटारणे वाट्याला यायचे. या रागावण्यामागं प्रेमच होतं, काळजी होती हे मागाहून कळलं.

दिवाळीच्या सणाच्या वेळी पतंग उडविणे हा सर्वांचा आवडीचा छंद! मी त्यात रमून जात असे. घरासमोरच्या शेतात पतंग उडवायला अवकाश अपुरा वाटायचा… समुद्रकिनार्‍यावर उंच उंच तरंगणार्‍या पतंगाचे हेलकावे न्याहाळणे अधिक आनंददायी वाटायचे. खाली निळं पाणी… वर निळं आकाश… किनार्‍यावर मी… माझा डुलणारा पतंग… पतंगाच्या दोर्‍याचं रीळ माझ्या हातात… पतंगासारखाच मीदेखील वर उचलला गेल्यासारखं वाटायचं.

कुमारवयातील कवितेविषयीची गोडी लागण्याचे ते दिवस होते. मंतरलेले दिवसच म्हणेन मी त्यांना! आमच्या प्रभूसरांकडे हे सारं घडत गेलं. ते मराठीतील उत्तमोत्तम कविता आम्हाला वाचायला द्यायचे. प्रा. गं. भा. निरंतरांनी संपादित केलेलं ‘मधुघट’ हे पुस्तक आज आठवतं. सूर्यास्तकाळी समुद्रकिनार्‍यावर त्यांनी दिलेली भा. रा. तांबे यांची ‘मावळत्या दिनकरा’ ही कविता कैकवेळा मी तारस्वरात म्हटली आहे. यशवंत नाईकसरांनी आम्हाला शाळेत चित्रकलेचे मार्गदर्शन अनेक प्रकारांनी केले. कारवारच्या ‘हिंदू हायस्कूल’मध्ये ते स्वतः विद्यार्थी असताना अनेक प्रयोग केले. स्मरणचित्रे, वास्तुचित्रे, निसर्गचित्रे, मुक्त हस्तचित्रे, पोट्रेटस्, भौमितिक स्वरूपाची चित्रे काढताना किती तन्मय व्हायचे ते! लांब काठी घेऊन स्वतःला केंद्रबिंदू कल्पून वाळूत वर्तुळे काढण्याचा त्यांनी सराव केला होता. रेषेवर हुकमत प्राप्त करण्यासाठी हा नामी उपाय आहे असे ते म्हणायचे. एरव्ही आत्मकेंद्रित असणं केव्हाही वाईट. पण ‘आत्म’ला केंद्रबिंदू कल्पून चित्रकलेचा विकास करण्याची नाईकसरांची पद्धती न्यारी. समुद्राशी निगडित अशा अनेक आठवणी सांगता येतील… एकदा माझा प्रिय मित्र पुढील शिक्षणासाठी गोवा सोडून मुंबईस निघाला. त्याला काय भेट द्यावी हेच मला कळेना… कुसुमाग्रज व वा. रा. ढवळे यांनी संपादन केलेला ‘सुवर्णनौका’ हा कवितासंग्रह मित्राला दिला… तोही समुद्रकिनार्‍याची साक्ष ठेवून… आसवांनी भरलेल्या नेत्रांनी… त्यावेळी माझ्या मित्राच्या पापण्यांत मी समुद्रच अनुभवला.

आयुष्याच्या पुुढच्या प्रवासात काही स्थलान्तरे झाली… गावचा समुद्र सुटला… अनेक ठिकाणचे समुद्र पाहिले… त्याच्याविषयीचे ममत्व अभंग राहिले… अनेक समुद्र पाहिले तरी त्यातील जलतत्त्व एकच नव्हे का? समुद्राचे उन्मेषशाली रूप तेच नव्हे का?
मडगावला असताना अनेकदा कोलव्याचा समुद्र पाहिला. त्याची स्वतःची म्हणून भव्यता आहे. त्याचा प्रचंड विस्तार आहे. माजोर्डा, बेतालभाटी, कोलवा आणि बाणावली हे संलग्न समुद्रकिनारे… पृथगात्म आणि एकात्म… तेथील सौंदर्यविलासाचे रूप निराळे. ज्या गावाला आणि परिसराला समुद्र लाभतो त्याला वेगळे व्यक्तिमत्त्व लाभते. ते गजबजलेले गाव होते. चैतन्याने ओसंडून जाते. समुद्रगाज या परिसराला वेढून राहते. कोणार्क, पुरी येथील समुद्रकिनारे असेच आहेत, नाही का?
विद्यापीठ परिसरात राहत असताना तेथील पुळणी न्याहाळताना वेगळी आनंदानुभूती प्राप्त व्हायची. ओडसेलपासून सुरुवात करायची, काक्रा, नावशे आणि बांबोळीच्या किनार्‍यापर्यंत पदचर्या करायची हा प्रघात अनेक वर्षे मी पाळला. तेथील दंतुर किनार्‍यांना स्वतःची अशी ओळख आहे… अघनाशिनीचे भव्य रूप तेथे अनुभवता येते आणि पश्‍चिम सागराचा विस्तारही… मिरामारचा समुद्रही मला आवडतो… विशेषतः तेथील सुरूवृक्षांची त्याला लाभलेली महिरप… मात्र मे महिन्याच्या उकाड्याच्या दिवसांत मुक्त मनाने आपण तेथील आनंद अनुभवू शकत नाही. माणसांचा धो-धो प्रवाह तेथे वाहत असतो. त्यामुळे जत्रेत हरवलेल्या मुलासारखी आपली स्थिती होते.
दोनापावलच्या धक्क्यावरून काळ्याशार अथांग सागराचे दर्शन घेणे आणि तेथून जवळच असलेल्या पायर्‍यापायर्‍यांच्या मार्गावरून टकमक टोकावरून टकमका पाहणे हा माझा आवडता छंद होता. लोकान्तातील एकान्त म्हणजे काय चीज असू शकते ते इथे अनुभवता येते. आग्वादच्या जुन्या आणि नव्या दीपगृहाच्या परिसरात, तेथील हॅलिपॅडपासून पुढे गेलेल्या रस्त्यावरून जाऊन तेथील विराट समुद्राचे दर्शन घेणे ही वेगळ्या प्रकारची आनंदानुभूती आहे. माझ्या मित्रांसह ती मी मनसोक्त घेतलेली आहे.

कारवारचा समुद्र मला अनेक कारणांमुळे आवडलेला आहे. तेथे जाण्यापूर्वी सदाशिवगडाजवळ काळी नदीचे विस्तीर्ण पात्र डोळ्यांना आल्हाद देते. नवनव्या पुलांमुळे येथील नदीपात्राचा चेहरामोहरा आता पूर्णतः बदललेला आहे. नव्या सुधारणांनी युक्त असलेल्या आणि स्वागतास सज्ज असलेल्या मनोहर रूपाच्या कारवारच्या किनार्‍याविषयी ममत्व वाटते. याचे एक कारण रवींद्रनाथांसारख्या थोर कवीला या समुद्रकिनार्‍याचे आणि परिसराचे काही काळ लाभलेले सान्निध्य. त्यांच्या कवितेला नवी कलाटणी देणारा कालखंड येथूनच सुरू झाला.

दुसरे कारण म्हणजे, पु. ल. देशपांडे यांचे आजोळ या परिसरातले. त्यांचा भावनाकोश समृद्ध झाला तो त्यांचे मावुल घराण्यातील आजोबा वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ‘ऋग्वेदी’ यांच्यामुळे. सार्‍या मराठी साहित्यविश्‍वाला पुलकित करणारे पु.ल. हे अभिरूचिसंपन्न व्यक्तिमत्त्व. त्यांचा अस्तित्वस्पर्श या परिसराला झालेला.
समुद्र मला महाकाव्यासारखा वाटतो. महाकाव्याचा नायक धीरगंभीर, धीरोदात्त आणि धीरललित. समुद्राची अथांगता आणि भव्यता पाहून त्याचे धीरगांभीर्य आणि धीरोदात्तता जाणवते. त्याच्या लाटांचे लास्य आणि तरंगांचे विभ्रम अनुभवताना त्याच्या अंतरंगातील धीरलालित्य प्रत्ययास येते. असा हा अभिजात समुद्र आणि त्याची अभिजात रूपं…