समर्पक उत्तरे…

0
24
  • मीना समुद्र

बिरबलासारखी चतुरस्त्रता आणि हजरजबाबीपणा कालिदासाजवळही होती. राजेलोक भर दरबारी काही शंका, काही कूटप्रश्न उपस्थित करत. या मंडळींकडून त्यांना त्यांची उत्तरे अपेक्षित असत. राजा भोजाने कवी कालिदासालाही असे काही सर्वश्रेष्ठ प्रश्न विचारले होते असे म्हणतात. त्याची कालिदासाने दिलेली उत्तरेही प्रसिद्ध आहेत.

महाकवी कालिदासाचा कालखंड, त्याचे जन्मस्थान याविषयी मतभेद आहेत. तसेच तो चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या दरबारातील पंडित होता की राजा भोजाच्या दरबारी होता याची नक्की माहिती कुणालाच नाही. तरी पण त्याच्या लेखनातील उल्लेखांवरून अनुमान काढले जाते. कुठेही त्याच्याबद्दलचा ठोस उल्लेख किंवा पुरावा उपलब्ध नसल्याने त्याच्याबद्दल अनेक दंतकथाही प्रसिद्ध आहेत. कालिदासाची विद्वत्ता, त्याची काव्यात्मकता, त्याच्या उपमा, त्याचे शीलसंपन्न चारित्र्यही त्याच्या लिखाणातूनच दिसून येते. त्याच्या पंक्तीला आपणही बसावेसे वाटणाऱ्या काही तथाकथित जाणकारांनी आपलेही श्लोक बेमालूमपणे मिसळण्याचा प्रयत्न ‘कुमारसंभवा’सारख्या काव्यात केल्याचे दिसून येते. पण ‘कहाँ राजा भोज, कहाँ गंगू तेली’ असे त्यांचे स्वरूप खऱ्या प्रामाणिक जाणकारांनी ओळखले आहे.

कवी कालिदास राजा भोजाच्या दरबारी होता असे म्हटले जाते. पूर्वी राजेमहाराजे आपल्या पदरी असे विद्वान, पंडित, कवी बाळगीत. त्यांना राजदरबारात मानाचे स्थान असे. अकबराच्या दरबारातही सूरसम्राट तानसेन आणि चातुर्याबद्दल प्रसिद्ध असा बिरबल हे त्याच्या नवरत्नांपैकी होते हेही सर्वांना माहीत आहे. या बिरबलासारखी चतुरस्त्रता आणि हजरजबाबीपणा तसेच तेनाली रामनसारखी तैलबुद्धी कालिदासाजवळही होती. राजेलोक भर दरबारी काही शंका, काही कूटप्रश्न उपस्थित करत. या मंडळींकडून त्यांना त्यांची उत्तरे अपेक्षित असत. राजा भोजाने कवी कालिदासालाही असे काही सर्वश्रेष्ठ प्रश्न विचारले होते असे म्हणतात. त्याची कालिदासाने दिलेली उत्तरेही प्रसिद्ध आहेत.

महाभारतातील धर्मराजाला यक्षाने विचारलेल्या प्रश्नांची यावरून आठवण होते. अरण्यवासात रानावनात हिंडून तहानलेल्या सर्व पांडवांची तहान भागवण्यासाठी धर्मराज एका तळ्यावर गेला तेव्हा तळे राखणाऱ्या यक्षाने त्याला रोखले आणि आपल्या प्रश्नांची योग्य उत्तरे दिलीस तरच तू या पाण्याचा अधिकारी होशील असे सांगितले. आणि धर्मराजाने त्याची समाधानकारक उत्तरे दिल्यावर यक्ष संतुष्ट झाला. महाभारतात ‘यक्षप्रश्न’ म्हणून आलेला हा शब्द व्यवहारातही काही अडीअडचणी उपस्थित झाल्या की नेहमी वापरला जातो. तर भोज राजाने विचारलेले प्रश्न आणि त्यावर कालिदासाने दिलेली समर्पक उत्तरे आपल्याला चिंतनशील बनवल्याशिवाय राहात नाहीत. ती प्रश्नोत्तरे अशी-
पहिला प्रश्न होता- ‘ईश्वराची सर्वश्रेष्ठ रचना कोणती?’ यावर कालिदासाचे तत्पर उत्तर होते- ‘माता! आई!’ कालिदास स्वतः अनाथ होता. त्याचा सांभाळ एका गोपाळाने केला अशी कथा आहे. त्याच्या संवेदनशील मनाला मातेची उणीव सतत भासत असणारच. फक्त त्याचे हे आसुसलेपण यामागे नव्हते तर त्याने अभ्यासलेल्या विद्येचे आणि भोवतालच्या सृष्टीचे सुसंस्कार त्याच्यावर होते. स्वतःच्या निरीक्षण-परीक्षणातून त्याने हे उत्तर दिले होते. आई ही जन्मदात्री, सृजन, संगोपन, मार्गदर्शन, पालनपोषण, रक्षण आणि संस्कार करणारी असते. कित्येक थोरांची चरित्रेही सांगतात की, आईनेच त्यांचे व्यक्तित्व घडविले. आईच्या दुधावर पोसणारे, तिच्या मायेच्या छत्रछायेत वाढणारे, तिच्या संस्कारावर पोसणारे असे सारे मनुष्यजीवन असते. प्राणिमात्रातही आईचे महत्त्व आगळेच. त्यामुळे आत्मा आणि ईश्वर यांचा संयोग तिच्यातून अनुभवायला मिळत असल्याने ईश्वरीय गुणांनी युक्त अशी आई किंवा माता हीच ईश्वराची सर्वश्रेष्ठ रचना होय.

भोज राजाचा दुसरा प्रश्न- ‘सर्वात श्रेष्ठ फूल कोणते?’ आपल्याला वाटते सौंदर्य, रंग, आकार, कोमलता आणि सुगंधाने युक्त असलेले कमळ किंवा एखादे सुंदर, सुगंधी फूल हे याचे उत्तर असेल. संस्कृत साहित्यात तर कमळाची अनेक वर्णने आढळतात आणि नेत्रकमल, करमकमल, पदकमल आणि कमळासारखा सुंदर चेहरा असे अवयवांच्या वर्णनासाठीही हे फूल उपयोगी पडते. कमलनाल, कमलतंतू, कमलकंद हे सारे पक्षी व मानवाला खाण्यासाठी आणि वस्त्रासाठी उपयोगी; शिवाय ब्रह्मदेव-लक्ष्मी-सरस्वती वगैरे देव हे कमलासनावर विराजमान झालेले दिसतात. एकूण कमळच श्रेष्ठ असावे. पण कालिदासाचे या प्रश्नाचे उत्तर आहे- ‘कापसाचे फूल (बोंड).’ कापसाचे बोंड बाहेरून तरी रुक्ष, वाळलेले, निर्गंध; पण उलल्यावर पांढराशुभ्र कापूस बाहेर पडतो. फुलाचा आकार धारण करतो. हे मानवाला वस्त्रे-ऊब पुरवते. झोपायला, लाज झाकायला वस्त्र पुरवते. देवपूजेतही समई-निरांजनाची वात बनते. स्नेहात भिजून प्रकाश देते. त्यामुळे त्याची श्रेष्ठता निःसंशय.

तिसरा प्रश्न होता- ‘सर्व गंधात श्रेष्ठ गंध कोणता?’ त्यावर कालिदासाचे उत्तर होते- ‘मृद्गंध.’ तापलेल्या जमिनीवर पहिल्या पावसाचे थेंब पडले की येणारा हा अनोखा, अवीट गंध. मनसोक्त हुंगावासा वाटणारा हा अतिशय सुंदर असा मातीचा गंध- मृद्गंध! सर्जनशील धरणीच्या तृप्त ओठापोटातून येणारा उत्सुक, नैसर्गिक गंध.
कालिदासाला भोज राजाने विचारलेला चौथा प्रश्न होता- ‘सर्वात गोड काय?’ मिष्टान्नं, पंचपक्वान्नं आपण बनवतो, निरनिराळ्या फळांची गोडी अनुभवतो. मधुररसाने भरलेल्या आम्रफलाचे सेवन करतो. फुलातला मध खातो. अमृताची गोडी दही, दूध, साखर, तूप, मध या द्रव्यांनी युक्त पंचामृतातून अनुभवतो. अमृताहुनी गोड असे ईश्वराचे नामस्मरण करतो. पण कालिदासाचे उत्तर आहे- ‘वाणीची गोडी सर्वश्रेष्ठ!’ काम साध्य करण्यासाठी जिभेवर मध ठेवावा लागतो असे म्हणतात. पण हा मतलबीपणा कालिदासाला अभिप्रेत आहे असे वाटत नाही, तर माणसा-माणसांतला सुसंवाद गोड वाणीने होऊ शकतो. एक अपशब्द बोलून गेलेली लाज ‘बूँद से गयी हौद से नहीं आती’ अशीच असते. वाणीचा गोडवा माणसे जोडतो. नाती टिकवतो. मैत्र जोपासतो.

पाचवा प्रश्न होता- ‘सर्वश्रेष्ठ दूध कोणतं?’ त्याचंही उत्तर कालिदासाने ‘मातेचं’ असंच दिलं आहे. मातेचं स्तन्य हे तान्ह्या बाळासाठी अमृत असतं. योग्य तापमान, पाचक, पोषक, मातेचा स्पर्श आणि जवळीक, ऊब यांचा विलक्षण अनुभव देणारं. एरव्ही गोमातेचं दूध आईच्या दुधाखालोखाल श्रेष्ठ असतं. पण आई आजारी असेल तरी बाळाला तिचंच दूध दिलं जातं.
सहावा प्रश्न- ‘सगळ्यात काळं काय?’ त्याचं उत्तर होतं- ‘कलंक!’ सर्वश्रेष्ठ आणि मिळूनमिसळूनही उरणारा रंग हा पांढरा मानला जातो. माणसाचा गोरा वर्णही श्रेष्ठ मानतात. काळा रंगही काजळ, तीट, मंगळसूत्र, ढग अशा प्रकारे शुभ मानला जातो. पण एरव्ही अशुभ, घृणास्पद मानला जातो. कलंक म्हणजे काळा डाग. हा कपड्यावर असेल तर धुता येतो, पण चारित्र्यावर असेल तर तो आणखी काळा अशुभ होय.
भोज राजाचा सातवा प्रश्न होता- ‘सगळ्यात जड काय?’ कालिदासाचं उत्तर होतं- ‘पाप!’ दगड, लोखंड, वस्तू उचलायला जड, पण पाप हे इतकं जड की आपली शक्ती ते पेलायला कमी पडतं. कोणतंही- चोरी, भ्रष्टाचार, अनाचार, असत्य, हिंसा अशा प्रकारचं पाप हे त्याचा भार वाहायला कठीण. कारण ते लपूनछपून केलं जातं. पण सत्याच्या प्रकाशात ते उघड होतंच. पाप मनाला भारभूतच होते.

आठवा प्रश्न- ‘सगळ्यात स्वस्त काय?’ तर उत्तर होतं- ‘सल्ला!’ कुणालाही म्हणजे आजाऱ्याला, मित्राला, नातेवाइकांना, शेजाऱ्यांना आपण फुकटचा सल्ला देत असतो. त्याला पैसे पडत नाहीत. नववा प्रश्न- ‘सगळ्यात महाग काय?’ त्याचे उत्तर- ‘सहयोग.’ एकत्र असण्याने, येण्याने काम-श्रम-कमाई यांची वाढ आणि वाटणी होते. विचारांची देवाण-घेवाण होते. एकांगी, चुकीचा मार्ग सुधारण्याची शक्यता असते. पण व्यक्तीचा अहंकार आणि स्वार्थी स्वभाव यामुळे सहयोग करण्यात तो तत्पर नसतो. मनाचा दिलदारपणा, खुलेपणा हा सर्वांकडेच असतो असे नाही. यानंतरचा आणि शेवटचा दहावा प्रश्न म्हणजे- ‘सगळ्यात कटू काय असते?’ त्यावर कालिदासाचे उत्तर होते- ‘सत्य!’ सत्यात प्रकाश असतो. ते स्पष्ट असते. कोणतीही लपवाछपव ते करत नाही. निर्भीडपणा, हिंमत, धैर्य आणि कडवेपणाने कुणाचाही मुलाहिजा न ठेवता, भीडभाड न राखता अगदी उघडपणे तोंडावर बोलणे यामुळे अवश्य कटुता येऊ शकते. पण सत्य हे असेच कटू असूनही त्याचे परिणाम मात्र गोड होतात. कारले चवीला कडू लागते पण शरीराचे आरोग्य त्यामुळे राखले जाते, अगदी तसेच!

एकूणच प्रश्नात चौकसपणा, आशंका, संशय, कुतूहल दडलेले असते. त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रश्न विचारले जातात. बुद्धी वा ज्ञानाचा कस पाहण्यासाठी, स्वभावपरीक्षा करण्यासाठीही प्रश्न विचारले जातात. परीक्षा, मुलाखती यातले प्रश्न हेच दर्शवतात. कामाचे विविध स्तर असतात. कोणत्या स्तरावरचे काम कोणती व्यक्ती करू शकेल हे उत्तरावरून कळते. ज्ञानाचे क्षितिज विस्तारण्यासाठी आणि जीवनात प्रगती करण्यासाठीही प्रश्नोत्तरे आवश्यक असतात. प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेऊन अनेक संशोधक तयार झाले. राजा भोजाने कालिदासाला नक्की कोणत्या हेतूने प्रश्न विचारले होते हे आपल्याला माहीत नसले तरी त्या उत्तरांमुळे आपल्या ज्ञानात भर पडते आणि ते प्रश्न आपल्यालाही विचारप्रवण करतात हे मात्र खरे!