सदाशिव अमरापूरकर यांचे निधन

0
222

रंगभूमी व सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे काल पहाटे येथील कोकिळाबेन अंबानी इस्पितळात निधन झाले. ६४ वर्षीय अमरापूरकर फुफ्फुसाच्या संसर्गाने आजारी होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती.
सिनेसृष्टीतील एक चतुरस्त्र अभिनेता म्हणून अमरापूरकर यांनी कीर्ती संपादन केली होती. वैविध्यपूर्ण भुमिकांद्वारे त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. चरित्र, खलनायक तसेच विनोदी अभिनेता म्हणूनही त्यांनी छाप पाडली होती.आतापर्यंत अमरापूरकर यांनी ३०० चित्रपटांमधून आपली अदाकारी पेश केली. ‘आमरस’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. तथापि हिंदी चित्रपट क्षेत्रात त्यांनी नाव कमावले ते खलनायकाच्या भूमिकांमुळे. ‘हँडस अप’ हे त्यांचे गाजलेले नाटक होते. ‘अर्धसत्य’, ‘सडक’ या चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कारही त्यांनी प्राप्त केले होते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरापूरकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. व्टिटरच्या माध्यमातून दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी उपजत गुणवत्ता असलेल्या एका कलावंताला आपण मुकलो अशा शद्बात आपल्या भावना व्यक्त केली.
मुंबईतील भाईदास हॉलमध्ये अमरापूरकर यांच्या पार्थिवाचे नाट्य-सिने क्षेत्रातील तसेच अन्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले. निवेदिता सराफ, रझा मुराद, रमेश भाटकर, मेधा पाटकर, जयवंत वाडकर, किशोरी शहाणे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
अमरापूरकर यांच्या मूळ गावी अहमदनगर येथे आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.