दाबोळीत कारची कदंबला धडक : ५ गंभीर जखमी

0
66
दाबोळी येथे झालेल्या अपघातात कारचा असा चुराडा झाला. (छाया : प्रदीप नाईक)

माटवे-दाबोळी येथे कदंब बस आणि कार यांच्यात समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात कारमधील पाच व्यक्ती गंभीर जखमी झाल्या. या अपघातात कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. अपघातात कारमधील तीन महिला, एक पुरुष आणि तीन वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाले.वास्को ते फोंडा मार्गावरील कदंब बसक्रमांक जीए- ०३- एक्स- ०३२१ आणि पिर्णा-नागोवा येथील जीए- ०८- ए- ६४८० कार यांच्यात टक्कर झाली. सुमारे ५० प्रवासी असलेली कदंबा बस सुदैवाने बचावली. पिर्णी-नागोवा येथील किगन डीसिल्वा हा कार चालवीत होता. सोबत कारमध्ये त्याची पत्नी वेलोंसिया डीसिल्वा, मुलगा केडन डीसिल्वा, मोनिका डीसिल्वा असे एकाच कुटुंबातील हे सर्वजण धार्मिक कार्यक्रमासाठी वास्कोच्या दिशेने जात असताना माटवे-दाबोळी येथे समोरासमोर टक्कर झाली व कारमधील सर्व प्रवासी जखमी झाले व बसरस्ता सोडून एका बाजूला झाडावर स्थिरावली.
या धडकेमुळे कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला व कारमधील पाचही प्रवासी गंभीर जखमी झाले. दैव बलवत्तर म्हणून कारमधील पाचही जण बचावले. मात्र ते सर्वच रक्तबंबाळ झाले होते. सर्व जखमींना एका खाजगी वाहनातून इस्पितळात पाठविण्यात आले. अपघातामुळे वास्को-कुठ्ठाळी महामार्गावर वाहनांची रांग लागली. तसेच अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना सुमारे एक तास तिथे ताटकळत रहावे लागले.