>> ‘पराशर’ रामदास कामतांनी उलगडल्या ‘मत्स्यगंधे’च्या आठवणी
पराशरावर अनुरक्त झालेली आणि गर्भवती राहिलेली ‘मत्स्यगंधा’ सत्यवती जेव्हा पराशर हिमालयामध्ये तपश्चर्येसाठी जायला निघतो आणि आपण परोपरीने प्रयत्न करूनही परावृत्त होत नाही, तेव्हा सूडाने पेटून उठते. संतापाने धगधगणार्या ‘मत्स्यगंधे’चे ते त्या प्रवेशातील दाहक संवाद ऐकताना पराशराच्या भूमिकेतील आपले ह्रदय तो केवळ अभिनय आहे हे कळत असूनही त्या क्षणी विदीर्ण होऊन जायचे, आपण कोण्या महिलेला फसवतो आहोत या अपराधी भावनेने मन व्यथित व्हायचे, अशी आठवण ज्येष्ठ गोमंतकीय गायक नट रामदास कामत यांनी ‘नवप्रभे’ला काल सांगितली.
ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या ‘मत्स्यगंधा’ वेळच्या आठवणींना कामत यांनी उजाळा दिला. रामदास कामत – ‘पराशर’ आणि ‘आशालता’ – सत्यवती ही जोडी त्या काळी गाजली. १ मे १९६४ रोजी धी गोवा हिंदू असोसिएशनने वसंत कानेटकर लिखित ‘मत्स्यगंधा’ या अजरामर नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत केला. या नाटकाने अनेक दृष्टींनी इतिहास घडवला. पं. जितेंद्र अभिषेकींनी मृतावस्थेला पोहोचलेल्या मराठी संगीत रंगभूमीला नवा साज चढवला तो ह्याच नाटकामध्ये. अभिषेकीबुवांनी ‘गुंतता ह्रदय हे’, ‘साद देती हिमशिखरे’, ‘गर्द सभोती रान राजणी’, ‘अर्थशून्य भासे मज हा’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’ अशा एकाहून एक सरस चाली दिलेल्या या नाटकामध्ये रामदास कामत – आशालता ही पराशर – सत्यवतीची जोडी सुमारे शंभर – दीडशे प्रयोगांमध्ये एकत्र वावरली. मात्र, नंतर आशालताबाईंचे गोवा हिंदूशी मतभेद झाल्याने त्या नाटक सोडून गेल्या. ‘मत्स्यगंधा’चे मात्र सहाशे प्रयोग त्या काळी झाले. अलीकडेच या नाटकाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याने गोवा हिंदू असोसिएशनने नाट्यसंपदा कलामंचाच्या विद्यमाने या नाटकाचे पुनरुज्जीवनही केले आहे.
आशालतांसमवेत आपण फक्त एकाच नाटकात एकत्र काम केले, पण त्यांचा अस्सल अभिनय आपल्या कायम स्मरणात राहिला अशी भावना रामदास कामत यांनी पुढे व्यक्त केली. अलीकडे त्यांची भेट होत नव्हती. मात्र, नुकतेच त्यांच्या टीव्हीवरील मालिकेत त्यांना आपण पाहिले होते असे श्री. कामत म्हणाले.