संजू बरसला; रॉयल्सचा विजयारंभ

0
289

>> चेन्नई सुपर किंग्सचा पहिला पराभव

>> ड्युप्लेसीचे अर्धशतक व्यर्थ

संजू सॅमसनने ठोकलेले तुफानी अर्धशतक व त्याने कर्णधार स्टीव स्मिथसह केलेल्या शतकी भागीदारीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने विजयी सलामी देताना चेन्नई सुपर किंग्सचा १६ धावांनी पराभव केला. रॉयल्सने विजयासाठी दिलेल्या २१७ धावांचा पाठलाग करताना चेन्नईला ६ बाद २०० धावांपर्यंतच मजल मारता आली. इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या मोसमातील चेन्नई सुपर किंग्सचा हा पहिलाच पराभव ठरला.

विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला विजय व वॉटसन यांनी ५६ धावांची खणखणीत सलामी दिली. परंतु, यानंतर त्यांचा डाव गडगडला. नवव्या षटकाअखेर त्यांनी ४ बाद ७७ अशी दयनीय परिस्थिती झाली. फाफ ड्युप्लेसी याने केवळ ३७ चेंडूंत ७ षटकार व १ चौकारासह ७२ धावांची खेळी करत संघाच्या विजयासाठी प्रयत्न केले. परंतु, तो संघाला विजयी करू शकला नाही. शेवटच्या षटकात विजयासाठी ३८ धावांची गरज असताना धोनीने टॉम करनने टाकलेल्या या षटकात सलग तीन षटकार ठोकले.

तत्पूर्वी, चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडल्यानंतर राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही. पदार्पणवीर यशस्वी जैसवाल केवळ सहा धावा करून बाद झाला. सलामीला उतरलेला कर्णधार स्टीव स्मिथ व यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन यांनी यानंतर चेन्नईच्या गोलंदाजांची पिसे काढली. सहा षटकांचा पॉवरप्ले संपला त्यावेळी रॉयल्सच्या ५४ धावा फलकावर लागल्या होत्या. पीयुष चावलाने टाकलेल्या डावातील आठव्या षटकात रॉयल्सने २८ धावा वसूल केल्या. या षटकात सॅमसनने तीन व स्मिथने एक षटकार ठोकला. चावलाच्या पहिल्याच षटकात २८ धावा जमवूनही धोनीने चावलाची गोलंदाजी सुरुच ठेवली. याचा लाभ घेत या द्वयीने चावलाच्या दुसर्‍या व डावातील दहाव्या षटकात १९ धावा तटावल्या. सॅमसनने १९ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले.

सॅमसनने स्मिथसह दुसर्‍या गड्यासाठी १२१ धावांची विशाल भागीदारी रचली. डावातील १२व्या षटकात सॅमसन बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलर व रॉबिन उथप्पा यांना या संधीचा लाभ उठवत धावा जमवण्यात अपयश आले. तळाला जोफ्रा आर्चरने केवळ ८ चेंडूंंत ४ षटकारांसह नाबाद २७ धावा चोपल्याने राजस्थानला द्विशतकी वेस ओलांडता आली.

चेन्नईला या सामन्यासाठी नाईलाजास्तव एक बदल करावा लागला. अंबाती रायडू पूर्ण तंदुरुस्त नसल्याने त्यांनी ऋतुराज गायकवाड याला आयपीएल पदार्पणाची संधी दिली. दुसरीकडे राजस्थानने यंदाच्या मोसमातील आपल्या पहिल्या सामन्यात कर्णधार स्टीव स्मिथ याच्यासह टॉम करन, जोफ्रा आर्चर व डेव्हिड मिलर हे विदेशी खेळाडू खेळवले.

धावफलक
राजस्थान रॉयल्स ः यशस्वी जैसवाल झे. व गो. चहर ६, स्टीव स्मिथ झे. जाधव गो. करन ६९ (४७ चेंडू, ४ चौकार, ४ षटकार), संजू सॅमसन झे. चहर गो. एन्गिडी ७४ (३२ चेंडू, १ चौकार, ९ षटकार), डेव्हिड मिलर धावबाद ०, रॉबिन उथप्पा झे. ड्युप्लेसी गो. चावला ५, राहुल तेवतिया पायचीत गो. करन १०, रियान पराग झे. धोनी गो. करन ६, टॉम करन नाबाद १०, जोफ्रा आर्चर नाबाद २७, अवांतर ९, एकूण २० षटकांत ७ बाद २१६
गोलंदाजी ः दीपक चहर ४-०-३१-१, सॅम करन ४-०-३३-३, लुंगी एन्गिडी ४-०-५६-१, रवींद्र जडेजा ४-०-४०-०, पीयुष चावला ४-०-५५-१
चेन्नई सुपरकिंग्स ः मुरली विजय झे. करन गो. गोपाळ २१, शेन वॉटसन त्रि. गो. तेवतिया ३३, फाफ ड्युप्लेसी झे. सॅमसन गो. आर्चर ७२ (३७ चेंडू, १ चौकार, ७ षटकार), सॅम करन यष्टिचीत सॅमसन गो. तेवतिया १७, ऋतुराज गायकवाड यष्टिचीत सॅमसन गो. तेवतिया ०, केदार जाधव झे. सॅमसन गो. करन २२, महेंद्रसिंग धोनी नाबाद २९, रवींद्र जडेजा नाबाद १, अवांतर ५, एकूण २० षटकांत ६ बाद २००

गोलंदाजी ः जयदेव उनाडकट ४-०-४४-०, जोफ्रा आर्चर ४-०-२६-१, श्रेयस गोपाळ ४-०-३८-१, टॉम करन ४-०-५४-१, राहुल तेवतिया ४-०-३७-३