पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या आपण संपर्कात असून प्रत्येक जण विजय मिळविण्यासाठी घोडदौड करीत आहे. किमान २२ ते २३ उमेदवार कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस युतीला मिळेल, असा विश्वास सार्दिन यांनी व्यक्त केला. काही अपक्षांना मागे काढण्यास पक्ष यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.
नावेली मतदारसंघात कॉंग्रेस नेते लुइझिन फालेरो आपल्या विरोधात प्रचारसभा घेत असल्याचा आरोप साबांखामंत्री चर्चिल आलेमाव करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले असता, फालेरो हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे ते पक्षविरोधी काहीही करणार नाहीत. आपण फालेरो यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सार्दिन यांनी सांगितले.
इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना अनुदान देण्याच्या निर्णयाचे सार्दिन यांनी समर्थन केले. गरीब पालकांना आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये प्रवेश मिळवून देणे परवडत नव्हते. त्यामुळेच सरकारने वरील निर्णय घेतल्याचा सार्दिन यांनी पुनरुच्चार केला. कॉंग्रेस म्हणजे एक मोठे कुटुंब आहे. प्रत्येकाने एकमेकाला मदत केली पाहिजे. प्रत्येकाला उमेदवारी मिळणे शक्यच नाही, असे ते म्हणाले.