पणजी महानगरपालिका आणि सहा नगरपालिकांची निवडणूक जरी पक्षपातळीवर घेण्यात आली नव्हती, तरी आता तिच्या विजयाचे श्रेय घ्यायला अपेक्षेनुरूप भारतीय जनता पक्ष पुढे झाला आहे. पणजीत ३० पैकी २५, वाळपईत १० पैकी १०, पेडण्यात १० पैकी ६ अधिक दोन अपक्ष, कुडचड्यात १५ पैकी ११ आणि काणकोणमध्ये १२ पैकी १२ जागा भाजप समर्थित उमेदवारांच्या पारड्यात पडल्याचा पक्षाचा दावा आहे. या यशामध्ये स्थानिक आमदारांचा वाटा मोठा आहे. बाबुश मोन्सेर्रातपासून विश्वजित राणेंपर्यंत आमदारांची कसोटी या निकालात लागलेली होती. आपले वर्चस्व त्यांनी या निकालांतून पुन्हा एकवार सिद्ध केले, परंतु वरील दोघे वगळता इतरांसाठी हे यश निर्विवाद नाही हेही तितकेच खरे आहे.
पणजी महानगरपालिका बाबुश मोन्सेर्रात यांनी ३० पैकी २५ जणांच्या विजयी बहुमतानिशी आपल्या ताब्यात घेतली असली तरी ३० पैकी ३० जागा जिंकण्याचा त्यांचा दावा हवेत विरला आहे. त्यामुळे आपण यावेळी काही प्रभागांत पुरेसा वेळ देऊ शकलो नाही अशी सबब त्यांनी पुढे केली आहे. आपल्या उमेदवारांस अनुकूल होईल त्याप्रमाणे केली गेलेली प्रभाग फेररचना, प्रतिस्पर्धी उमेदवारांचे उद्ध्वस्त केलेले बालेकिल्ले यांनीही निकालात योगदान दिलेले दिसत असले, तरीही काही जागा बाबूश यांच्या हातून नामुष्कीजनकरीत्या निसटल्याच. यावेळी भाजपमय झालेल्या मोन्सेर्रात यांना भाजपच्या निष्ठावंतांकडून अंतर्गत विरोध होता, परंतु ज्या प्रखरपणे तो व्यक्त व्हायला हवा होता तसा तो झालेला दिसला नाही. बाबुश यांच्यापासून दूर राहतानाही पक्षाशी मिळतेजुळते घेण्याचाच बहुतेक बंडखोरांचा प्रयत्न राहिला. त्यामुळे बाबुश यांच्या घोडदौडीला त्यांच्याकडून फारसा अटकाव झालेला दिसला नाही. ‘आम्ही पणजीकर’ गटाचे सुरेंद्र फुर्तादो, पत्नी रूथसह विजयी झाले त्यात त्यांच्या स्वतःच्या आजवरच्या वैयक्तिक कार्यप्रवणतेचा वाटा मोठा आहे. ज्या जागा ‘आम्ही पणजीकर’ने खेचून घेतल्या ते यश संख्या जरी कमी असली तरी मोठेच आहे, कारण येथे त्यांचा सामना बाबुश अधिक सत्ताधारी भाजप असा दुप्पट प्रबळ सत्तेशी होता. तरीही ते टिच्चून विजयी झाले आहेत. बाबुश यांच्या पॅनलच्या विरोधात विरोधक एकवटले त्याला फार उशीर झाला होता. त्यामुळे पुरेसा वेळही प्रचाराला मिळाला नव्हता, हाही एक भाग महत्त्वाचा आहे. ‘आम्ही पणजीकर’च्या अनेक उमेदवारांचा पराभव हा किरकोळ मतांच्या फरकाने झालेला आहे. बाबुश यांचा पुत्र, यतीन पारेख यांचा पुत्र अशी नवी पिढी ह्या निवडणुकीतून राजकीय क्षितिजावर उतरलेली आहे याचीही नोंद घ्यायला हवी.
साखळी पालिकेच्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना मोठा झटका देत धर्मेश सगलानी गटाचा उमेदवार अठरा मतांनी निवडून आला. ही जागा साखळी पालिकेचे समतोल बलाबल पाहता अत्यंत महत्त्वाची होती व त्याचा परिणाम आता पालिका मंडळावरही निश्चितपणे होईल, परंतु ज्या प्रभागामध्ये भाजप समर्थित उमेदवाराचा पराभव झाला तो पारंपरिकरीत्या भाजपकडे कधीच नव्हता हेही लक्षात घ्यावे लागेल. जरी भाजपने व मुख्यमंत्र्यांनी तेथे आपली पूर्ण ताकद लावली होती, तरीही त्यात अपयश आले आहे हेही स्पष्टच आहे.
पेडण्यात भाजपला अधिक जागा प्राप्त झाल्या असल्या तरी अपक्षांनीही बाजी मारली. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्यासाठी हा निर्विवाद विजय नाही. आता उगवत्या सूर्याला दंडवत घालत अपक्ष सदस्य भाजपच्या गोटात डेरेदाखल झाले आहेत हा भाग वेगळा. डिचोलीतही १४ पैकी ९ अधिक १ अपक्ष मिळून १० जागा भाजपच्या हाती येऊ शकल्या किंवा कुडचड्यात १५ पैकी ११ जागा भाजप समर्थित उमेदवारांच्या पदरात पडल्या तरी तो निर्विवाद विजय ठरत नाही. त्याला संमिश्र निकालच म्हणावे लागते. काणकोणमध्ये १२ पैकी १२ जागा जिंकल्याचा दावा भाजपने केला असला काणकोणमधील कामगिरीचे वाटेकरी नेमके कोण हे सांगणे पक्षाने टाळले आहे. या निवडणुकीत बंडखोरीही बर्याच प्रमाणात झाली. या बंडखोरांवर काय कारवाई करणार हा प्रश्न पत्रकार परिषदेत विचारला जाताच प्रदेशाध्यक्षांनी पत्रकार परिषद गुंडाळली.
दक्षिण गोव्यातील कुंकळ्ळी पालिकेवर युरी आलेमाव समर्थकांनी झेंडा फडकवून दक्षिण गोव्यातील ख्रिस्तीबहुल मतदारसंघांतील राजकारणाची दिशा दाखवून दिली आहे. आता ह्या निकालांचा परिणाम आगामी पाच पालिकांच्या निवडणुकांवर कितपत होईल हे पाहावे लागेल. शहरी मतदारांचा कौल कुंकळ्ळीसारखा अपवाद वगळता सत्तेच्या बाजूनेच राहिला आहे, कारण शेवटी जनतेला आपली आणि आपल्या प्रभागांतील कामे झालेली हवी आहेत हाच या निकालाचा खरा अर्थ आहे. हा जनतेने सत्तेला दिलेला कौल आहे. योग्य बोध घेऊन नवनिर्वाचित सदस्य जोमाने कामाला लागतील आणि आपला विजय सार्थ ठरवतील अशी आशा करूया!