>> अरविंद केजरीवाल : गोमंतकीयांना धार्मिक स्थळांचे मोफत दर्शन घडवणार
आपचे सरकार सत्तेत आल्यास गोव्यातील भ्रष्टाचाराला आळा घातला जाणार आहे. ज्या ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला आहे, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यांच्याकडून संपूर्ण पैसा वसूल करून त्यांना तुरुंगात डांबले जाईल, असा इशारा आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक तथा नवी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी काल पत्रकार परिषदेतून दिला. दरम्यान, या दौर्यात केजरीवाल यांनी तिसरी हमी जाहीर करताना गोमंतकीयांना धार्मिक स्थळांचे मोफत दर्शन घडवण्याचे आश्वासन दिले आहे.
भाजप आणि कॉंग्रेस एकत्र मिळून भ्रष्टाचार करत आहेत. भाजपचे सरकार आल्यानंतर कॉंग्रेसच्या कुठल्याही भ्रष्टाचारी नेत्यावर कारवाई झाली आहे का, किंवा कॉंग्रेसचे सरकार आल्यानंतर भाजपच्या कुठल्याही भ्रष्टाचारी नेत्यावर कारवाई झाली आहे का, ही कारवाई का झाली नाही, याचा विचार जनतेने कधी केला आहे का, असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला.
गोवा सरकारमध्ये खूप भ्रष्टाचार माजला आहे. विरोधकांकडून हा आरोप असता, तर समजू शकले असते. मात्र खुद्द गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडून भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. मलिक हे परिपक्व व्यक्ती आहेत. प्रत्येक शब्द ते तोलूनमापून बोलतात. त्यांनी गोव्यातील भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराबद्दल आवाज उठवण्याची दाखवलेली हिंमत कौतुकास्पद आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.
आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यास गोमंतकीयांना धार्मिक स्थळांचे मोफत दर्शन घडविणार आहे. त्यात अयोध्या, शिर्डी, वालांकिणी, अजमेर शरीफ या धार्मिक स्थळांचा समावेश असेल, असे अरविंद केजरीवाल यांनी यावेळी सांगितले.
भाजपकडून खुलेआम भ्रष्टाचार्यांना
वाचवण्याचा प्रयत्न : केजरीवाल
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर जे आरोप केले आहेत, ते फार गंभीर आहेत. मात्र भाजप पक्ष आपल्याला भ्रष्टाचारी मुख्यमंत्र्यांचा बचाव करत आहेत, ही दु:खाची बाब आहे. याचा अर्थ भाजप खुलेआम भ्रष्टाचार्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.