मजुराच्या खून प्रकरणी तिघांना अटक

0
24

>> २४ तासांच्या आत खुनाचा छडा लावण्यात फोंडा पोलिसांना यश

सांतइस्तेव्ह येथील मजुराच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात फोंडा पोलिसांना यश आले असून, या प्रकरणी तिघा जणांना अटक केली आहे. या तिघांनीही खुनाची कबुली दिली असल्याची माहिती फोंडा पोलिसांनी दिली.

मूळ बिहार येथील पण सध्या अमयावाडा-खांडोळा येथे राहणार्‍या हरिंदर हिरालाल प्रसाद (वय ४४) याला जबर मारहाण करण्यात आली होती, त्यात त्याचा मृत्यू झाला होता. या खून प्रकरणी पोलिसांनी सांतइस्तेव्ह येथील कॅब्रिना रॉड्रिगीस (वय २७), तिची एक नातलग रुलाशा फर्नांडिस (वय २३) आणि कॅब्रिनाचा एक मित्र सुनील गजानन मडकईकर (वय ३२, रा. चिंबल-पणजी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

हरिंदर प्रसाद हा खांडोळा-सांतइस्तेव्ह पुलाच्या खाली रविवारी गंभीर जखमी अवस्थेत सापडला होता. स्थानिकांनी याबाबत १०८ रुग्णवाहिकेला कळवल्यानंतर त्याला लागलीच बेतकी आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात नेले जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता.

हरिंदर प्रसाद हा मूळचा बिहार येथील असून, तो आपल्या भावासह अमयावाडा-खांडोळा येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. मागच्या काही महिन्यांपासून त्याची कॅब्रिनाशी मैत्री झाली होती. त्यामुळे हरिंदरचे कॅब्रिनाच्या घरी ये-जा सुरू होती. मात्र सुनील मडकईकर याची कॅब्रिनाशी असलेली मैत्री हरिंदरला खटकत होती, त्यातूनच शनिवारी रात्री हरिंदर व सुनील यांच्यात भांडण झाले. हरिंदरने भांडण उकरून काढल्याने तोच राग मनात धरून सुनील, कॅब्रिना व रुलाशा या तिघांनी त्याला बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या डोक्यावर वार करण्यासाठी अवजड वस्तूचा वापर करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली. या मारहाणीत हरिंदरच्या डोक्याला जबर दुखापत झाली. शरीरावर अन्य ठिकाणी देखील घाव झाले होते. त्यानंतर कॅब्रिना, रुलाशा व सुनील या तिघांनीही दोन दुचाक्या घेऊन एका दुचाकीवर हरिंदरला बसवून खांडोळा-सांतइस्तेव्ह पुलाच्या खाली फेकून दिले व पळ काढला होता.