भरदिवसा प्रियकराचा प्रेयसीवर खुनी हल्ला

0
26

>> मडगाव जिल्हा इस्पितळाजवळील घटना

>> हल्लेखोराचाही आत्महत्येचा प्रयत्न

लग्नाच्या आणाभाका घेऊनही मुलीच्या घरच्यांकडून लग्नाला विरोध होत असल्याने मडगाव जिल्हा इस्पितळाजवळ काल एका प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या गळ्यात सुरा खुपसून खुनी हल्ला केला. त्यानंतर त्याने स्वत:च्या गळ्यात सुरा खुपसून आत्महत्या करण्याचा केला; मात्र त्याचवेळी फातोर्डा पोलीस स्थानकाचे गस्तीवरील पोलीस तेथे पोहचल्याने पुढील अनर्थ टळला.

ही घटना काल सकाळी १०.३० च्या सुमारास जिल्हा इस्पितळानजीक घडली. हल्लेखोर तरुण परशुराम गावस हा दोडामार्ग-सिंधुदुर्ग येथील असून, तो डिचोली येथे एका कुरियर सेवा कंपनीत काम करतो, तर सदर जखमी तरुणी सुचिता गावकर ही डिचोली येथील असून, ती मडगाव जिल्हा इस्पितळाच्या एक्स रे विभागात तंत्रज्ञ म्हणून काम करते.

फातोर्डा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांचे बर्‍याच काळापासून एकमेकांवर प्रेम होते; पण लग्नास मुलीच्या घरच्यांकडून विरोध होत असल्याने परशुराम गावस संतापला होता. काल तो मडगाव येथे आला असता, त्या दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी रागाच्या भरात परशुराम याने सुर्‍याने सुचिताच्या गळ्यावर वार केला. त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत ती खाली कोसळली. त्यानंतर त्याने स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न करून आपल्याच गळ्यात सुर्‍याने वार केला. तेवढ्यात पोलीस सलीम शेख हे तिथे पोहचले. त्यांनी दोघांनाही जिल्हा इस्पितळात दाखल केले व पोलीस निरीक्षक कपिल नायक यांना घटनेची माहिती दिली. तेही तात्काळ घटनास्थळी पोहचले व तपास सुरू केला.

सध्या जखमी मुलीवर जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत, तर परशुराम याची स्थिती गंभीर असल्याने त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल केले आहे.