सत्तरीत माकडतापाचा पहिला बळी

0
102

>> तीन वर्षांत सहा बळी
>> यंदा ८५ रुग्ण सापडले

सत्तरीत यावर्षीचा माकडतापाचा पहिला बळी गेला आहे. केरी-घोटेली खालचा वाडा येथील गुलाबी उर्ङ्ग अनुपमा विठ्ठल गावस (वय ४५) हिचा काल सकाळी गोमेकॉत माकडतापाने मृत्यू झाला. तिला पाच दिवसांपूर्वी साखळी सरकारी इस्पितळात ताप येत असल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिला माकडताप असल्याचे रक्त तपासणीत आढळले होते. शुक्रवारी तिला पुढील उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. तिचा काल गोमेकॉत मृत्यू झाला. तिच्या नवर्‍याचा काही वर्षांपूर्वी
मृत्यू झाला होता. माकडतापाने यावर्षीचा पहिला बळी गेल्याने सत्तरीत भीतीचे वातावरण पसरले आहे.
आतापर्यंत सहा बळी
सत्तरीतील पाली गावापासून सुरू झालेल्या माकडतापाने गेल्या तीन वर्षांत सहा जणांचे बळी गेले आहेत. माकडतापाने पहिल्या वर्षी तीन बळी तर गेल्यावर्षी दोन बळी गेले होते. तर यावर्षी पहिला बळी गेला आहे.
सत्तरीत माकडतापाचे ८५ रुग्ण
सत्तरीत यावर्षी एकूण माकडतापाचे ८५ रुग्ण आढळून आले असून वाळपई सरकारी रुग्णालयात ६५ रुग्ण आढळले आहेत. तर केरी भागात वीस माकडतापाचे रुग्ण आढळले आहेत.
सरकारी यंत्रणा कुचकामी
माकडतापाने सत्तरीत तांडव केले असताना सरकारी यंत्रणा मात्र कुचकामी ठरत असल्याचे केरी-सत्तरी येथील गुलाबी विठ्ठल गावस हिच्या मृत्यूने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे नागरिकांचा सरकारी यंत्रणावर विश्‍वासच राहिला नाही. पाळी सत्तरीपासून सुरू झालेल्या माकड तापावर सरकारने अजूनही नियंत्रण आणल्याचे दिसत नाही. सत्तरीत माकडतापाचे यावर्षी ८५ रुग्ण सापडले असून काल यावर्षीचा पहिला बळी गेला असल्याने नवे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले आहे. ज्यावेळी सत्तरीत माकडताप सुरू झाला होता त्यावेळी विश्‍वजित राणे सरकारच्या विरोधात होते. त्यांनी माकडतापावर योग्य उपचार होत नसल्याने सरकार विरोधात आंदोलन सुद्धा केले होते.
आरोग्य खात्याचे दुर्लक्ष
केरी भागात गेल्या तीन महिन्यांपासून माकडतापाचे अनेक रुग्ण सापडत असताना आरोग्य खात्याने मात्र दुर्लक्षच केले असल्याचे दिसत आहे.