सत्तरीतील भूमिपुत्रांना जमिनींचा मालकी हक्क मिळवून देणार

0
19

>> अरविंद केजरीवाल यांची घोषणा; वाळपई, पर्येत घेतल्या बैठका

सत्तरीतील जमीन मालकीचा प्रश्न गेली ५० वर्षे भिजत पडला आहे. सत्तरीतील लोकप्रतिनिधींनी जाणूनबुजून हा विषय तसाच प्रलंबित ठेवला आहे. राज्यात ‘आप’चे सरकार आले, तर हा विषय सहा महिन्यांत निकाली काढून भूमिपुत्रांना जमिनीचा मालकी हक्क देणार असल्याची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल केली. तसेच आप सत्तेत आल्यानंतर ६ महिन्यांत खाणकाम पुन्हा सुरू होईल, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

वाळपई मतदारसंघातील बुद्रुक करमळी व पर्ये मतदारसंघातील म्हाऊस येथे भूमिपुत्रांशी संवाद साधण्यासाठी घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. बुद्रुक करमळी येथील सभेत सत्यविजय नाईक, राहुल म्हांबरे, पुती गावकर, महादेव नाईक, तर म्हाऊस येथील सभेत गणपत गावकर यांची उपस्थिती होती.

सत्तरी तालुक्यातील शेतकरी गेल्या ५० ते ६० वर्षांपासून शेती करत आहेत; परंतु जमिनीची मालकी गोवा सरकारच्या नावावर आहे. गोवा मुक्त होऊन ६० वर्षे लोटली तरी स्थानिकांना जमिनीचा हक्क मिळालेला नाही. गेल्या ५० वर्षांपासून सत्ताधारी असलेल्या सत्तरी तालुक्यातील लोकप्रतिनिधींना जमिनीचा प्रश्न सोडविण्यात अपयश आले आहे. सत्तरीतील लोकप्रतिनिधींनी स्वत:च्या जमिनी मात्र व्यवस्थित आपल्या नावे करुन घेतल्या. त्यामुळे खरे भूमिपुत्र मात्र वंचित राहिले. त्यामुळे गेल्या ५० वर्षांत जे झाले नाही, ते आता करण्याची वेळ आली आहे, असे केजरीवाल म्हणाले.
गोवा मुक्तीच्या आधीपासून राज्यातील गरीब शेतकरी शेती करीत आलेला आहे; मात्र, तो कसत असलेली शेतजमीन अद्याप त्यांच्या नावावर होत नाही. हा त्यांच्यावर मोठा अन्याय आहे. आता सत्तरीला बदलाची गरज आहे. पहिल्यांदा निवडणुकीत आपने दिल्लीत ७० पैकी ६७ जागा जिंकल्या, भाजपने ३ जागा जिंकल्या आणि कॉंग्रेसला शून्य मिळाले. त्याचप्रमाणे तुमच्या जुन्या नेत्यांना देखील शून्यावर आणा, असेही केजरीवाल म्हणाले.

आम आदमी पार्टीने गेल्या ७ वर्षात दिल्लीत खूप बदल घडवून आणले. दिल्लीतील जनताही भाजप आणि कॉंग्रेसवर खूप नाराज होती. ते कधी कॉंग्रेसला आणायचे, तर कधी कॉंग्रेसवर नाराज होऊन भाजपला आणायचे जे कोणी सरकारमध्ये होते, त्यांनी फक्त स्वतःसाठी काम केले. अखेर या व्यवस्थेला कंटाळून दिल्लीकरांनी नव्या पक्षाला संधी देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी ‘आप’ला मतदान केले, असेही ते पुढे म्हणाले.

दरम्यान, रविवारपासून राज्याच्या दौर्‍यावर असलेल्या केजरीवाल यांनी काल राज्यातील खाण भागाचा देखील दौरा केला.

राज्यातील सर्व जनता जर ठामपणे आम आदमी पक्षाच्या मागे उभी राहिली, तर राज्यात पक्षाचा विजय निश्‍चित आहे. तसे झाल्यास सरकारच्या ताब्यात असलेल्या शेतकर्‍यांच्या जमिनी सहा महिन्यांच्या आत आम्ही शेतकर्‍यांच्या नावावर करू.

  • अरविंद केजरीवाल,
    संयोजक, आप.