सट्टेबाजीप्रकरणी कांदोळीत आणखी एक टोळी अटकेत

0
264

सोमवारी रात्री कळंगुट पोलिसांकडून कांदोळीतील एका आलिशान हॉटेलात घातलेल्या छाप्यात आंध्रप्रदेश येथील चौघांना आयपीएलच्या सट्टेबाजीत गुंतलेल्या ताब्यात घेतले. विदेशात आयपीएल स्पर्धेची सुरूवात झाल्यापासून आतापर्यंत राज्यात बेकायदा सट्टेबाजीत गुंतलेल्यांची एकुण सहा प्रकरणे पोलिसांकडून दाखल करण्यात आलेली आहेत. त्यातील चार प्रकरणे फक्त कळंगुटमध्येच घडल्याची माहिती स्थानिक पोलिस कक्षाकडून मिळाली आहे.

गुप्त सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कळंगुट पोलिसांनी अत्यंत चपळाईने कांदोळीतील सदर हॉटेलचा सर्वप्रथम ताबा घेतला. तेथील आलिशान खोलीत कोलकाता नाईट राईडर्स आणि रॉयल चेलेंजर्स बंगळुरु यांच्यात दुबई येथे खेळल्या जाणार्‍या क्रिकेट स्पर्धेवरुन सट्टेबाजीत दंग असलेल्या आधुरी नागा राजू (४२), इरिंकी व्यंकटा गणेश (२०), पिटानी किशोर कुमार (४२) तसेच रुद्रा सूर्यनारायण राजू (३९) यांना ताब्यात घेतले. यावेळी संशयित आरोपींच्या ताब्यातील रोख रक्कम १५,७८५, ३२ महागडे मोबाईल संच, कॉन्फरन्स बॉक्स तसेच दोन लॅपटॉप मिळून अंदाजे पाच लाखांचा दस्तऐवज जप्त केला.

जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार सर्व चारही आरोपींविरोधात कळंगुट पोलिसांकडून रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. आयपीएल स्पर्धेच्या अनुषंगाने बार्देशातील किनारी भागातील बेकायदा सट्टेबाजीत गुंतलेल्यांच्या विरोधात कळंगुट पोलिसांकडून करण्यात आलेली ही चौथी कारवाई आहे.
या कारवाईत कळंगुटचे निरीक्षक नालास्को रापोझ यांच्या मार्गदर्शनाखाली उप-निरीक्षक सुशांत सांगोडकर, विनोद नाईक विनय श्रीवास्तव आदींनी भाग घेतला.