सख्य

0
132
  • गिरिजा मुरगोडी

फ्रेण्डशीप-डे हा सर्व सर्व स्तरांवरचा मैत्री दिवस, तर हा खास सख्य उजागर करणारा मैत्र दिन. संकल्पना परदेशी; पण माणूस आणि त्याच्या भावना, त्याचं गुंतणं हे सगळीकडं सारखंच. त्यामुळेच या नात्याचं अप्रूप, महत्त्व आणि मोल हेही सर्वांसाठी सारखंच.

८ जूनला म्हणे ‘बेस्ट फ्रेण्ड डे’ होता. असा काही दिवस असतो हे मला माहीत नव्हतं. ‘फ्रेण्डशीप-डे’ चांगला माहीत झालेला आहे. धो-धो मॅसेजीस आणि कवितांचा पाऊस पाडत तो केव्हातरी ऑगस्टमध्ये येतो. अनेक धुक्यात हरवलेल्या नात्यांनासुद्धा उजाळा देतो. पण परवा ८ जूनला असा काही उल्लेख न करता आपल्या भावना व्यक्त करणार्‍या काही ओळी कोणी-कोणी पाठवल्या. नंतर रेडिओवर की कुठेतरी ‘बेस्ट फ्रेण्ड डे’चा उल्लेख आला आणि या दिवसाबद्दल कळलं. फ्रेण्डशीप-डे हा सर्व सर्व स्तरांवरचा मैत्री दिवस, तर हा खास सख्य उजागर करणारा मैत्र दिन. संकल्पना परदेशी; पण माणूस आणि त्याच्या भावना, त्याचं गुंतणं हे सगळीकडं सारखंच. त्यामुळेच या नात्याचं अप्रूप, महत्त्व आणि मोल हेही सर्वांसाठी सारखंच.

मैत्री, सख्य… सर्वात आत्मीय असणारं नात्याचं रूप. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्र हे असतंच असतं. पण प्रत्येक मैत्रीण/मित्र मनाच्या अगदी जवळ असते/असतो असं नाही. वेगवेगळ्या टप्प्यांवर कोणा ना कोणाशी मैत्री होत असते. शाळकरी वयात सोबती असतात, कॉलेजमध्ये असतात, व्यवसाय क्षेत्रात असतात, घरात-नात्यात असतात. पण खूप कमी वा मोजकी माणसे आतल्या कप्प्याशी जोडली जातात. आपलं जगणं जसं वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळ्या प्रकारचं असतं, अगदी तसंच मैत्रीचंही असतं. म्हणजे लोकाभिमुख स्तरावर खूप मित्र-मैत्रिणी असतात, सहकारी असतात ज्यांच्याशी आपलं छान नातं असतं. संवादही होत असतात. तिथे आपण जे वाटून घेत असतो ते खूपसं सर्वसाधारण स्वरूपाचं पण आवश्यक, महत्त्वाचं आणि प्रियही असतं. कधीकधी त्या जोडलेपणात काही वैयक्तिक गोष्टीही वाटून घेतल्या जातात. कारण ते एक वेगळं सख्य असतं… रोज भेटणारं, समजून घेणारं. कधी त्यातलंच कोणी जास्त जिव्हाळ्याचंही होऊन जातं. कौटुंबिक स्तरावरही काही नाती असतात जी रूढार्थानं वेगळी; म्हणजे बहीण, जाऊ, आई, सासू, भावजय, नणंद, पती, दीर, मुलगी, भाऊ, सून अशी असतील. पण यातल्या कोणाशी आपलं अगदी जवळचं मैत्रीचं नातं असतं. तिथे जे संवाद होतात ते आपल्या जगण्याशी फार मनोरमपणे जोडलेले असतात आणि या मैत्रीचं स्थान वेगळं असतं. एक वेगळा आनंद, वेगळं समाधान देणारं असतं. पण आपलं जे स्वतःचं एक आतल्या कप्प्यातलं जग असतं त्याच्याशी जोडली गेलेली माणसे आणि ते मैत्र खूप कमी पण खूप मोलाचे. आत्मीय साद, आतून पटलेली निरामय खूण ही या मैत्रीच्या गाभ्याशी असते. जीव जडतो, मैत्र जुळतं.
प्रत्येक माणूस वेगळा, त्याचा स्वभाव, वृत्ती, आवडीनिवडी सगळं वेगळं. मैत्री होते तेव्हा यातल्या काही गोष्टी जुळतात म्हणून होते. पण सगळ्यात महत्त्वाचं असतं ते त्या-त्या व्यक्तीची मूळ समज, जाण. जे व्यक्त करू ते समजू शकण्याचा स्तर, प्रगल्भता, एकमेकांसोबत असतानाची सहजता, वेव्हलेंग्थ जुळणे, आपल्याला पटलेली ती निरामय खूण त्याही व्यक्तीला पटणे… हे सगळं प्रत्येकाबाबत असणं अर्थातच शक्य नसतं. म्हणूनच जे कोणी मनाजवळ असतं ते कितीही दूर असलं तरी कायम सोबत असतं. कुठल्याही प्रसंगी काहीही वाटून घ्यावंसं वाटलं तर पहिली आठवण त्याची होते. आणि ज्यांच्याबाबत हे शक्य नसतं ते सतत सोबत असले तरी खूप दूर असतात. मैत्र जर सुदैवाने सहचराबरोबरच जुळू शकलं तर मग जगणं हा फार हर्षद असा प्रवास असतो. जुळू शकलं नसेल तरी त्यात त्या माणसाचा वा आपला दोष नसतो. जर एकाला यंत्र-तंत्र-विज्ञानाची जाण अन् दुसर्‍याला कला-साहित्य-संगीतात गती असे असेल तर सहज संवाद जमणं कठीण. मग ‘हं हं’ करत राहाणं आणि हळूहळू हे वाटून घेणं कमी कमी होत संपून जाणं हे स्वाभाविकच. त्यातूनही किमान रसिकता असेल तर दोघं मिळून काही कलांचा आस्वाद घेऊ शकतात आणि किमान जिज्ञासा असेल तर यंत्र-तंत्र समजून घेण्याचा प्रयत्न होतो. एकाला राजकारणाच्या गप्पा अतिप्रिय, तर दुसर्‍याला त्यात अजिबात रस नसणं, एक नेहमी व्यवहाराला महत्त्व देणारा, तर दुसरा भावनेला… असं असेल तर तिथेही सहज संभाषण कमी असणं स्वाभाविक. कोणताही निर्णय घेताना एकाचं हृदय पुढे धावत असेल आणि दुसर्‍याचा मेंदू तर मतभेद अटळच. मग काहीतरी मध्यमार्ग काढणं हाच उपाय. पण जिथे हा समतोल एकविचारानं, सहविचारानं आपोआप साधला जात असेल तिथे मित्रत्व असतं. चर्चा, संवाद यातून मार्ग आणि आनंद मिळतो. ते मैत्र फुलत जातं.

कधी एखाद्याची गरज आणि अवलंबन असतं जवळचं मैत्र हवं असण्याचं. तशी भावनिक गरज आपल्या सर्वांचीच असते ती. पण अवलंबन असतं तेव्हा ते कधीकधी एकतर्फी नातंही असू शकतं. म्हणजे बर्‍याचदा एकानं बरसणारं आभाळ व्हायचं आणि दुसर्‍यानं झेलणारी धरा… असं नातंही असू शकतं. अशा वेळी विश्‍वासाचं, दिलाशाचं ठिकाण असतो आपण. पण त्या व्यक्तीकडून आपल्याला तीच अपेक्षा असते असं नाही. कारण आपल्या मनाच्या गाभ्यापर्यंत ते माणूस पोहोचू शकेलच असं नाही. खरं तर एक असं मैत्र, जे विश्‍वास आणि दिलासा यांबरोबरच परिस्थितीचं, मनःस्थितीचं आकलन आणि पुढच्या मार्गावरचा प्रकाशकिरण याबाबत स्वाभाविक संवादाचा सेतू बनू शकतं. ते खूप जवळचं असतं. एक वेगळी ऊर्जा मिळत असते अशा नात्यातून. एक निभ्रांतपण, आश्‍वस्तपण असतं त्या सोबतीत. जेव्हा हे सगळं दोघांच्याही बाबतीत तितक्याच सहजतेनं घडत असतं तेव्हा ते दोघांसाठीही फार मोलाचं आणि दृढ होत जाणारं मैत्र असतं… ज्यात कुठले उपचार नसतात, किंतु नसतात, एक मनमोकळं नातंच!

मैत्रीमध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, स्नेह, समजूत, मनस्वीपण, जीव जडणं, एकमेकांसाठी जीव तुटणं, छोट्या-छोट्या कृतींमधून समजून घेणं, जाणवत राहाणं, कोणत्याही परिस्थितीत मनोबल उंचावत सकारात्मक राहाण्यास प्रवृत्त करणं, कधी मतभेद, वादविवाद, खळखळून हसणं, उन्मळून रडणं, भरभरून बोलणं, कधी अंतर पडणं, पुन्हा जवळ येणं, सगळं सगळंच असतं. केवळ ‘हो’ला ‘हो’ म्हणणं वा जे करत असाल त्याबद्दल फक्त प्रशंसा लाभत राहाणं हेही नसतं. खरी प्रतिक्रिया, खरं मत, एखाद्या प्रसंगी तुमच्या वागण्याचं केलेलं परखड विश्‍लेषण, योग्य मूल्यमापन, दुसरी बाजू दाखवून देणं, तुमचं योग्य असेल त्यावेळी त्यावर ठाम राहाण्यास बळ देणं असंही खूप काही असतं. दोन्ही बाजूंनी हे घडत असतं. परिपूर्ण आणि प्रगल्भ नातं असतं ते. तिथे तुम्ही जे आणि जसे आहात तसेच वावरू, दिसू शकता. कोणतेही मुखवटे घालण्याची गरज नसते. भावना व्यक्त वा सुप्त; पण एक निरपेक्ष अतूट रेशीमधागा नित्य जोडलेला असतो. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असं मैत्र हे अगदी अढळ स्थानावर असतं, मग नित्य संपर्क असो वा नसो, नित्य भेटी घडोत वा न घडोत, ते मनाच्या अगदी जवळ असतं… सतत!