- डॉ. सीताकांत घाणेकर
ही वेळ नकारात्मक विचार करण्याची नाही तर उच्च सकारात्मक चिंतन करण्याची वेळ आहे. आपले प्रत्येकाचे कुठे चुकले हे तपासण्याची वेळ आहे. आपला पेपर आपणच तपासायचा आहे. आपणच विद्यार्थी व आपणच शिक्षक. यालाच योगसाधनेत- ‘स्वाध्याय’ म्हणतात.
दिवसामागून दिवस पुढे जाताहेत- मार्च संपून एप्रिल मास सुरु झाला, आणि आज त्याच्या मध्यावर पोचलो आहोत, तरीही जगभर कोरोनाचा धुमाकूळ चालूच आहे. बहुतेक राष्ट्रांना या सूक्ष्म पण भयंकर विषाणूची झळ लागली आहे- मोठ्या- छोट्या; श्रीमंत- गरीब, बलाढ्य- दुर्बल- कुणाचीही सुटका नाही. लाखो लोकांना रोगाची लागण होते आहे. हजारोंनी लोक दर दिवशी मृत्युमुखी पडताहेत. आशेचा एक किरण म्हणजे अनेक व्यक्ती या रोगापासून मुक्त होत आहेत.
सारांश़ काय…तर कोरोनाची करणी चालूच आहे. अपेक्षित करुणा काही होत नाही. पण एक गोष्ट खरी की स्वार्थी, अहंकारी, दुष्ट… मानवाला हा छोटासा विषाणू योग्य तो धडा शिकवत आहे. शरिराने जवळ पण मनाने दूर झालेल्या मनुष्याला तो चांगला पाठ देत आहे. आशा ठेवू या की आपण सर्व बोध घेऊ!
आम्ही म्हणू .. आपण सर्व? हो, बरोबर. कारण आपल्यापैकी प्रत्येकजण या विनाशाला कारणीभूत आहोत. अर्थात.. प्रमाणात थोडाफार फरक अवश्य असेल. सृष्टीच्या विनाशात आपला सर्वांचाच सहभाग आहे. थोडा अभ्यास केला, थोडे चिंतन केले की लगेच लक्षात येईल.
सृष्टी म्हणजे फक्त बाहेरची सृष्टी म्हणजे विश्वच नाही तर आपणदेखील सृष्टीत येतो. कारण आपण सृष्टीचे अविभाज्य घटक आहोत. आपल्यातही सृष्टी आहे.
ही वेळ नकारात्मक विचार करण्याची नाही तर उच्च सकारात्मक चिंतन करण्याची वेळ आहे. आपले प्रत्येकाचे कुठे चुकले हे तपासण्याची वेळ आहे. आपला पेपर आपणच तपासायचा आहे. आपणच विद्यार्थी व आपणच शिक्षक. यालाच योगसाधनेत- ‘स्वाध्याय’ म्हणतात- अष्टांगयोगातील चौथा नियम.
‘स्वाध्याय’ या नियमाचा आधी आम्ही फार विस्ताराने विचार केलेला आहे. पण उजळणी म्हणजे – ‘मी कोण? कुठून आलो? मी कुणाकडून आलो? मला कुठे जायचे? माझ्या जीवनाचे ध्येय काय? मी का आलो? मी म्हणजे जीव – माझा आणि जगत व जगदीशाचा संबंध काय? माझ्याकडून काय अपेक्षा आहेत? त्या अपेक्षांप्रमाणे मी वागतो काय? माझे जे कर्म आहे त्याचे उत्तरदायित्व आहे का?- सत्कर्म- विकर्म- अकर्म… असे विविध प्रश्न, विविध मुद्दे….
प्रत्येकाने स्वतःचे उत्तर शोधूनज्या चुका सापडतील त्यांचे समर्थन न करता सृष्टीकर्त्याकडे त्याबद्दल माफी मागणे अत्यंत गरजेचे आहे. कळत- नकळत आपण चुका करतो- स्वार्थामुळे, रागद्वेषामुळे, अज्ञान अथवा विपरीत ज्ञानामुळे.
भगवंत क्षमाशील आहे. तो करुणेचा, दयेचा सागर आहे. आम्ही नेहमी प्रार्थना करायची असते,. कदाचित आम्ही ती आता म्हणत नाही. पण आता पुष्कळ वेळ आहे- सध्या वेळच वेळ आहे.
* करचरणरजकृतं वाक्कायजं कर्मजं वा |
श्रवणनयनजं वा मानसं वाऽपराधम् |
विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व |
जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो ॥
– हात, पाय, वाणी, शरीर, कर्म, काज, डोळे, मन यांच्या द्वारे कळत- नकळत जे योग्य- अयोग्य अपराध मी केले असतील, त्या सर्व अपराधांची, हे करुणासागरा महादेवा, तुम्ही मला क्षमा करा. तुमचा जयजयकार असो!
त्याचबरोबर दुसरी प्रार्थना म्हणजे-
* त्वमेकं शरण्यं त्वमेकं वरेण्यं |
त्वमेकं जगत्पालकं स्वप्रकाशम् |
त्वमेकं जगत्कर्तृपातृप्रहर्त
त्वमेकं परं निश्चलं निर्विकल्पम् ॥
– भगवंता! तूच शरण जाण्यास योग्य आहेस, तूच सर्वश्रेष्ठ आहेस, तूच एक जगाचा पालक आहेस, तूच स्वतःच्या प्रकाशाने प्रकाशित होतोस. तूच या जगाचा कर्ता, पालक व संहारक आहेस. तूच एक अचल, विकल्परहित व श्रेष्ठ आहेस.
या दोन प्रार्थनांमध्ये क्षमा मागितलेली आहे. तसेच भगवंताचे विश्वातील स्थान आहे. तरीपण तेवढी जवळीक साधेल याची शाश्वती नाही. म्हणून आपल्या ज्ञानी ऋषींनी तिसरी अत्यंत भावनिक प्रार्थना दिली आहे…
* त्वमेव माता च पिता त्वमेव |
त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव |
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव |
त्वमेव सर्वं मम देवदेव ॥
– हे देवाधिदेवा! तूच माझी आई, तूच माझा पिता, तूच माझा भाऊ, तूच मित्र, तूच विद्या, धन आणि तूच माझे सर्वस्व आहेस.
इथे माझे आणि भगवंताचे अगदी जवळचे नाते सांगितले आहे. खरे म्हणजे परिवारातली विविध नाती.
या सर्व प्रार्थना म्हणताना फक्त पोपटपंची अपेक्षित नाही. तर या प्रार्थनांचा शाब्दीक अर्थ, गर्भितार्थ, भावार्थ व आध्यात्मिक अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणे कृती करणे अपेक्षित आहे. तसेच आपण आपल्या स्वतःच्या माता-पिता-भाऊ-मित्र… यांच्याशी कसे वागतो याबद्दलही विचार हवा. कसेही वागणे इथे चालणार नाही. तसे स्वार्थाचे नाते इथे खपवून घेतले जाणार नाही. याची संपूर्ण जाणीव प्रार्थना म्हणणार्या प्रत्येक व्यक्तीला हवी. आपल्या अंतर्मनात काय चालले आहे हे इतरांना माहीत होत नाही. पण सर्वज्ञानी परमेश्वराला सहज ज्ञात होते.
संकटाच्याच वेळी आई मुलाला अगदी जवळ हवी असते. कारण त्यावेळी त्याला माहीत असते की मी असमर्थ आहे व माझी आई समर्थ आहे. मूल अगदी हृदयापासून आपल्या आईला बोलावते. म्हणजे हीच एक योग्य वेळ आपल्या सर्वांसाठी आहे कारण आपण किती समर्थ आहोत याची जाणीव प्रत्येकाला होते आहे.
ही जवळीक साधण्यासाठी, अनुभव घेण्यासाठी व अनुभूती घेण्यासाठी एक विज्ञान म्हणजे योग… सर्व मार्ग, सर्व पैलू… कारण योगाची व्याख्याच तर सांगते…
– युज्यते अनेन इति योगः| आत्मा व परमात्मा यांचे भावमीलन. एवढी एकच गोष्ट लक्षात ठेवू या की संकट संपल्यावर आपण शेफारून जाऊ नये. परत एकदा उद्धट होऊ नये.
या क्षणी मला एक गोष्ट आठवते- एका जंगलात एक उंदीर होता. त्याच जंगलात एक ऋषींचा आश्रम होता. एक दिवस तो उंदीर पळत पळत ऋषीजवळ आला. तो भयभीत झाला होता. अगदी थरथरत होता. ऋषींना म्हणाला, ‘‘भाऊ, मला वाचवा. ती मांजर माझा पाठलाग करीत आहे. ती मला खाणार.’’
ऋषीला दया आली. त्याने पाणी हातात घेऊन मंत्र म्हटला व त्या उंदरावर मारले. लगेच तो उंदीर मांजर झाला. ऋषीने म्हटले, ‘‘आता जा त्या मांजरीचा सामना कर’’. उंदराला आश्चर्य वाटले. तो ऋषीचे आभार मानून निघून गेला. आता त्याला मांजरीपासून भीती नव्हती. थोेड्या दिवसात एक मांजर ऋषीजवळ आले व म्हणाले, ‘‘महाराज, आपण मला उंदरापासून मांजर बनवले होते.’’ ऋषी म्हणाले, ‘‘हो, माहीत आहे. पण आता काय झाले?’’ मांजर म्हणाले, ‘‘अहो, आता तो मोठा कुत्रा मला छळतो.’’ ऋषींनी लगेच मंत्रोच्चार करून पाणी त्याच्यावर मारले. आणि मांजर कुत्रा झाले. ऋषीचे आभार मानून कुत्रा निघून गेला.
पण… संकटे काही संपेना. तो कुत्रा परत ऋषीकडे आला. कारण आता वाघ त्याला त्रास देत होता. ऋषींना दया आली आणि लगेच त्यांनी कुत्र्याला वाघ बनवले.
वाघ झाल्याबरोबर त्याला समोर ऋषी दिसले. त्याच्या मनात दुष्ट, स्वार्थी विचार आला. ‘‘चांगलेच भक्ष्य माझ्यासमोर आले. आता माझी भूक मी शमवीन.’’
ऋषींनी लगेच मंत्राचे पाणी वाघावर मारले आणि त्याला परत उंदीर केले.
उंदीर म्हणाला, ‘‘असे काय करताय हो? तुम्हीच मला मांजर- कुत्रा- वाघ केले. आता परत उंदीर का केला? हे बरोबर नाही.’’
ऋषी हसत म्हणाले, ‘‘अरे मूर्खा उंदरा, तुझ्यावर दया करून तुला मी मदत केली. पण वाघ झाल्याबरोबर तुझ्या मनात मलाच खाण्याचा दुष्ट विचार आला. माझ्या शक्तीने जर मी तुझे एका प्राण्यातून दुसर्या प्राण्यात परिवर्तन करू शकतो, तर तुझ्या मनात आलेले विचार मला कळणार नाही? तू कृतज्ञ नाहीस तर कृतघ्न आहेस. तुझी हीच लायकी आहे. तुला क्षमा नाही.’’
उंदीर पश्चात्तापाने मागे फिरला. कोणतीही गोष्ट ही नेहमी बोध घेण्यासाठी असते. आपणही विचार करायला हवा- आपण कृतज्ञ आहोत की कृतघ्न? – ज्या सृष्टीने आमचा मातृवात्सल्याने सांभाळ केला त्याच सृष्टीचा आपण नाश केला. स्वतःला फार मोठा सामर्थ्यवान समजलो. आता आपलाच संहार होतोय.
प्रत्येकजण स्वाध्याय करू या- ‘‘मी कृतज्ञ की मी कृतघ्न?’’
कृतघ्न असेन तर देवाकडे मघाशी बघितलेल्या प्रार्थना अगदी हृदयापासून म्हणू या. एकटे नाहीतर कुटुंबातील प्रत्येक सदस्यासोबत. आणि आता तर सर्वजण लक्ष्मणरेषेच्या आतच आहोत ना. सहकुटुंब- सहपरिवार. मग अगदी सोपे आहे.