- मीना समुद्र
कलाप्रेमी, रंगकर्मी, उत्कृष्ट संयोजक, दिग्दशक, यशस्वी व्यावसायिक, माणूसवेडे परेशभाई वास्कोकारांपुढेच नाही तर साऱ्या जणांपुढेच सौजन्याचा सात्विक संदेश ठेवून गेले आहेत. सत्य-शिव-सुंदराची कास धरणारे परेशभाई आता आपल्यात नाहीत. त्यांना आदरांजली!
6 ऑगस्ट रोजी, बुधवारी परेशभाई देवाघरी गेले.
अतिशय देखणे, सदासतेज, प्रसन्न आणि उमद्या व्यक्तिमत्त्वाचे परेशभाई अनंतात विलीन झाले. वास्कोनगरीची शान आणि मान असलेले श्री. परेश जोशी गेले ही बातमी हां हां म्हणता सर्वत्र पसरताच वास्कोनगरीवरच नव्हे तर गोवाभर एक झाकोळ पसरला. आणि गोवाभरातून त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी माणसांची रीघ लागली.
हे श्रीदामोदर सप्ताहाचे दिवस. कामाचा दिवस होता तरी सप्ताहाच्या जत्रेत मुलामाणसांची ही गर्दी उसळलेली. वाहनांना मज्जाव होता. त्यामुळे दूर वाहने उभी करून ‘इंच इंच लढवू’ अशा स्थितीत चालावे लागत असूनही माणसांची दाटी झालेली. डोळे पाणावलेले, हुंदके गळ्याशी दाटून आलेले, गालावरून अश्रू ओघळत असलेले. कोणी निकराने दुःख आतल्या आत दाबून धरलेले. परेशभाईंच्या भल्या मोठ्या कुटुंबातले सारेच जण- भाऊ, भावजया, मुले, मुली, नातवंडे, भाचे-पुतणे मोठ्या धीराने दुःख सोसत संयमाने अवतीभोवती उभे. त्यातच आमची सखी- परेशभाईंची सहचारिणी- ललिता हिची धीरगंभीर मूर्ती. तिच्या मनी माजलेला भावकल्लोळ कसा आवरत असेल? 50-52 वर्षांचा सुखी संसार- दृष्ट लागावासा. प्रत्येकाची वेळ असते ठरलेली जाण्याची. विधिलिखितच असते ते. तरी लक्ष्मीच्या पावलांनी गृहप्रवेश केलेल्या या बुद्धिमान सरस्वतीने सावित्री बनून तिच्या सत्यवानाला निरामय आयुष्य देण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि निर्वाणाआधीची त्यांची इच्छा पूर्ण केली.
आजोबा-पणजोबांपासून चालत आलेल्या प्रथा-परंपरेचे पालन मोठ्या श्रद्धेने, भावभक्तीने आणि निष्ठेने करणाऱ्या आणि मग ते वाण पाठच्या भावाहाती सोपविणाऱ्या परेशभाईंना आणि ललिताला आपली संस्कृती आणि परंपरा जपली जावी, आजच्या आणि पुढच्या पिढीनेही दामोदर सप्ताहाचा इतिहास आणि भजनपरंपरेचा महिमा जाणावा, या उद्देशाने दामोदर सप्ताहाविषयी एक पुस्तक काढावे असे वाटत होते. त्यांची ही इच्छा ‘मुरगावचा दामबाब’ या सुंदर पुस्तिकेचे प्रकाशन सप्ताहादिवशी करून म्हणजे 30 ऑगस्ट 25 ला ललिताने पूर्ण केली. आणखी एक इच्छा पूर्ण झाली ती म्हणजे घरात- ‘आनंदी’ या वास्तूमध्ये आपल्या कुलदेवतेची, तुळजा-भवानीची स्थापना करावी ही इच्छाही कुटुंबीयांनी पूर्ण केली. आणि ज्या दामोदराचं वास्तव्य आणि वरदहस्त परेशभाईंवर सतत राहिला; सर्वांच्या उन्ननयाची इच्छा हा ज्यांचा श्वास आणि त्यासाठी अथक प्रयत्न हा त्यांचा ध्यास होता; त्यानेच सप्ताहाचे पूर्ण सात दिवस उलटल्यानंतर त्यांना आपल्याकडे बोलावून घेतले. कशाच्याही आणि कोणाच्याही मध्ये न येता त्यांनी श्रावणातल्या दामोदर सप्ताहाच्या त्या पुण्यकालात स्वर्गाची वाट धरली. पुण्यवान माणसांनाच असे भाग्य लाभते.
परेशभाईंचे निवासस्थान म्हणजे वास्कोत येणाऱ्या नाटकातील मंडळींचे, विद्वान मंडळींचे, सप्ताहातील गायक कलाकारांचे विश्रामस्थळ. त्यांच्या वास्कोतील कलाकारांशी, साहित्यिकांशी परिचय घडवून आणण्याचे काम या दंपतीने केले. घरची सारीच मंडळी स्वागतशील, सुसंस्कृत, सुविद्य, सुसंस्कारी. त्यामुळे घराचे ‘आनंदी’ हे नाव सार्थ ठरले. परेश-ललिता गुणग्राही, साहित्यकलासंगीतप्रेमी. ॲमॅच्युअर्स ड्रॅमॅटिक असो. या त्यांच्या संस्थेत कितीतरी नवख्या तरुणांचा भरणा होता. या साऱ्यांना परेशभाईंनी घडवले. त्यांच्या मंचीय हालचाली, त्यांचे उच्चार, अगदी माईक कसा धरावा इथपासून सारे शिकवले, दाखवले आणि अनेक साजिऱ्या मूर्ती घडवल्या. नाट्यवेड्या गोमंतकातल्या या मंडळींनी आपल्या नाटकाद्वारे महाराष्ट्रच नव्हे तर दिल्लीतही यशाचे झेंडे लावले, विजयाचे पडघम वाजवले. ते खरोखरच ‘परेश’ नव्हे तर ‘परीस’ ठरले. ज्ञानेश्वरी सप्तशताब्दीनिमित्त त्यांनी दिग्दर्शित केलेल्या संतसाहित्यावर आधारित ‘अमृतातेहि पैजा जिंके’ या प्रयोगात 50-60 जणांचा संच घेऊन त्यांनी गोमंतक मराठी अकादमीतर्फे 25 प्रयोग गोव्यात आणि दोन मुंबईत सादर केले. त्यात थेंबाऐवढेही काम माझ्या वाट्याला नव्हते; पण खूप सुंदर आत्मिक समाधानाचे दिवस अनुभवले. 2-3 महिने प्रॅक्टिस चाले आणि सगळ्यांनी सर्ववेळ हजेरी लावावी असा प्रयत्न होता. सुषमा दामले, चित्रा जहागिरदार, अनिता गदगकर, मीता कामत या साऱ्यांची मधुर गाणी मनाचे कान करून ऐकत असू. नृत्य-नाट्य-संगीतमय असा हा कार्यक्रम खरोखरच अमृताचा वर्षाव होता.
स्नेहमंदिरच्या उद्घाटनानंतर शेवटी पसायदान म्हणण्यासाठी ललिता-परेश-अण्णा यांनी नेले होते. पु.लं.च्या 75 व्या वाढदिवसानिमित्ताने कलाअकादमीत त्यांचा सत्कार केला तेव्हा म्हटलेल्या पसायदानाचे कौतुक पु.लं.नी पसंतीदर्शक मान हलवून केले, ते भाग्य वाट्याला येण्याचे श्रेयही या दोघांना. दुसऱ्या दिवशी पु.लं.च्या पायाजवळ बसून कवितावाचनाची संधी आणि ‘आणखी म्हणा’ असे कौतुकाचे शब्द या साहित्यातील आणि माणसांतील माझे दैवत असणाऱ्या पु.लं.कडून ऐकल्यावर जे वाटले ते शब्दात सांगता येणार नाही. हा ब्रह्मानंद लाभला तोही त्यांच्यामुळेच.
एका सप्ताहाच्या वेळची एक आठवण. हे आणि मी रांगेत उभे होतो. तेव्हा परेशभाईंनी ते पाहिले आणि ‘रांगेत कशाला उभे राहता? आतून घरातून या’ असे म्हणून आत बोलावले. आम्हा मैत्रिणींना ललिता-परेशभाईमुळेच विनासायास दर्शन आणि महाप्रसादाची संधी मिळते आणि माणसांचे प्रेम, माणसांची आवड असलेल्या या दोघांमुळे अनेकांशी परिचयाची संधी मिळते. बोलावे कसे, वागावे कसे, माणसांचा आदर कसा करावा, त्यांची बूज कशी ठेवावी हे सारे नकळत मनावर ठसते. थोरल्यांचा आदर्श साऱ्या कुटुंबीयात पाझरलेला दिसतो.
कलाप्रेमी, रंगकर्मी, उत्कृष्ट संयोजक, दिग्दशक, यशस्वी व्यावसायिक, माणूसवेडे परेशभाई वास्कोकारांपुढेच नाही तर साऱ्या जणांपुढेच सौजन्याचा सात्विक संदेश ठेवून गेले आहेत. सत्य-शिव-सुंदराची कास धरणारे परेशभाई आता आपल्यात नाहीत. त्यांना आदरांजली!

