संशय दूर व्हावा

0
200

राज्यामध्ये मच्छीमारी बंदी लागू असल्याने परराज्यांतून आयात होत असलेल्या मासळीतील फॉर्मेलीनच्या वापराचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यावेळी कॉंग्रेस पक्षाकडून तो उपस्थित केला गेला असल्याने त्याला राजकीय परिमाण मिळाले असले, तरी हा विषय सर्वसामान्य गोमंतकीयांच्या जीविताशी संबंधित आहे. त्यामुळे त्यासंदर्भातील वस्तुस्थिती जनतेसमोर आली पाहिजे. कॉंग्रेसने फॉर्मेलीनचा विषय उपस्थित करताच आरोग्यमंत्र्यांनी व स्वतः मुख्यमंत्र्यांनी तो आरोप फेटाळून लावला आणि गोव्यातील मासळी खाण्यास सुरक्षित असल्याची ग्वाही दिली आहे, पण दुधाने ओठ पोळले की ताक देखील फुंकून पितात, तसे गोमंतकीय या विषयामध्ये धास्तावलेले आहेत. याचे सर्वांत प्रमुख कारण म्हणजे अन्न व औषध प्रशासनाने यापूर्वीच्या फॉर्मेलीनच्या वादामध्ये आपली पत पूर्णपणे गमावलेली आहे. जनतेचा एफडीएवर अजिबात विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे कोणीही हा विषय उपस्थित करताच जनतेच्या मनामध्ये संशयाची पाल चुकचुकणे साहजिक आहे. गेल्या वेळी मासळीतील फॉर्मेलीनसारख्या घातक रसायनाच्या वापराचा विषय उपस्थित होताच तत्कालीन सरकारने अनेक कडक उपाययोजनांची ग्वाही जनतेला दिली होती. अन्न व औषध प्रशासन मत्स्योद्योग खाते व पोलिसांच्या मदतीने सर्व प्रमुख बाजारपेठांतील मासळी नियमितपणेे तपासेल, कुठे फॉर्मेलीन आढळल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाईल असे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी व आरोग्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार मासळीच्या घाऊक बाजारपेठेत येणार्‍या मासळीच्या दैनंदिन तपासणीची तथाकथित व्यवस्था करण्यात आली. राज्याच्या सीमेवरही येणार्‍या मासळीची तपासणी करण्याचा देखावा काही काळ झाला. त्यातील गैरप्रकार तेव्हा जागृत नागरिकांनी उघडकीस आणला. राज्यात आणली जाणारी मासळी केवळ इन्सुलेटेड वाहनांतूनच आणण्याचे बंधन सरकारने घातले. मग शेजारील प्रदेशांतील राजकारण्यांच्या दबावाखाली येऊन तेथील मासळीला त्यातून वगळण्यात आले. गोमंतकीय जनतेने हे सारे पाहिलेले आहे. त्यामुळे जेव्हा पुन्हा एकदा फॉर्मेलीनच्या विषयामध्ये संशय व्यक्त केला जातो, तेव्हा जनतेच्या मनामध्ये धास्ती निर्माण होणे चुकीचे म्हणता येणार नाही. कॉंग्रेसने केलेला आरोप पुरेशा जबाबदारीने केलेला असेल अशी अपेक्षा आहे. त्यांनी आरोप करताना खासगी प्रयोगशाळेतील तपासणीचा हवाला दिलेला आहे, जो सरकारला मान्य नाही, परंतु खासगी प्रयोगशाळेतील निष्कर्ष आहेत म्हणून ते अविश्वसनीय आहेत असे न म्हणता किंवा केवळ कॉंग्रेसची तक्रार आहे म्हणून ती राजकारणप्रेरित आहे असे न मानता सरकारने जनहित लक्षात घेऊन तिची योग्य प्रकारे शहानिशा करणे अपेक्षित आहे. आम्ही सांगतो तेच खरे ही हडेलहप्पी आरोग्यमंत्र्यांनी सोडावी आणि जनहितार्थ या विषयातील त्रुटींचा शोध घेऊन फॉर्मेलीनच्या भीतीला कायमची मूठमाती देण्याचा प्रयत्न करावा. मुख्यमंत्र्यांनी या विषयात तातडीने बैठक घेतली. संशयाच्या निराकरणासाठी केंद्रीय गुणवत्ता तपासणी संस्थेची मदत घेण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवलेला आहे, तो स्तुत्य आहे. संशयाचे निराकरण करण्याची पात्रता सरकारच्या एफडीएने गमावलेली आहे. त्यामुळे किमान नावाजलेल्या केंद्रीय यंत्रणांच्या साह्याने हा संशय जर दूर करता आला तर ते जनतेच्या हिताचे ठरेल. केवळ मासळीतील फॉर्मेलीन एवढाच हा विषय खरे तर सीमित नाही. गोव्यामध्ये बहुतेक भाजीपाला आणि फळफळावळ बाहेरून येत असते. ती आणि जी गोव्यातून येते तीही रसायनांचा वापर न करता पिकवली जाते असे म्हणणे खरोखर धारिष्ट्याचेच ठरेल. आंबे असोत, केळी असोत, भाज्या असोत, घातक रसायनांचा वापर करण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा उघडकीस आलेले आहेत. परंतु जनता निरुपाय म्हणून केवळ परमेश्वरावर विश्वास ठेवून निमूट ती खरेदी करीत असते. त्याचे दुष्परिणामही जनतेच्या आरोग्यावर होत असतात. हे सारे थोपवणे जागृत ग्राहकांच्याही आवाक्याबाहेरचे आहे. तेथे सरकारी यंत्रणाच सक्षम हवी, जी हे गैरप्रकार थोपवू शकते. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय कार्यतत्परता महत्त्वाची असते. मासळीतील फॉर्मेलीनचा विषय जेव्हा यापूर्वी चर्चेत आला, तेव्हा त्यातून काही दलालांचे राजकारण्यांशी असलेले हितसंबंधही उघडे पडले होते. सरकारच्या उपाययोजनांबाबत जनतेमध्ये साशंकता आहे ती त्यामुळे. गोव्यात कोणकोणत्या राज्यातून किती मासळी आयात केली जाते, कोण करते यासंबंधीची कोणतीही अधिकृत आकडेवारी तेव्हा सरकारजवळ उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले होते. किमान यावेळी किती मासळी आयात झाली व किती नमुने तपासले गेले याचा लेखाजोखा सरकार येत्या विधानसभा अधिवेशनात मांडील अशी अपेक्षा आहे! राज्यातील अन्न व औषध प्रशासन यंत्रणा अधिक सक्षम करण्याची ग्वाही सरकारने दिली होती त्याचे काय झाले? परराज्यांतून येणार्‍या मासळीच्या सुरक्षितेसंबंधी जनतेमध्ये विश्वास प्रस्थापित करायचा असेल तर आधी संबंधित सरकारी यंत्रणांनी विश्वास कमावावा लागेल!