>> अध्यक्षपद मिळवणारे भारताचे पहिले पंतप्रधान
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे (यूएनएससी) अध्यक्षपद हे दि. १ ऑगस्टपासून एक महिन्यासाठी भारताकडे राहणार आहे. परिषदेचे अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे असेल. या परिषदेचे अध्यक्षपद मिळवणारे मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे माजी राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी काल रविवारी ही माहिती दिली.
सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद हे एक महिन्यासाठी भारताकडे आल्यानंतर पाकिस्तानमध्ये चलबिचल सुरू झाली असून भारत आपल्या विरोधात काही कारवाई करेल अशी भीती पाकिस्तानला वाटू लागली आहे. यामुळे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारत या कालावधीत निष्पक्ष होऊन काम करेल, अशी अपेक्षा त्वरित व्यक्त केली आहे.
गेल्या ७५ वर्षांत पहिल्यांदाच भारतीय राजकीय नेतृत्वाने संयुक्त राष्ट्रांच्या १५ सदस्यीय संस्थेचे अध्यक्षपद मिळवले आहे. हे भारतीय नेतृत्वाचे मोठे यश असल्याचे भारताने यामुळे सिद्ध केल्याचे अकबरुद्दीन म्हणाले.
पंतप्रधान मोदींशिवाय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिव हर्ष श्रिंगला हेही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय विषयांवर बैठकांचे अध्यक्षपद भूषवतील.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारत अस्थायी सदस्य आहे. भारताचा दोन वर्षांचा कार्यकाळ हा १ जानेवारी २०२१ पासून सुरू झाला आहे. अशातच आता एक महिन्याकरिता भारताकडे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपदही आले आहे. भारत सुरक्षा परिषदेच्या आपल्या दोन वर्षांच्या अस्थायी सदस्याच्या कार्यकाळात पुढच्या वर्षाच्या अखेरीस डिसेंबरमध्ये पुन्ह सुरक्षा परिषदेचे अध्यपद भूषवेल.