हरवळेतील धबधब्यात पंजाबचा युवक बुडाला

0
48

हरवळे येथील धबधब्यात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या तीन युवकांपैकी दोघे पाण्यात बुडत असताना त्यांना वाचवण्यासाठी त्यांचा मित्र नवज्योत सिंग याने उडी मारली. परंतु तोच पाण्यात बुडाला असून अन्य दोघे पाण्याबाहेर आले. डिचोली अग्निशमन दलातर्फे काल उशिरापर्यंत त्या युवकाचा शोध सुरू होता मात्र काही पत्ता लागला नाही. त्यामुळे आज सोमवारी पुन्हा शोधकार्य सुरू करणार असल्याचे दलातर्फे सांगण्यात आले.

नवज्योत सिंग हा मूळ अमृतसर पंजाबचा असून पिसुर्ले येथील कंपनीत कामाला होता. तिन्ही मित्र एकाच ठिकाणी काम करत असून तिघेही काल रविवारी सायंकाळी धबधब्याच्या ठिकाणी आले. धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह प्रचंड मोठा होता. तरीही दोन मित्रांनी पाण्यात उडी घेतली. मात्र दोघेही बुडू लागले. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी नवज्योत याने पाण्यात उडी घेतली मात्र तो वर आलाच नाही. त्याचे दोन्ही मित्र मात्र पाण्याबाहेर सुखरूप आले. या घटनेची खबर मिळताच डिचोली पोलीस दाखल झाले व त्यांनी अग्निशमन दलास पाचारण केलेे. यानंतर शोधकार्य सुरू केले मात्र नवज्योत याचा काहीही पत्ता लागला नाही.