संजीवनी साखर कारखाना पुढील वर्षापर्यंत सुरू करणार : सावईकर

0
87

राज्यातील बंद पडलेला संजीवनी साखर कारखाना पुढील वर्षापर्यंत सुरू करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. हा कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी काय करता येईल याचा अभ्यास आपल्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली ऊस उत्पादक समिती करीत आहे. सरकारला लवकरात लवकर त्यासंबंधीचा अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे या समितीचे अध्यक्ष नरेंद्र सावईकर यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना सांगितले.

येत्या दोन महिन्यांच्या आत आम्ही सरकारला त्यासंबंधीचा अंतरिम अहवाल सादर करणार आहोत, असे सावईकर यांनी स्पष्ट केले. राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी आपल्या अध्यक्षतेखालील या समितीवर असून विविध अडचणींमुळे बंद पडलेला राज्यातील हा एकमेव साखर कारखाना नव्याने सुरू करण्यासाठी काय करता येईल याचा अभ्यास समिती करत आहे असे सावईकर म्हणाले.
संजीवनी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंबंधीचा अहवाल अत्यंत खोलात जाऊन तयार केला जाणार आहे. मुळातच हा कारखाना बंद का पडला. कोणकोणती कारणे त्याला जबाबदार होती. याचा शोध घेण्याबरोबरच पुढे काय करता येईल व कारखान्याची गाडी रुळावर आणण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टींची गरज आहे याचे तपशील अहवालात देण्यात येणार असल्याचे सावईकर यांनी स्पष्ट केले.

२०१९ सालापासून घरघर लागलेला संजीवनी सहकारी साखर कारखाना चालू वर्षी बंद पडल्यानंतर गोवा विधानसभेतही त्यावर चर्चा झाली होती. तसेच नंतर मुख्यमंत्र्यांनी हा साखर कारखाना सतत नुकसानात असल्याने तो बंद करण्या येणार असल्याची घोषणा केल्यानंतर मगो नेते सुदिन ढवळीकर यांच्यासह सर्वच विरोधी पक्षांनी सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे सरकारला कारखाना बंद करण्याचा आपला निर्णय मागे घ्यावा लागला होता. तसेच बंद पडलेला साखर कारखाना नव्याने सुरू करण्याची घोषणा करीत सरकारने त्यासाठी नरेंद्र सावईकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांची एक समिती स्थापन केली हाती. या साखर कारखान्याची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी काय करायची गरज आहे याचा अहवाल सादर करण्याची जबाबदारी सरकारने सदर समितीकडे सोपवली आहे.