संगीत

0
34
  • प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर

संगीतामध्ये दिवसेंदिवस आज बदल होतच आहेत. नवनवीन वाद्ये जन्माला येतच आहेत. संगीताचे क्षेत्र माणसाचे जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी वावरत आहे. ही फार मोठी समाधानाची गोष्ट आहे.

गीताला संगीताची गरज असते. संगीताशिवाय गीताचे सार्थक होत नाही. संगीताच्या फ्रेममध्ये गीताला बसवल्यावर त्या गीताला विशेष दर्जा प्राप्त होतो.
निसर्गामध्ये संगीत प्रत्येक घडामोडीमध्ये अंतर्भूत असते. आपण बारकाईने लक्ष दिल्यास आपल्या ते लक्षात येते. वारा संगीताच्या लहरी प्रकट करतच वाहत असतो. झाडांच्या पानांची फडफड, वेळूच्या बनातील गुंजन, उसाच्या पिकातून वाहताना पानांची सळसळ या सगळ्यांमध्ये संगीत भरलेले असते. वाहत्या पाण्याचे संगीत हा एक वेगळाच अनुभव असतो. झर्‍याचे पाणी वाहताना दगड-गोट्यांशी जेव्हा अडखळते; त्याच्यातील मधुर नाद हा आकर्षकच असतो. खळाळत वाहणार्‍या झर्‍याच्या पाण्याला वेगळाच आवाज असतो जो संगीताच्या लहरींना गडद करतच पुढे सरकतो. उंचावरून उडी घेणार्‍या धबधब्याचा थाट काय वर्णावा! कितीतरी लांब अंतरावरील त्याचे मनोरंजक संगीत मनाला रिझवते.
सागराच्या लाटांचा गाज व नाद याला संगीताची किनार असतेच. तुफानाच्या वेळी होणारे लाटांचे तांडव हे रौद्र व बीभत्स रसांचे थैमान गाजवणारे असते. वादळे कधी लहान तर कधी मोठी होतच राहतात. त्यांच्या भयानक संगीताने सगळा परिसर भयभीत झालेला असतो.

पावसाच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वेगवेगळे संगीत असते. धो-धो वाहणारा मुसळधार पाऊस, फराफरा पडणारा धावता पाऊस, रिपरिप पडणारा सरकता पाऊस, थेंब-थेंब ओघळणारा मंदगतीचा पाऊस अशी पावसाची विविध रूपं आपल्याबरोबर संगीताचे विविध नमुने घेऊन येत असतात.
संगीताशिवाय गीताला जिवंतपणा येत नाही. एखाद्या गीताला योग्य संगीत मिळाल्यावर त्याच्यामधील भावभावना समर्थपणे व्यक्त होतात. शृंगार, वीर, शांत, करुण, रौद्र, भयानक, बीभत्स हे रस संगीताच्या माध्यमातून उफाळून येतात. श्रोत्यांच्या मनात त्या-त्या प्रसंगातील भाव-विभाव प्रकट करण्याचे काम संगीत करत असते.

आपल्या सभोवताली संगीताचे नर्तन दिवस-रात्र चालू असते. पक्ष्यांच्या किलबिलाटामध्ये संगीत असते. बेडकांच्या ओरडण्यात संगीत असते. गुरांच्या धावण्याच्या गतीत संगीत असते.
संगीताला मर्यादा नाही. वेगवेगळ्या वाद्यांमध्ये संगीताच्या वेगवेगळ्या लहरी उमटत असतात. घड्याळाची टिकटिक होण्यामध्येदेखील संगीत असते. आपल्या शरीराच्या नाडीच्या ठोक्यातदेखील संगीत असते. ध्वनिलहरींच्या नियमितपणामुळे संगीताची बंदिस्त आवृत्ती तयार होते. घड्याळ जर मिळेल तसे वाजले तर गोंगाट निर्माण होतो. घड्याळाचे वाजणे नियमित अंतरामुळे ते संगीत आपल्या लक्षातच येत नाही. आपल्याला त्याचा अडथळा होत नाही.
संतूरवादनाचे सूर आपल्या परिचयाचे असतील. हार्मोनिअमचे सूर, सतारीच्या तारा छेडल्यावर येणारे सूर, तंबोर्‍याच्या विशिष्ट लहरी, बासरीचे कर्णमधुर सूर, सनईचा नाद-झंकार या सगळ्या विविध सुरांचे इंद्रधनुष्य आपल्याला वेड लावते.

तबला, घुमट, ताशा, शामेळ, पखवाज, मृदंग, ढोल यांचे विविध आवाज जेव्हा लय व नादाच्या तालात वावरायला लागतात तेव्हा त्यांचे अफलातून संगीत निर्माण होते.
टाळ, मृदंग, चिपळ्या व झांज यांचा झणझणाट जेव्हा ताल पकडतो तेव्हा तो अद्वितीय संगीताचा आविष्कार असतो.
संगीताचा महिमा कसा बरे वर्णावा? संगीत जीवनामध्ये जगण्याची उम्मीद देण्याचे काम करते. निराश मनाला आशेचे सूर देण्याचे काम संगीत करते. हरवलेल्या आणि फसवलेल्या मनाला योग्य वळण देण्याचे काम संगीत करते. अडखळलेल्या आणि वैफल्याने भरकटलेल्या मनासाठी प्रबोधन करून चांगली वाट दाखवण्याचे काम संगीत करते. संगीताला वेगवेगळी दालने व वेगवेगळे आयाम असतात. पाश्‍चात्त्य संगीत आणि पौर्वात्य संगीत यांची क्षेत्रे वेगवेगळी आहेत. त्यांचे स्वतःचे स्वतंत्र असे विश्‍व असते. त्यांचे उद्दिष्ट जरी एकच असले तरी प्रवाह वेगवेगळे असतात. वाद्ये वेगळी, आवाज वेगळे, ध्वनींचा संघर्ष वेगळा व त्या तालाला साजेशा गीतांचे प्रकारदेखील वेगळे. या वेगळेपणातच त्यांचे ध्वनिसौंदर्य दडलेले असते.

श्रीशंकराच्या नृत्यामध्ये डमरूचे संगीत ऐकणार्‍याच्या हृदयाचा थरकाप उडवते.
लावणीमध्ये नाचणार्‍या नर्तकीच्या पैंजणाचे व घुंगराचे संगीत श्रोत्यांना माना डोलवायला लावते. आपल्या राष्ट्रगीताला दिलेल्या नादमधुर संगीताने ऐकणार्‍याची छाती राष्ट्राच्या अभिमानाने भरून येते. संगीताच्या औचित्यपूर्ण नियोजनाचे हे अपेक्षित परिणाम आहेत हे विसरून चालणार नाही.
संगीत कोणत्याही कलेला प्रतिष्ठा मिळवून देते. संगीत नाटकाचा प्रभाव हा गद्य नाटकापेक्षा परिणामकारक असतो. संगीतामुळे नाटकात विविधता येते, गोडवा येतो व नादमय मनोरंजन होते. करमणुकीला बहर येतो. संगीताची ही जादू मनाला भुरळ घालते.

सिनेमामध्ये अथवा फिल्ममध्ये संगीतच यशाची श्रेणी ठरवते. दृक-श्राव्य माध्यम असल्यामुळे क्षणाक्षणाला संगीताची गरज असते. पार्श्‍वभूमी संगीतामुळेच परिणामकारक बनते. कित्येक नावाजलेल्या फिल्ममध्ये संगीताचा प्रभाव विशेष असलेला दिसून येतो. संगीत-दिग्दर्शकाचे क्षेत्र उल्लेखनीय असते.
संगीतामध्ये दिवसेंदिवस आज बदल होतच आहेत. नवनवीन वाद्ये जन्माला येतच आहेत. संगीताचे क्षेत्र माणसाचे जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी वावरत आहे. ही फार मोठी समाधानाची गोष्ट आहे.

विशिष्ट संगीताने विशिष्ट रोगांच्या रुग्णांना आराम मिळतो आणि आजारातून बरे होण्यासाठी सहयोग मिळतो असे काही संगीत-संशोधक सांगत आले आहेत. कुत्र्या-मांजरासारख्या मुक्या प्राण्यांनादेखील संगीत ऐकण्याची आवड आहे हे अगोदरच सिद्ध झाले आहे.