- चंद्रिका चौहान
कोरोनाच्या संकटकाळात शेतमालाचे नुकसान, हाताला काम नसणे आणि शहरातून गावी परतलेल्यांच्या रोजगाराचा प्रश्न याचा ग्रामीण अर्थकारणावर मोठा परिणाम झाला. सारेच घरात बसून असणे, वाढता मानसिक ताण यामुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली. असे असले तरी या काळात बचत गटांमधील महिलांची मानसिकता टिकून राहिली.
आपल्याकडे साधारणपणे मार्चपासून कोरोनाच्या प्रसाराला सुरूवात झाली. या विकाराचं गांभीर्य लक्षात घेता मार्चच्या अखेरीस पहिल्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. त्यावेळी हे संकट काही दिवसात दूर होईल आणि सारं काही पूर्वीसारखं ठीक होईल, असंच सामान्य लोकांना वाटत होतं. त्यामुळे याकडे काही दिवसांचं संकट अशाच पध्दतीने पाहिलं गेलं. मलाही सुरूवातीस या संकटाचं एवढं गांभीर्य वाटलं नव्हतं. परंतु पुढे जसजसा कोरोनाचा प्रसार वाढू लागला, त्या संदर्भातल्या बातम्या सामान्य लोकांपर्यंत येऊ लागल्या तेव्हा सारे हादरले. कोरोनाबाबत सार्यांच्याच मनात काळजी निर्माण झाली. काही भागात कोरोनाचे रूग्ण लवकर सापडले तर काही भागात असे रूग्ण उशीरा समोर आले. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी पुन्हा पुन्हा लॉकडाउन जाहीर करण्यात आला. या काळात जवळपास सारेच व्यवहार ठप्प झाले. उद्योग-व्यवसायांबरोबरच हातावर पोट असणार्यांना याचा मोठा ङ्गटका बसला. ग्रामीण भागात तर आणखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. परंतु त्याचा पुरेसा ऊहापोह केला गेला नाही. वास्तविक, शेतीच्या अर्थकारणावर देशाचं अर्थकारण बर्याच प्रमाणात अवलंबून असल्यानं तिथली परिस्थिती गांभीर्यानं लक्षात घेणं आणि त्या संदर्भातल्या उपाययोजनांवर भर देणं गरजेचं ठरणार आहे.
मुख्यत्वे लॉकडाउनमुळे उद्योग-व्यवसायांची चक्रं थांबली असताना, शहरं शांत झाली असतानाही सार्यांचा पोशिंदा असणारा ग्रामीण भागातला शेतकरी मुकाटपणे आपलं काम करत होता. कुटुंबियांना बरोबर घेऊन वा शहरातून गावी परतलेल्यांच्या सहकार्यानं शेतीची कामं सुरू होती. विशेष म्हणजे हे शेतकरी खूप तणावात नव्हते. शेतातल्या कामासाठी बाहेरचं कोणी मिळत नसलं तरी कुटुंबातले सदस्य वा शहरातून गावी परतलेल्या सहकार्यांबरोबर शेतीची कामं वेळेवर पार पडत आहेत, याचं समाधान होतं. आता लॉकडाउनमुळे का होईना, आपण घरी परतलोय आणि शेतीच्या कामात आपली मदत होतेय, याचं गावी परतलेल्यांना समाधान वाटत होतं. अशा रितीने करण्यात आलेल्या सामूहिक कामातून शेतमालाची काढणी वेळेवर आणि योग्य पध्दतीनं करणं शक्य झालं. परंतु सर्व शेतमाल काढून ठेवल्यावर कुठे न्यायचा आणि कुठे विकायचा असा प्रश्न निर्माण झाला. याचं कारण लॉकडाउनमुळे सर्व काही बंद होतं. वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. नंतर भाजीपाला विक्रीसाठी परवानगी देण्यात आली असली तरी त्यातही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यातच भाजीपाला विक्री करताना अनेक ग्राहकांशी संपर्क आल्यानं आपल्याला कोरोनाची लागण होईल का, ही शंकाही अनेकांना भेडसावत होती. या सार्यात मिळेल त्या भावाला शेतमाल विकून घरी परतण्याकडे शेतकर्यांचा ओढा राहिला.
गेल्या वर्षी पावसाचं प्रमाण असमान राहिलं. त्यामुळे कमी पाऊस झालेल्या भागात शेतकर्यांना पिकांचं अपेक्षित उत्पादन घेणं शक्य झालं नाही. सुदैवानं या वर्षी सुरूवातीला चांगला पाऊस झाला. त्यामुळे पीक चांगलं आलं. परंतु वाहतूक आणि विक्रीची योग्य व्यवस्था नसल्यानं बराचसा शेतमाल सडून वाया गेला. त्याच वेळी इतर भागात शेतमाल मिळत नसल्याचीही ओरड होत असल्याचं दिसलं. अशा रितीने परस्परविरोधी चित्र निर्माण झालं. यात संपूर्ण घर शेतात राबूनही शेतकर्यांच्या हातात काही आलं नाही. एका दुभत्या गाईला वा म्हशीला रोज १५० ते २०० रूपयांची वैरण लागते. या मुक्या जिवांना उपाशी कसं मारायचं या विचाराने शेतकर्यांनी जवळपासचं सारं पणाला लावून चारा उपलब्ध केला. दुभती जनावरं पोसली. परंतु इतका खर्च करून मिळालेलं दूध वेळेत विकता आलं नाही आणि अनेक शेतकर्यांना नुकसान सहन करावं लागलं. अशा परिस्थितीत प्रक्रिया उद्योगांचं महत्त्व प्रकर्षाने समोर आलं.
सततच्या लॉकडाउनमुळे काही साध्य होत नाही तसंच यामुळे काही नवे प्रश्न निर्माण होतात, हे लक्षात आल्यानंतर परिस्थिती हळुहळू पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्याचबरोबर कोरोनाचं संकट आणखी काही महिने कायम राहणार हे गृहीत धरून जगायला शिकलं पाहिजे, हेही अनेकांना पटलं. परंतु या स्थितीतून मार्ग कसा काढायचा, जीवनशैलीत नेमके कोणते बदल करायचे, या संकटकाळात संधी कशी शोधायची, सामान्य जनतेसाठी आपण काय करू शकतो, या प्रश्नांची पुरेशी समाधानकारक उत्तरं समोर आली नाहीत.ग्रामीण भागात तर याबाबत बरीच संभ्रमावस्था राहिली. अशा परिस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घालून दिलेला आदर्श लक्षात घेण्याजोगा ठरला. ‘आपल्याला या महामारीचा सामना करायचाय’ असं सांगत गडकरींनी या काळात वाहतूक बंद असल्याची संधी मानून रस्त्यांची कामं वेगाने करण्याचे आदेश दिले. ‘स्मार्ट सिटीची कामं करा’ असंही सांगितलं. यातून काही प्रमाणात रोजगार कायम राहिले तसंच ही कामं विनाअडथळा वेगानं पूर्ण करणं शक्य झालं. अशा स्वरूपाचे अन्य मार्ग इतरांना का सुचले नाहीत, हाही विचारात घेण्याजोगा भाग आहे.
ग्रामीण भागात महत्त्वाचे सणवार, लग्न समारंभ, इतर उत्सव या गोष्टी खर्या अर्थाने पोशिंद्या असतात. परंतु लॉकडाउनमुळे या सण-समारंभांवर बंधनं आली. साहजिक या निमित्ताने होणार्या आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम झाला. खेड्यापाड्यात ङ्गुलांचं उत्पादन घेणारे, ङ्गुलांचे हार, गजरे तसंच ङ्गुलांची सजावट करणारे यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. अन्य रोजगारही उपलब्ध नसल्यानं अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला. कोरोनाच्या संकटकाळात ग्रामीण भागात घरगुती भांडणांचं प्रमाण बरंच वाढल्याचं दिसून आलं. हाताला काम नाही, सारेच घरात बसून आणि उदरनिर्वाहाची समस्या भेडसावत असल्याचा परिणाम मानसिक ताण वाढण्यात झाला. यात घरातल्या स्त्रियांची अवस्था आणखी बिकट झाली. कौटुुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली. अनेकींना नवर्याच्या अतिरेकी शरीरसुखाच्या मागणीचा सामना करावा लागला. स्त्रियांच्या चारित्र्यावर संशय घेण्याचं प्रमाणही या काळात वाढल्याचं आढळलं. आता मी सतत घरात असल्यानं तुला अडसर होतोय का, अशी विचारणा झाल्याची उदाहरणं कानावर आली.
ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात खासगी सावकारी सुरू आहे. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या काळात अनेकांनी नाईलाजाने खासगी सावकाराकडून कर्ज घेतलं. त्यात खासगी सावकाराच्या अवाजवी मागण्या पूर्ण करण्याची वेळही आली. बाळंतपणासाठी मुली माहेरी आल्या असताना, मुलीचं लग्न ठरलं असताना अनेकांसमोर मोठा गंभीर प्रश्न उभा राहिला. एकंदर यापूर्वी होणार्या भांडणांपेक्षा कोरोनाच्या संकटकाळातली भांडणं वेगळी ठरली. या काळात ग्रामीण भागातल्या स्त्रियांवर कौटुंबिक कामाचा बोजा वाढला. दुसरीकडे या काळात तरूण-तरूणींचं घराबाहेर पडणं, एकमेकांना भेटणं, बाहेर खाणं-पिणं हे सारं बंद झालं. त्याचा ताण तरूणवर्गावर आला. त्याचाही परिणाम संपूर्ण कुटुंबावरील ताण वाढण्यात, अकारण संघर्षात झाला. आता अशा स्त्रियांच्या समुपदेशनाचं, त्यांच्यात पुन्हा आत्मविश्वास निर्माण करण्याचं कार्य सुरू आहे.
असं असलं, तरी कोरोनाच्या संकटकाळात काही चांगल्या, सकारात्मक बाजुही समोर आल्या. त्यांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. या काळात स्थलांरित मजूर, मोलमजुरी करणारे, हातावर पोट असणारे यांच्यासाठी अनेक सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती पुढे सरसावल्या. त्यांनी अशा व्यक्तिंच्या जेवणाची व्यवस्था मिळाली. त्यातून काही प्रमाणात झालेली रोजगारनिर्मितीही महत्त्वाची ठरली.
इथे एका बाबीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. तो म्हणजे कोरोनाच्या संकटाच्या काळात ग्रामीण तसंच शहरी बचत गटांमधल्या महिलांची मानसिकता टिकून राहिली. याचं कारण या महिलांमध्ये वेळोवेळी संवाद होत राहिला. त्याद्वारे एकमेकींचं दु:ख, वेदना जाणून घेता आल्या. त्यातून सार्यांच्या सहकार्यानं मार्ग काढता आला. एकमेकींची अडचण भागवणं शक्य झालं. लॉकडाउनच्या काळात गावी परतलेल्यांपैकी बरेचसे तरूण आता शहरात परत जाण्यास तयार नाहीत. याचं कारण या काळात झालेले हाल पाहून शहरात आपलं कोणी नसतं, असा त्यांचा समज झाला आहे. अशा स्थितीत या तरूणांमध्ये असलेल्या कौशल्याचा विचार करून ग्रामीण भागात रोजगाराच्या काही संधी उपलब्ध होणं गरजेचं आहे. हे तरूण मेहनती आहेत, हुशार आहेत, सतत शिकत राहण्याची त्यांची तयारी आहे. हे लक्षात घेऊन कंपन्यांनी ग्रामीण भागात आपली छोटी युनिट्स उभी करण्याचा वा तत्सम काही रोजगार उपलब्ध करून देण्याचा अवश्य विचार करायला हवा. त्याद्वारे ग्रामीण भागातच रोजगार उपलब्ध होईल आणि ग्रामीण भागातून शहरांकडे होणार्या स्थलांतरालाही काही प्रमाणात आळा घालणं शक्य होईल. आजघडीला प्रक्रिया उद्योगाचा विचारही महत्त्वाचा ठरणार आहे. ‘खेड्याकडे चला’ हा महात्मा गांधींचा संदेश आचरणात आणणं ही आता काळाची गरज आहे. आपल्याला ‘लोकल’ आणि ‘व्होकल’ यावरच यावं लागेल.
तुमच्याकडे असणार्या वस्तुंवर प्रक्रिया करा आणि नंतर त्या विका, ही संकल्पना आता महत्त्वाची ठरेल. ही पावलं आधी उचलली असती तर कोरोना संकटकाळातल्या शेतमालाचं नुकसान टाळता आलं असतं. उदाहरण द्यायचं तर या काळात विक्री करता येत नाही तसंच दर नाही म्हणून टोमॅटो मोठ्या प्रमाणावर ङ्गेकून देण्यात आले. अशा स्थितीत टोमॅटोपासून केचअप वा पावडर तयार करण्याची व्यवस्था उपलब्ध असती तर या संधीचा लाभ उठवता आला असता. हे लक्षात घेऊन येत्या काळात ग्रामीण भागातल्या महिलांना प्रक्रिया उद्योगांसाठी प्रशिक्षण, सहकार्य यावर भर देण्याचा आमचा विचार आहे. एका निष्कर्षानुसार चीनची ६५ लाख उत्पादनं भारतात येत होती. आता हे सारे उद्योग बंद झाले आहेत. ही आपल्याकडील छोट्या-मोठ्या उद्योजकांसाठी महत्त्वाची संधी आहे. एखाद्या उत्पादनाचे साखळी उद्योगही ग्रामीण भागात सुरू करता येण्यासारखे आहेत.
एकंदर कोरोनाच्या संकटाकडे आपण वेगळ्या नजरेने पहायला हवं. यात दडलेल्या संधींचा लाभ घ्यायला हवा. अर्थात, त्यासाठी करायच्या प्रयत्नात ग्रामीण भागावर अधिक लक्ष दिलं जाणं गरजेचं आहे. त्यातून आर्थिक सक्षमीकरणाबरोबर ग्रामीण विकासालाही हातभार लागणार आहे.