उपकर्णधारपदी रोहित शर्माची निवड

0
242

टीम इंडियाचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा याची शुक्रवारी संघाच्या कसोटी उपकर्णधारपदी निवड करण्यात आली. रोहितकडे प्रथमच कसोटी संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. मेलबर्न येथे झालेल्या बॉक्सिंग डे दुसर्‍या कसोटीत चेतेश्‍वर पुजारा संघाचा उपकप्तान होता. गुलाबी चेंडूने झालेल्या पहिल्या कसोटीत विराट कर्णधार तर रहाणे उपकर्णधार होता. केवळ रोहितच्या अनुपलब्धतेमुळेच दुसर्‍या कसोटीसाठी पुजाराकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. रोहित असता तर तोच उपकप्तान असता, असे संघ व्यवस्थापनाने बदलाबद्दल माहिती देताना सांगितले आहे.

रोहितने वनडे तसेच टी-ट्वेंटीमध्ये विराटच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्व कौशल्याबाबत कधीही संह नव्हता, असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. रोहितने सिडनी येथे आपला १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला असून बुधवारी तो मेलबर्न येथे संघात दाखल झाला. यानंतर त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. तिसर्‍या कसोटीत रोहितसह कोणता खेळाडू सलामीला उतरेल याचा निर्णय अजून झालेला नाही. मयंकला संघात ठेवण्याचा निर्णय झाल्यास विहारीच्या जागी तो मधल्या फळीत खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गिल व रोहित डावाची सुुरुवात करू शकतील. मयंक व विहारी या दोघांना वगळून रोहित व लोकेश राहुलला खेळविण्याचा पर्यायही आहे. रोहितच्या नावावर ३२ कसोटी सामने आहेत. ४६ पेक्षा अधिकच्या सरासरीने २१४१ धावा त्याने केल्या आहेत. यात सहा शतकांचा समावेश आहे. २०१९ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वैयक्तिक सर्वोत्तम २१२ धावांची खेळी त्याने साकारली होती. भारतीय संघ ५ जानेवारी रोजी तिसर्‍या कसोटीसाठी सिडनीला रवाना होईल. तिसर्‍या सामन्याला ७ पासून प्रारंभ होणार आहे.