काय कमावले काय गमावले?

0
358
  • माधुरी रं. शे. उसगावकर

जीवन हे सुंदर आहे. जीवनातील प्रत्येक क्षण सकारात्मकतेने घ्यावा. भूत आणि भविष्याचा विचार करण्यापेक्षा वर्तमानात काय घडतं याचा विचार करावा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर वर्तमानातील दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय.

निरंतर माळेत एक मोती गळतो आहे.
तारखांच्या जिन्यातून डिसेंबर पळतो आहे

माझ्या सखीने पाठवलेला हा मेसेज वाचला आणि लक्षात आलं… अरे हो, खरंच की! किती झपाट्याने २०२० साल- मावळता सूर्य- ‘एक्झिट’ झाला! २०२१ साल सोनसळी तांबूस किरणे फेकीत उगवत्या सूर्याने एन्ट्रीही घेतली. लाजवंती उषेचा लालिमा आकाशात पसरला. नववर्षातील उगवत्या सूर्याचे प्रेमभरे, हृदयभरे स्वागत झाले.
वेळ कुणासाठीच थांबत नाही. सदोदित तिची घोडदौड चालूच असते. हेच पहा ना! हे वर्ष नुकतं कुठं सुरू झालं असं भासवीत निरोपाचा महिनाही संपुष्टात आला.
२०२० वर्षाच्या प्रारंभीच कोरोना प्रादुर्भावाची नांदी सुरू झाली. पूर्ण विश्‍वात प्रचंड धुमाकूळ घालत मानवजातीवर एवढ्याशा विषाणूने वर्चस्व गाजवलं. वर्षाच्या अंतिम टप्प्यातही त्याचा उद्रेक कमी झाला नाही. कधी सौम्य तर कधी रौद्र रूप तो दाखवतोच आहे.

या नववर्षांत कोरोनाचं सावट कमी होईल हे ठामपणे सांगता येत नाही. डिसेंबर महिना सरला तरी आपण कोरोनामुक्त नाही. उलटपक्षी घाबरू नका, पण कोरोना- पार्ट टू आपलं दुसरं स्वरूप घेऊन येत आहे.. अशी तंबी देत आहे.
गेल्या वर्षभरात कोरोनासदृश परिस्थितीत महामारीशी कसा सामना द्यायचा याची पूर्ण माहिती देण्याची आवश्यकता नाही. शासनाद्वारे, माध्यमांद्वारे प्रतिबंधात्मक प्रचार-प्रसार झालाच आहे, होतही आहे. प्रत्येकाला याचा कमी-अधिक प्रमाणात अनुभव आलाच आहे. या संकटात सावध राहून जीवनाची वाटचाल हिमतीने करणे म्हणजेच अर्धी लढाई जिंकणे.

२०२० हे अविस्मरणीय पर्व ठरले हे निर्विवाद. या वर्षांत काय कमावले व काय गमावले याचा बारकाईने विचार केला तर भयावह अंधार्‍या परिस्थितीतही मानवाने माणुसकीचे नाते जपले. ‘संपूर्ण २०२० सालाने केले जरी कासावीस तरी मानवाने नाही सोडली माणुसकीची कात’. ही फार मोठी सरत्या वर्षातील कमाई आहे.
जीवन हे सुंदर आहे. जीवनातील प्रत्येक क्षण सकारात्मकतेने घ्यावा. भूत आणि भविष्याचा विचार करण्यापेक्षा वर्तमानात काय घडतं याचा विचार करावा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर वर्तमानातील दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय.

उद्भवलेल्या विपरीत परिस्थितीला सामोरे जात जगण्याला पर्याय नाही, असे मानण्यात आपले दुःख, भीती कमी व्हायला लागते. जगण्याला गती मिळते. आजच्या युगात सशक्त मनाची अतीव गरज आहे. कारण हे युगच चित्तयुग आहे. ज्याचे चित्त सशक्त तो तरला.
२०२० सालच्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मानसिक स्वास्थ्य हरवते आहे. निराशा, भय, ईर्षा हे रिपू डोकं वर काढताहेत. अशा परिस्थितीत आपण काय करावे, कसे वागावे हे ज्याला कळले त्याला जीवनाचे मर्म समजले.
उदा. फेस मास्क, सामाजिक अंतर, सॅनिटायझर वापरल्याने आणि जंक फूड टाळल्याने शरीरावर अनिष्ट परिणाम होत नसतील पण याचबरोबर योगसाधनाही महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे आपले मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यास मदत होते. आपलं आरोग्य आपल्या हातात असतं. ‘पण ऐकतं कोण?’ अशी स्थिती वर्षाच्या संधिकाली पाहायला मिळाली. ‘अब तो चलता हैं…’, २०२०चा शेवटचा दिवस काय परत येणार आहे?’… असा विचार करून… सरत्या वर्षाच्या सांजराती मौजमस्ती, नशापान, कानठळ्या बसवणारी नाचगाणी करीत जल्लोष, हंगामा केलाच सर्व नियमावली धाब्यावर बसवून. अशानं काय साध्य होतं… याचा आपण विचार करतो का? शेवटी व्हायचं ते होतं. काही या संधिसाधू कोरोनाच्या विळख्यात सापडतील, काही लढाई जिंकल्याचा भाव मुद्रेवर आणून आत्मशेखीही मिरवतील. ही वैश्‍विक समस्याच अशी आहे की जपून सतर्कतेने पाऊल टाकणे यातच भूषण आहे. दुर्लक्ष करण्याची ही बाब नाही. अन्यथा ‘एकाने दुसर्‍यास गिळावे’ असेच होण्याची शक्यता आहे.

जो कोरोनासंसर्गाच्या लाटेच्या तडाख्यातून मुक्त झाला त्याचा विदारक अनुभव कल्पनेपलीकडचा आहे हे आपण वाचतो- ऐकतो. काहींचा सुसह्य अनुभवही ऐकण्यात येतो. मुख्यतः बेताल युवावर्गाने याचे भान ठेवावे. आपल्या बेजबाबदार वृत्तीमुळे आपली वयस्कर माणसं- आईवडील, सगेसोयरे यांच्या बळीस कारणीभूत ठरू नये.
तसे पाहता ‘कोरोना’ महामारीने आपल्यावर ‘करुणा’ केली आहे. परमेश्‍वराची करुणाच म्हणावी की २०२० सालात आपण आत्मनिर्भर झालो आहोत. रोजच्या दैनंदिनीव्यतिरिक्त वेळ मिळत नाही हे टुणटुणं लावत होतो. पण आता सगळं काम ऑनलाइन. त्यामुळे घरबसल्या ऑफिसची कामं होतात. मुलांचा अभ्यासवर्ग, स्पर्धा ऑनलाइन, त्यामुळे पालकांना त्यांच्या अभ्यासाचा पाठपुरावा करता येतो. किराणामाल घरपोच मिळतो. एकमेकांसाठी जाणे-येणे क्वचितच होते किंवा होतच नाही. नेटवरूनच ऋणानुबंधाचे संबंध पाळले जातात.
कोरोनाच्या टप्प्यात धार्मिक स्थळं पूर्णतः बंद ठेवलेली. त्यामुळे देव नाही मंदिरात… अशी स्थिती झाली. कुठे शोधिसी मानवा, राउळी, मंदिरी… देव हा आपुल्या अंतरी. परमेश्‍वर हा तुमच्या-आमच्या हृदयातच वसलेला आहे. ‘घर एक मंदिर’ .. याची प्रचिती आली. २०२० सालात हरवत चाललेली माणुसकी, भूतदया पाहिली. ‘एकमेका साह्य करू माणुसकीचा वारसा चालवू’ या घोषवाक्याने या वर्षात पाऊल पुढे टाकू.
स्वच्छता आणि दक्षता याचीही फलश्रुती अजमावली. पारिवारिक जुन्या सुसंस्कारित पद्धतींची आठवण करून दिली. पारमार्थिक साधना, सत्कार्य, सुसंवाद हे सरणार्‍या वर्षातही पाहायला मिळालं. अन्यथा ‘जनरेशन गॅप’चा ढिंढोरा पिटला जायचा.
कोरोनाच्या काळात आपल्याला चांगले समजले आहे की बाहेरच्या जंकफूड किंवा हॉटेलमधील खानपानाशिवाय आपण छान जगू शकतो. घरात बनवलेले सकस पदार्थ चवीने खाऊ शकतो. ज्यामुळे आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

लॉकडाउननंतरच्या काळात हळूहळू बाहेरच्या खाण्यापिण्यास पुनश्‍च हरिॐ दिसून येत आहे. खवय्यांची फाजील धिटाई दिसून येते. हे आपल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने कितपत हितावह आहे याचा विचार करायला नको का? घरच्या अन्नाला भले हॉटेलसारखा स्वाद नसेल पण पौष्टिक असतंच ना? आपलं आरोग्य चांगलं असेल तर आयुष्य जगण्यात ऊर्मी येईल. जरा आठवून बघा… मागच्या वर्षांत तुम्ही किती वेळा आजारी पडलात? डॉक्टरकडे खेपा नाही ना घालाव्या लागल्या? सकस आहार आणि नियमित योगसाधना हे सुदृढ आरोग्याचे यशस्वी मंत्र आहेत ज्यामुळे तणाव व अनावश्यक चिंता दूर राहतात. आत्मशांती मिळते.
या वर्षांत आपण आपल्या सर्वांगीण उन्नतीसाठी शारीरिक, मानसिक स्वास्थ्य निरोगी राखणं आवश्यक आहे. गेलेल्या दुःखद, तणावपूर्ण क्षणांवर पडदा टाकून पुढील वाटचाल सतर्कतेने, उमेदीने जगत असेच ऋणानुबंध जपू या. संतुलित, खूश राहून स्वर्णिम भविष्य अनुभवू. हीच आपल्या जीवनाची मॅनेजमेंट आपल्यालाच करणे भाग आहे.
२०२० साल कोरोनाने केलं कासावीस पण हे २०२१ साल सर्वांचं मनोरथ पूर्ण करो, ही सदिच्छा.
काही चांगले झाले, काही वाईट झाले
सरत्या २०२०ने आपले काम केले
२०२१च्या उगवत्या सूर्याला नमस्कार
होवो प्रत्येकाला आत्मभावसाक्षात्कार!