गोव्यातील नव्या कोरोना रुग्णांची आकडेवारी अत्यंत नगण्य असल्याचे आरोग्य खात्याची आकडेवारी दर्शवू लागली आहे. रविवारी फक्त ७८ नवे कोरोनाबाधित राज्यात आढळून आल्याचे आरोग्य खात्याचे पत्रक सांगते. ही आकडेवारी अविश्वसनीय वाटते, परंतु सरकारकडून ती अधिकृतरीत्या जारी केली गेली असल्याने विश्वास ठेवणे भाग आहे. ती खरी असेल तर त्यासारखी आनंदाची बाब दुसरी नाहीच, परंतु ती कितपत खरी असेल याबाबत शंका यावी अशीच परिस्थिती राज्यात सर्वत्र दिसते आहे. ज्या प्रकारे राज्यात सध्या पर्यटकांचा सुळसुळाट वाढला आहे आणि जी काही कोरोनाप्रतीची प्रचंड बेदरकारी दिसते आहे, ती पाहता हे सुखाचे दिवस आणखी किती काळ टिकतील याचीही शंका वाटते.
गोव्यामध्ये सध्या पर्यटन हंगाम सुरू झाला आहे. गेल्या आठ महिन्यांच्या शुकशुकाटानंतर पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस येणार असतील तर राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता ती चांगलीच बाब आहे, परंतु किमान या येणार्या पर्यटकांनी गोमंतकीय जनतेचा जीव पुन्हा धोक्यात घालू नये एवढे तरी या क्षेत्रातील सर्वांनी पाहणे आवश्यक आहे.
देशाच्या विविध भागांतून कोरोनाची दुसरी लाट उफाळताना दिसू लागली आहे. दिल्ली, मुंबई आणि गुजरातमध्ये कोरोनाने पुन्हा एकवार कहर मांडला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन बाजारपेठा सामाजिक दूरी आणि सॅनिटायझर्सचा वापर होत नसल्याने बंद करण्याचा आदेश दिला आणि व्यापारी संघटनेने रदबदली करताच अल्पावधीत मागेही घेतला. दिल्लीतील बाजारपेठा व्यापारी संघटनांतर्फे चालवल्या जातात. त्यामुळे किमान त्यांना कोरोनाविषयक खबरदारीच्या उपाययोजनांसाठी जबाबदार तरी धरता येते. गोव्यामध्ये पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे येऊ लागले आहेत, परंतु त्यांच्या बेफिकिरीसाठी जबाबदार धरणार कोणाला?
हॉटेल व्यावसायिक, टूर ऑपरेटर्स, रेन्ट अ बाईक, रेन्ट अ कार संस्था, पर्यटक टॅक्सीचालक आदींना कोरोनाविषयक जागृतीच्या त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणे आवश्यक आहे. त्यांच्याकडून पालन होणार नसेल तर परवाने रद्द करण्यापर्यंतची धडक कारवाई झाली तरच सध्या सर्वत्र दिसणारी बेफिकिरी नियंत्रणात येऊ शकते. राज्य सरकारने काल मास्क न वापरणार्यांचा दंड दुप्पट केला. हा दंड दसपट झाला तरीही हरकत नाही एवढी ही महत्त्वाची गोष्ट आहे हे सर्वांना कळायला हवे. शहरांतून आणि पर्यटनस्थळी विना मास्क हिंडणार्या पर्यटकांना दंड ठोठावण्याची मोहीमही जोरात चालली पाहिजे. आपल्याला हे करावेच लागेल, कारण अन्यथा येत्या डिसेंबर महिन्यामध्ये गोव्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट उफाळणे अपरिहार्य असेल.
गोव्यात सरकारी आकडेवारी कमी असली, तरी एकूण चाचण्या आणि त्यात पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण यांचा तुलनात्मक अभ्यास केला असता देशातील पहिल्या सहा हॉटस्पॉटस्मध्ये गोव्याचा समावेश होतो हे विसरून चालणार नाही. हिमाचल प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरियाणा आणि केरळच्या बरोबरीने गोवा हा कोविड चाचण्यांच्या तुलनेत आढळणारे पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक असलेले राज्य ठरले आहे असे कोरोनाच्या आकडेवारीचे विश्लेषण दर्शवते. ही चिंतेची बाब मानली जाते.
डिसेंबर महिन्यात दरवर्षी गोव्यामध्ये पर्यटकांची रीघ लागून राहते. यंदा देशाच्या इतर राज्यांमध्ये कोरोनाचा कहर वाढलेला असल्याने दिल्ली, मुंबई, गुजरातचे पर्यटक गोव्याकडे धाव घेऊ शकतात. त्यामुळे येणार्या या लोंढ्यांपासून आम गोमंतकीय जनतेचे जीवन धोक्यात पोहोचणार असेल तर सरकारने त्याबाबत वेळीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने काल काही राज्यांना नोटीस बजावली आहे. कोरोनाचे प्रमाण पुन्हा वाढत असताना तुम्ही स्वस्थ का बसलात? कोणत्या उपाययोजना केल्यात? कोणत्या करणार आहात? असे प्रश्न न्यायालयाने त्या राज्यांना विचारले. परिस्थिती बिघडत होती तेव्हा तुम्ही कुठे झोपला होता? असा खरमरीत सवालही सर्वोच्च न्यायालयाने त्या राज्यांना केला. परिणामी खडबडून जागे झालेल्या महाराष्ट्र सरकारने गोव्यासह तीन राज्यांतून येणार्या विमान प्रवाशांना कोविड चाचणी सक्तीची केली आहे. गोव्यावर ही वेळ येऊ द्यायची नसेल, तर आताच पुढील धोक्यांची जाणीव ठेवून कडक उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे.
कोरोनाच्या बाबतीत सर्वत्र जनता सुस्तावलेली दिसते. विनामास्क हिंडते आहे, सामाजिक दूरी कागदावर राहिली आहे, खासगी आस्थापनांतून, सरकारी कार्यालयांतूनही सॅनिटायझर दिसेनासे झाले आहेत, असले तरी वापरले जाताना दिसत नाहीत. कोरोनाचे गांभीर्यच दिवसेंदिवस जनतेच्या मनातून नाहीसे होणे हे घातक आहे. अशाने आपण आपल्याच पायांवर पुन्हा धोंडा मारून घेतल्यासारखे होईल हे जनतेलाही कळायला नको?