राज्यात मास्क न वापरणार्‍यांना यापुढे दुप्पट दंड

0
230

>> सार्वजनिक बेफिकिरीला आळा घालण्यासाठी सरकारचे पाऊल

राज्यात मास्कचा वापर न करणार्‍यांना आता १०० रुपयांऐवजी २०० रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना काल केली.

देशातील दिल्ली, राजस्थान, गुजरात व इतर भागांत नव्याने कोरोना विषाणू फैलाव सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यात कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी आतापासून कडक उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे. राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी मास्क, सामाजिक अंतर, सॅनिटायझर्स वापराची सक्ती करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
अनलॉकच्या काळात उद्योग, व्यवसाय सुरू केले जात असून पर्यटन व्यवसायाला मान्यता देण्यात आली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात देशी पर्यटक येत आहेत. राज्यातील समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे, बसस्थानक व इतर सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरले जात नाहीत असे आढळून आले आहे, सामाजिक अंतराचे पालन केले जातानाही दिसत नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी नियमांचे पालन आवश्यक आहे. मास्क न वापरणार्‍यांसाठी दंडाची रक्कम दुप्पट केली जाणार आहे. पोलीस, नगरपालिका, मामलेदार, ग्रामपंचायती यांना मास्क न वापरणार्‍यांवर दंडात्मक कारवाईचा अधिकार देण्यात आला असून राज्यात मास्क न वापरणार्‍याविरोधात कडक कारवाई करावी, अशी सूचना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केली आहे.

पोलिसांत नवी भरती
पोलीस खात्यात नवीन १२०० पदांची भरती लवकरच केली जाणार आहे, तसेच, होमगार्डची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
पोलीस खात्याच्या मुख्यालय इमारतीचे काम पुढील वर्षात हाती घेतले जाणार आहे. पोलीस मुख्यालयाच्या नूतन इमारतीचे काम बरीच वर्षे प्रलंबित आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

गोवा शिपयार्डने सीएसआर योजनेखाली गोवा पोलिसांना एक अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध केली आहे. या रुग्णवाहिकेचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यावेळी गोवा शिपयार्डचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक बी.बी.नागपाल, पोलीस महासंचालक मुकेशकुमार मीना यांची उपस्थिती होती.