श्वेत कुष्ठ किंवा कोड भाग – २

0
444
  • डॉ. स्वाती हे. अणवेकर,
    (म्हापसा)

ह्यात प्रथम अनुवांशिकता असते. तसेच कौटुंबिक इतिहासदेखील आढळतो. हा व्याधी एकाच कुटुंबातील रक्ताच्या नात्यामधील अनेक व्यक्तींमध्ये झालेला पाहायला मिळतो. तसेच बीज दोषांमुळे देखील हा पालकांकडून मुलांमध्ये होताना आढळतो.

व्हिटिलिगोसारखाच शरीरावर पांढरे डाग उत्पन्न करणारा अजून एक व्याधी आहे तो म्हणजे ल्युकोडर्मा. बरेच लोक व्हिटिलिगो आणि ल्युकोडर्मा हे एकच मानतात. हे दोन्ही व्याधी सारखेच दिसत असले तरी ह्यामध्ये काही सूक्ष्म फरक आहे. ल्युकोडर्मा हा व्याधी ज्या कारणामुळे व्हिटिलिगो उत्पन्न होतो त्या सर्व कारणांमुळे सुद्धा उत्पन्न होतो. तसेच जर शरीरावर भाजले, कापले तसेच कोणत्याही कारणांनी हानिकारक अशा रसायनांशी त्वचेचा संपर्क झाला तरी देखील हा उत्पन्न होतो.

ह्यामध्ये जे पांढरे चट्टे शरीरावर उत्पन्न होतात ते एकेमेकांच्या अगदी जवळजवळ असतात. हा साधारणपणे किशोरावस्थेपासून ते ३० वर्षांपेक्षा अधिक वय असणार्‍या व्यक्तींना होतो. पण फक्त ५% लोकांमध्ये हा वयाच्या चाळीशीनंतर उत्पन्न होताना आढळतो. तर हा आहे व्हिटिलिगो आणि ल्युकोडर्मामधील फरक.

आयुर्वेदामध्ये श्वित्र ह्या व्याधीमध्ये व्हिटिलिगो आणि ल्युकोडर्माप्रमाणे लक्षणे आढळून येतात. ह्या व्याधीला बोली भाषेत कोड किवा श्वेत कुष्ठ असे म्हणतात. ह्या व्याधीमध्ये त्वचेवर स्त्राव होणे, खाज येणे, पुळ्या येणे, वेदना होणे ह्या प्रकारची लक्षणे आढळत नाहीत. ह्यात रुग्णाला कोणताही शारीरिक त्रास होत नसतो. मात्र शरीरात विरूपता येते हे खरे. हा व्याधी संक्रामक नाही अर्थात हा एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीमध्ये हा पसरत नाही.

ह्यामध्ये कौटुंबिक इतिहास आढळतो. तसेच अनुवांशिकतादेखील आढळून येते. ह्यात जे दोष दुषित होतात ते त्वचेचा आश्रय करून राहतात. ह्यामध्ये रक्त, मांस, मेद ह्या धातूंची अल्प प्रमाणात दुष्टी असते. पण व्याधी मात्र फक्त त्वचेमध्येच व्यक्त होतो. अन्य धातूंची दुष्टी ह्यात आढळत नाही.

ह्याचे दोन प्रकार आढळून येतात. एका प्रकारात कोणतीही जखम झाली असता अथवा भाजले असता त्या भागी जखम भरल्यानंतर त्वचेचा वर्ण प्राकृत न होता तो पांढरा होतो. तर शरीरातील दोषांचा प्रकोप व दुष्टी होऊन बरेचदा शरीरावर निर्माण होणारे वैवर्ण्य हे गव्हाळ वर्णाचे, खरखरीत, तांबूस किंचित जळजळयुक्त किव्हा मग पांढर्‍या वर्णाचे, स्निग्ध व शरीराचा फार मोठा भाग व्यापणारे असते. रक्तधातूमध्ये आश्रित कोड हे लाल वर्णाचे, मांसधातूमध्ये आश्रित कोड हे ताम्र वर्णाचे, तर मेदधातूमध्ये आश्रित कोड हे पांढर्‍या वर्णाचे असते.

असे म्हटले आहे की ज्या श्वित्रामध्ये केसांचा रंग बदलतो, भाजलेल्या जखमे पासून निर्माण झालेले, गुदभागी असणारे, हातापायांचे तळव्यावर असणारे, ओठांवर निर्माण होणारे तसेच एक वर्षापेक्षा अधिक जुने श्वित्र हे बरे होण्यास जास्त वेळ लागतो.
आता हे कोड कशामुळे उत्पन्न होते ते पाहूयात.

ह्यात प्रथम अनुवांशिकता असते. तसेच कौटुंबिक इतिहासदेखील आढळतो. हा व्याधी एकाच कुटुंबातील रक्ताच्या नात्यामधील अनेक व्यक्तींमध्ये झालेला पाहायला मिळतो. तसेच बीज दोषांमुळे देखील हा पालकांकडून मुलांमध्ये होताना आढळतो. हा स्पर्शाने संक्रमित होत नाही. हो पण श्वित्र झाले असता मांसाहार तसेच दुध व दुधाचे पदार्थ हे मांस, मासे, फळे, भाज्या, डाळी, कडधान्ये ह्यांसोबत खाल्ल्याने, तसेच अति प्रमाणात मानसिक व शारीरीक ताण घेतल्याने हा व्याधी बळावू शकतो.

ह्या व्याधीवर उपचार करत असताना वैद्य पंचकर्मातील स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन, रक्त मोक्षण, ह्यांचा अवलंब करतात. कोडाच्या डागांवर श्वित्रहर लेप अथवा बाकुचीचा लेप लावून त्या व्यक्तीला सकाळच्या कोवळ्या उन्हात बसायला सांगितले जाते. त्याचप्रमाणे गरज भासल्यास रुग्णाला कृमिनाशक औषधे जसे कम्पिल्ल्क, पलाश बीज, विडंगारिष्ट, कृमिकुथर रस, कृमी मुद्गर रस, इ दिले जातात. अन्य औषधांमध्ये महा मंजीष्ठादी काढा, खादिरारीष्ट, आरोग्यवर्धिनी, स्वयंभू गुग्गुळ, बाकुची घन इ वापर वैद्य उपचारासाठी करतात. काही रुग्णांना मानसिक नैराश्य आले असल्यास त्यावरदेखील उपाय व उपचार करणे गरजेचे असते कारण ह्या रुग्णांना फक्त शारीरिक उपचार करून त्यांचा व्याधी पूर्ण बरा करणे शक्य नसते.
(कृपया वरील उपचार हे फक्त वाचकांच्या माहितीसाठी असून त्याचा उपयोग वैद्यांच्या सल्ल्यानेच करावा).