यजमान वेस्ट इंडीज व पाहुणा श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला कालपासून सुरूवात झाली. यजमानांनी नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडल्यानंतर श्रीलंकेने जेवणाच्या वेळेपर्यंत ३ बाद ५४ धावा केल्या होत्या. दिमुथ करुणारत्ने व लाहिरु थिरिमाने यांनी श्रीलंकेच्या डावाची सुरुवात केली. विंडीजने डावातील सातव्याच षटकात फिरकीपटू कॉर्नवालला गोलंदाजीस आणले. त्याने आपल्या तिसर्याच षटकात लंकेचा कर्णधार करुणारत्नेला झेलबाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. यानंतर थिरिमाने याच्या चोरटी धाव घेण्याचा प्रयत्नामुळे ओशादा फर्नांडो (४) याला धावबाद व्हावे लागले. ब्रेथवेटच्या अचूक थ्रोने त्याला क्रीझबाहेर गाठले. जेसन होल्डर याने यानंतर दिनेश चंदीमल (४) याला तंबूचा रस्ता दाखवला. चंदीमल बाद झाल्यानंतर पंचांनी जेवणाच्या वेळेचा इशारा केला. यावेळी २६.१ षटकांचा खेळ झाला होता.
दुसरा सलामीवीर लाहिरु थिरिमाने ७८ चेंडूंत नाबाद ३० धावांवर होता. श्रीलंकेने या सामन्याद्वारे वनडे व टी-ट्वेंटी मालिकेत खेळलेला २२ वर्षीय पाथुम निसांका याला कसोटी पदार्पणाची संधी दिली. अनुभवी अँजेलो मॅथ्यूज नसल्याचा त्याला लाभ झाला. दीर्घकाळानंतर अष्टपैलू धनंजया डीसिल्वा याचे श्रीलंका संघात पुनरागमन झाले.
धावफलक
श्रीलंका पहिला डाव ः दिमुथ करुणारत्ने झे. कॅम्पबेल गो. कॉर्नवाल १२, लाहिरु थिरिमाने नाबाद ३०, ओशादा फर्नांडो धावबाद ४, दिनेश चंदीमल झे. दा सिल्वा गो. होल्डर ४, अवांतर ४, एकूण २६.१ षटकांत ३ बाद ५४ गोलंदाजी ः किमार रोच ७-१-१८-०, शेन्नन गॅब्रियल ४-१-७-०, रहकीम कॉर्नवाल ७-५-७-१, अल्झारी जोसेफ ५-१-१७-०, जेसन होल्डर ३.१-१-२-१