श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती साजिथ प्रेमदासा?

0
8

>> श्रीलंकेत भीषण आर्थिक टंचाई

श्रीलंकेमध्ये आर्थिक संकटासह मोठा राजकीय भूकंपही आला आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी श्रीलंकेतून पलायन केले असून त्यांनी राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आपण असल्याचे साजिथ प्रेमदासा यांनी सांगितले. साजिथ प्रेमदासा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. विरोधी पक्षांच्या बैठकीत राष्ट्रपतीपदासाठी साजिथ प्रेमदासा यांच्या नावावर एकमत झाले आहे.

श्रीलंकेचे विरोधी पक्षनेते सजिथ प्रेमदासा यांनी याबाबत, आजपर्यंत २२५ पैकी दोन तृतीयांश खासदार गोटाबाया राजपक्षे यांना पाठिंबा दिला होता. अशा स्थितीत निवडणूक अवघड असली तरी मी निवडणूक लढणार आहे. रनिल विक्रमसिंघे यांनीही निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. पण रानिल विक्रमसिंघे हे गोटाबाया राजपक्षे यांच्या जवळचे आहेत आणि जनता राजपक्षेंच्या विरोधात असल्याचे सांगितले.

भीषण आर्थिक टंचाई
श्रीलंकेवर सध्याा इतिहासातील सर्वात मोठे आणि भीषण आर्थिक संकट ओढवले आहे. देशात इंधनासह खाद्यपदार्थांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. जीवनावश्यक वस्तूंची मोठी कमतरता जाणवत आहे. अन्नापासून ते स्वयंपाकाचा गॅस, औषध आणि अगदी टॉयलेट पेपरसारख्या वस्तूंचाही तुटवडा निर्माण झाला आहे. श्रीलंकेच्या संकटकाळात फक्त भारताने मदतीचा हात दिला आहे. परकीय चलनांचा पुरेसा साठा नसल्याने श्रीलंकेला वस्तूंची आयात-निर्यात करता येत नाहीय. अशात भारत श्रीलंकेच्या मदतीला धावला आहे. जागतिक अन्न कार्यक्रमाने जाहीर केलेल्या अहवालात श्रीलंकेतील २८ टक्के लोकसंख्येला अन्न संकटाचा सामना करावा लागत आहे. देशात किमान ६५,६०० लोकांवर उपासमारी सारखी परिस्थिती आली आह. यावर तात्काळ हस्तक्षेप न केल्यास ही संख्या झपाट्याने वाढू शकते असा इशारा दिला आहे.

६३ दशलक्ष डॉलरची गरज
अन्नाच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे लोकांना अन्नाची गरज भागवणे कठीण होत आहे. सुमारे ६७ लाख लोकांना पुरेसा आहार घेता येत नाही. श्रीलंकेतील अन्नसंकट दूर करण्यासाठी तातडीने ६३ दशलक्ष डॉलर मदतीची आवश्यकता आहे असे या अहवालात म्हटले आहे.

प्रेमदासा यांचे आवाहन
सजिथ प्रेमदासा यांनी यावेळी, श्रीलंका सध्या अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहे. आर्थिक अडचणी आहेत, कर्जात बुडलेले आहेत. गरजू आणि मूलभूत गोष्टी देशात मिळत नाहीत. अशा परिस्थितीत मी आंतरराष्ट्रीय समुदायाला श्रीलंकेला मदत करण्याचे आवाहन केले.

पंतप्रधान मोदींचे आभार

भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आपत्तीच्या काळात श्रीलंकेला आर्थिक संकटावेळी खूप मदत केली आहे, आम्ही पंतप्रधान मोदी यांचे आभारी आहोत, असे प्रेमदासा यांनी सांगितले. श्रीलंकेला यावेळी भारत सरकार आणि भारतातील लोकांच्या पाठिंब्याची गरज असून त्यांनी आपला पाठिंबा सुरू ठेवण्याचे आवाहन केले.