श्रीपाद नाईक यांच्या राजकीय कारकिर्दीची ‘पंचविशी’ पूर्ण

0
131

>> व्हिडिओ संदेशाद्वारे मानले जनतेचे आभार

उत्तर गोव्याचे खासदार व केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या राजकीय कारकिर्दीला काल दि. ९ डिसेंबर रोजी २५ वर्षे पूर्ण झाली.

त्यासंबंधी काल जारी केलेल्या एका व्हिडिओ संदेशाद्वारे जनतेचे आभार मानतानाच नाईक यांनी काही आठवणींना उजाळा दिलेला आहे. ते म्हणतात की ९ डिसेंबर १९९४ या दिवशी पहिल्यांदाच भाजपने राज्यातील विधानसभेत प्रवेश केला. या दिवशी भाजपचे चार आमदार विधानसभेवर निवडून गेले होते. त्यात मी स्वतः, मनोहर पर्रीकर, नरहरी हळदणकर व दिगंबर कामत हे ते चार आमदार होत. त्यापैकी आपण ज्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले ते आपले मित्र मनोहर पर्रीकर यांचे आमच्या राजकारणातील रौप्य महोत्सवी वर्षीच निधन व्हावे ही चटका लावून जाणारी गोष्ट होय.

ते पुढे म्हणतात की, ९४ साली मी मडकई मतदारसंघातून आमदार म्हणून निवडला गेलो. पण तत्पूर्वीही आपण दुर्भाट पंचायतीचा सरपंच म्हणून दोन वेळा बिनविरोध निवडला गेलो.
आमदारकीनंतर सलग पाच वेळा उत्तर गोव्यातून खासदार म्हणून लोकसभेवर जाण्याची संधी जनतेने दिली. त्या बळावर आज राजकीय कारकिर्दीची २५ वर्षे पूर्ण करू शकलो.

कॉंग्रेस पक्षाच्या राजवटीला कंटाळलेल्या लोकांनी आम्हा भाजप नेत्यांना वेळावेळी संधी दिली व त्या संधीचे सोने करण्याचा प्रत्येक वेळी आम्ही प्रयत्न केला. आमच्या यशाचे सगळे श्रेय जनतेलाच द्यावे लागेल. त्यांच्या आशीर्वादामुळेच नेता बनून काम करता आले, असे सांगताच व्हिडिओ संदेशातून त्यांनी सर्व जनतेचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.